मुंबई : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जालिंदरनगर (कनेरसर, ता. खेड) आणि वाबळेवाडी (ता. शिरूर) शाळेत राबविण्यात येणारे नावीन्यपूर्ण उपक्रम, गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, तंत्रज्ञानयुक्त शिक्षण, लोकसहभागातून शाळांचा विकास याची दखल राज्य शासनाने घेतली आहे. या गोष्टी शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविणाऱ्या आहेत, त्यामुळे या शैक्षणिक पॅटर्नची राज्यभरामध्ये अंमलबजावणी करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केले.
खेड तालुक्यातील जालिंदरनगर येथील जिल्हा परिषद शाळा ही 'टी ४' जागतिक संस्थेने केलेल्या ‘वर्ल्ड बेस्ट स्कूल कॉम्पिटिशन’ स्पर्धेमध्ये जगभरातील समुदायाने पसंती क्रमानुसार केलेल्या मतदानानुसार सर्वाधिक मते मिळवून ‘कम्युनिटी चॉइस ॲवॉर्ड’ या मानाच्या विभागात सर्वोत्कृष्ट ठरली आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित ग्रामस्थांसोबतच्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी भुसे यांनी जालिंदरनगर शाळेतील शिक्षक दत्तात्रय वारे यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक, व्यवस्थापन समिती, विद्यार्थी व ग्रामस्थांना शुभेच्छा देत अभिनंदन केले. त्यापूर्वी त्यांनी वाबळेवाडी येथील शाळेला भेट दिली.
कार्यक्रमाला आमदार बाबा काळे, राज्याचे शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील उपस्थित होते.
आधुनिक शिक्षण
जालिंदरनगर येथील शाळेत एआय टूल्सच्या माध्यमातून रोबोटिक्स, कोडिंग, सिम्युलेशन अशा विषयावर कृत्रिम बुद्धिमत्तेचे आधुनिक शिक्षण मिळणार आहे. ही लॅब सिमुसॉफ्ट टेक्नॉलॉजीद्वारे उभारण्यात आली आहे.
शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीची ‘डाटा बँक’!
राज्यात विविध आदर्श, प्रतिभावंत, उपक्रमशील शिक्षक असून ते समर्पित भावनेने ज्ञानदानाचे काम करीत असतात, त्यांनी वाबळेवाडी आणि जालिंदरनगर या उपक्रमशील शाळेचे अनुकरण करावे. राज्य शासनाच्या वतीने अशा समर्पित भावनेने काम करणारे शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समिती यांची ‘डाटा बँक’ तयार करण्याचे काम सुरू आहे. वारे यांनी राज्यातील या शिक्षकांना मार्गदर्शन करण्याचे काम करावे. राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अपेक्षित काम करूया, असे आवाहन भुसे यांनी केले.