संजय करडे/मुरूड-जंजिरा
पावसाळी हंगामात सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला तीन महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येतो. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी हा किल्ला बंद ठेवण्यात येतो आणि पावसाळा संपताच किल्ला पुन्हा सुरू केला जातो. सदरचा किल्ला लवकरात लवकर सुरू व्हावा, अशी असंख्य पर्यटकांची मागणी लक्षात घेऊन पुरातत्त्व खात्याने हा किल्ला सप्टेंबर महिन्यात सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी किल्ल्याभोवती असणारी झाडेझुडपे काढण्यासाठी कर्मचारी वर्गाची शोधाशोध सुद्धा सुरू केली आहे.
पावसाळ्यात १ जून ते ३१ ऑगस्ट या काळात समुद्र खवळलेला असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव जंजिरा किल्ल्यावरील प्रवासी वाहतूक पुरातत्त्व खात्याकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही बंद करण्यात आली होती. सध्या मुरूड तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी झाले असून वाऱ्याचा वेग सुद्धा मंदावला आहे. त्यामुळे जलवाहतुकीस कोणतीही अडचण येणार नसल्याचे सांगितले जात आहे.
यंदा सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. किल्ल्यात साफसफाईसाठी मजूर वर्गाची वाहतूक करण्यासाठी होड्यांची व्यवस्था राजपुरी प्रवासी वाहतूक सोसायटीमार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र प्रत्यक्ष साफसफाईसाठी लागणारा मजूर वर्ग उपलब्ध होत नसल्याचे समजते. पर्यटक नसल्याने सर्व पर्यटनपूरक व्यवसायांना मोठा फटका बसला आहे. कोणत्याही दुकानावर गिऱ्हाईक दिसत नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. जंजिरा किल्ला सुरू झाल्यास स्थानिकांना रोजगार मिळणार असून बोटचालकांनाही काम मिळणार आहे.
जंजिरा किल्ल्याच्या डागडुजी व किल्ल्यातील झाडझुडपे साफ करण्यासाठी किमान १० ते १५ दिवस लागणार आहेत. कोकणात गणेशोत्सवाच्या काळात स्वच्छता करणारे मजूर उपलब्ध होत नाहीत. सप्टेंबर २० पर्यंत किल्ल्याची अंतर्गत साफसफाई करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहणार असून, अंतर्गत साफसफाई होताच किल्ला पर्यटकांसाठी खुला करणार आहोत.बी. जी. येलीकर, सहाय्यक संवर्धक, पुरातत्त्व खाते
१५० ते २०० कुटुंबांची आर्थिक कोंडी
राजपुरीतील शिडाच्या १३ बोटी व इंजिन होड्यांवर अवलंबून असणाऱ्या सुमारे १५० ते २०० कुटुंबांची आर्थिक कोंडी जून ते सप्टेंबर या काळात होत असते. त्यामुळे जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी लवकरात लवकर खुला करावा, अशी स्थानिकांसह पर्यटकांची मागणी आहे.