महाराष्ट्र

जळगावात भाजपला धक्का! जिल्ह्यातील बडा नेता शरद पवार गटाच्या गळाला; गिरीश महाजनांविरोधात लढणार?

आतापर्यंत जामनेर विधानसभा मतदारसंघातील गिरीश महाजन यांची ही निवडणूक एकतर्फी होणार असल्याचे म्हटले जात होते.

Swapnil S

जळगाव : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप खोडपे यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून शनिवार दि २१ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खा. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत जामनेरला एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या प्रवेशानंतर जामनेर विधानसभा निवडणुकीत गिरीश महाजनाविरोधात दिलीप खोडपे लढत होणार अटळ आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. या राजीनामा पत्रात त्यांनी आपल्या मनातील खेद व्यक्त केली आहे. ते पत्रात म्हणतात की, गेल्या दहा वर्षांपासून पक्षात स्वकर्तृत्वाने मोठे होण्यापेक्षा दुसऱ्याला नालायक ठरवून मोठे होण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. पक्षाच्या खऱ्या ध्येय धोरणांपासून दूर जाऊन कार्यकर्त्यांना डावलण्यात, स्वत:चे खिसे भरण्यात, प्रत्येक गावात दोन गट उभे करण्यात व दडपशाही करण्यात पक्षातील लोक व्यस्त असल्याचे मागील दहा वर्षांपासून दिसत आहे.

कार्यकर्त्यांच्या सुख-दु:खात सामील होण्याच्या विचाराला हरताळ फासला गेला आहे. गेल्या पाच वर्षात माझ्या संदर्भात गैरसमज पसरवले गेले, तरीही मी काम करत राहीलो. नेत्यांनी मात्र मला कधीही सन्मान दिला नाही अनेक वर्षांपासून मला कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले नाही. माझी सतत हेटाळणी, पक्षात अपमानास्पद वागणूक मिळत गेली. याला कंटाहून माझा स्वाभिमान जपण्यासाठी राजीनामा देत असल्याचे दिलीप खोपडे यांनी या पत्रात म्हटले आहे.

दिलीप खोडपे हे गेल्या ३५ वर्षांपासून जामनेर तालुका भाजपचे प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून कार्यरत होते. पक्षाच्या पडत्या काळात त्यांनी पक्षवाढीसाठी मोठा संघर्ष केला. एक निष्ठावान कायकर्ता म्हणून ते जामनेर तालुक्यात ओळखले जातात. त्यांच्या राजीनाम्याने भाजपला धक्क्का बसला तर जामनेर तालुक्यात खळबळ उडाली. दिलीप खोडपे हे दि २१ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.

भाजपमधील राजकारणाचा दुसरा बळी

आतापर्यंत जामनेर विधानसभा मतदारसंघातील गिरीश महाजन यांची ही निवडणूक एकतर्फी होणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र, आता दिलीप खोडपेंच्या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस खोडपेंना उमेदवारी देऊन ही जामनेरची लढत अटीतची होईल असे दिसत आहे. जिल्ह्यातील भाजपमधील राजकारणाचा हा दुसरा बळी गेला आहे. यापूर्वी माजी खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापले गेल्याने त्यांनी पक्ष सोडला होता.

मुंबईत कोसळधार! पुढील काही तास धोक्याचे, ‘रेड अलर्ट’ जारी

मराठवाड्यात पावसाचा कहर; धाराशिव-छत्रपती संभाजीनगरमध्ये पूरस्थिती तीव्र, जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले

करूर चेंगराचेंगरी : मृतांची संख्या ३९ वर; विजय थलापतींकडून २० लाखांची मदत जाहीर, तपास समिती नियुक्तीचे आदेश

ठाण्यात पावसाचा जोर कायम; सखल भागांत पाणी साचले, नवरात्र आणि गरब्यावर पावसाचे सावट

Marathwada Floods : मराठवाड्यावर पुन्हा पुरसंकट; बीड, लातूर, धाराशिवमध्ये जोरदार पाऊस, जनजीवन विस्कळीत