जळगाव : येथील महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महाविकास आघाडीची महायुतीला टक्कर देण्यासाठी जागा वाटपासाठी बैठक घेतली गेली असता या बैठकीत पक्ष ताकदीचा मुद्दा गाजला आणि जागा वाटपावरून शरद पवार गटाने वॉकआऊट केले तर उद्धव ठाकरे यांच्या सेनेने स्वबळावर लढण्याची घोषणा केली.
दि. २३ डिसेंबरपासून निवडणुकीचे उमेदवारीचे अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत असल्याने शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटासोबत बोलणी सुरू केली. मात्र जागा वाटपात दोन्ही पक्षात एकमत झाले नाही. महायुतीच्या विरोधात या निवडणुकीत एकत्रित उभे राहण्याचे आव्हान असतांना त्यांच्यात बिघाडी झाल्याचे दिसून आले. शरद पवार गटाने दिडतासाच्या चर्चेत जागा वाटपात एकमत होत नसल्याचे पाहताच बैठकीतून काढता पाय घेतला तर बैठक फिस्कटल्याने शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याचे जाहीर केले.
२०१७ मध्ये शिवसेनेला १५ जागा जिंकता आल्या होत्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नव्हती. दोन्ही पक्षाच्या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची ताकद संपलेली असतांना ४० जागांची मागणी शिवसेना उद्धव गटाने मान्य केली नाही आणि स्वबळावर लढण्याचा नारा दिला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत शरद पवार गटाने ४० जागांची मागणी केली, यावर शिवसेना ठाकरे गटाने १० ते १५ जागा देण्याची तयारी दर्शवली.या बैठकीत ज्या जागांवर ठाकरे गटाने दावा केला त्याच जागांवर शरद पवार गटाने दावा केला. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून जागांबाबत तडजोउ होऊ शकली नाही. परिणमी ठाकरे गटाने स्वबळावर लढण्याचे जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर जिल्हयातील बहुसंख्य नेते व पदाधिकारी हे अजित पवार गटात गेल्याने शरद पवार गटाची स्थिती अत्यंत नाजूक बनली असून त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत. गेल्या निवडणुकीत एकही नगरसेवक राष्ट्रवादीचा निवडून आला नव्हता. ही वस्तुस्थिती शरद पवार गटाचे पदाधिकारी मान्य करत नाहीत हे दुर्देव आहे. तसेच शिवसेना फुटीनंतर शिवसेनेचे बहुसंख्य नेते कार्यकर्ते हे शिंदे गटाकडे गेले असल्याने उद्धव सेनेची ताकद काय असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने करत ठाकरे गटाला डिवचले. त्यामुळे ही बोलणीच फिस्कटली गेली.
महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच महापालिका प्रशासनाने तातडीने कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, अनधिकृत बॅनर हटवण्याचे आदेश अतिक्रमण निर्मूलन विभागाला दिले. या आदेशानुसार पहिल्या दिवशी शहरातून १२३ फलक आणि ३० झेंडे काढले, तर दुसऱ्या दिवशी ४५ फलक आणि ४३ झेंडे असे १६८ फलक आणि ७३ झेंडे काढले. शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या अनधिकृत जाहिरात फलकांबद्दल नाराजी व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर मनपाने तातडीने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या अनधिकृत जाहिरातींबाबत तातडीने कार्यवाही करण्यासाठी प्रभागनिहाय समित्या स्थापन केल्या आहेत. नागरिकांनी या प्रभाग अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.
पवार गट नाजूक अवस्थेत
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर जिल्ह्यातील बहुसंख्य नेते व पदाधिकारी हे अजित पवार गटात गेल्याने शरद पवार गटाची स्थिती अत्यंत नाजूक बनली असून त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत. गेल्या निवडणुकीत एकही नगरसेवक राष्ट्रवादीचा निवडून आला नव्हता. ही वस्तुस्थिती शरद पवार गटाचे पदाधिकारी मान्य करत नाहीत हे दुर्देव आहे.