मुंबई : भोंदू अशोक खरातच्या ‘शिवनिका ट्रस्ट’चे उपाध्यक्ष डॉक्टर जितेंद्र शेळके व त्यांची पत्नी यांचा शुक्रवारी (दि. १७) अपघाती मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्या कारने समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या एका कंटेनरला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. त्यात जितेंद्र शेळके यांच्यासह त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला. शेळके यांची भोंदू अशोक खरात प्रकरणात चौकशी सुरू होती. ‘एसआयटी’ने त्यांचा जबाबही नोंदवला होता. ते या प्रकरणातील एक महत्त्वाचे साक्षीदार होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू हा अपघात की घातपात? याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.
यासंबंधी हाती आलेल्या माहितीनुसार, जितेंद्र शेळके हे दुपारी १ च्या सुमारास आपल्या कुटुंबासह छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीच्या दिशेने जात होते. रस्त्यात समृद्धी महामार्गावरील धोत्रे गावालगत त्यांच्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या एका कंटेनरला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. त्यात जितेंद्र शेळके व त्यांची पत्नी अनुराधा हे दोघे जागीच ठार झाले. तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला. ही धडक एवढी भीषण होती की, त्यांची कार थेट कंटेनरखाली घुसली. त्यामुळे तिचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातातील जखमी मुलाला लगतच्या रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आले आहे.
कार बराच वेळ कंटेनरखालीच होती
जितेंद्र शेळके यांची कार कंटेनरला धडकल्यानंतर बराच वेळ त्याच स्थितीत कंटेनरखालीच उभी होती. नंतर कुणीतरी ही माहिती पोलीस प्रशासनाला कळवली. त्यानंतर पोलीस व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन शेळके, त्यांची पत्नी अनुराधा व मुलाला कारमधून बाहेर काढले. पण तोपर्यंत जितेंद्र शेळके व त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. हे तिघेही कारमध्ये बराच वेळ अडकले होते.
शेळके हे भोंदू खरातचे विश्वासू सहकारी
मृत जितेंद्र शेळके हे भोंदू अशोक खरातचे अत्यंत जवळचे सहकारी होते. ते खरातच्या शिवनिका ट्रस्टवर उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) त्यांचा जबाबही नोंदवला होता. त्यांची जवळपास ४ वेळा चौकशी झाली होती. त्यामुळे ते या प्रकरणातील एक महत्त्वाचे साक्षीदार होते. त्यांच्या मालकीच्या लॉन्समध्येही खरात याची भागीदारी होती. त्यामुळे खरातला अटक झाल्यामु्ळे शेळके प्रचंड तणावात होते. त्यातच आज त्यांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे ही घटना केवळ अपघात आहे की, घातपात आहे? याविषयी वेगवेगळ्या शंकाकुशंका व्यक्त केल्या जात आहेत.
सुषमा अंधारेंनी व्यक्त केली घातपाताची शक्यता
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या अपघातावर संशय व्यक्त केला आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणातील एक महत्त्वाची कडी असेलेले शिवनिका ट्रस्टचे संचालक जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी ही अत्यंत धक्कादायक आहे. मला ही गोष्ट खरे तर अविश्वसनीय वाटते. कारण, गेल्या काही दिवसांत अनेक नेत्यांनी ही भीती किंवा शक्यता व्यक्त केली होती की, अशोक खरातचे एन्काउंटर होऊ शकते. त्याच्या जिवाला धोका उद्भवू शकतो. आजच्या घटनेमुळे ही शक्यता अधिक जास्त ठळक पद्धतीने अधोरेखित होत आहे.
खरातच्या शिवनिका ट्रस्टवर सध्या कोण-कोण?
राजकीय व प्रशासकीय पाठबळातून गत काही वर्षांत अशोक खरातच्या शिवनिका संस्थानला कोट्यवधींच्या देणग्या मिळाल्या होत्या. परंतु गोशाळेसाठी निधी संकलित करुनही काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे विश्वस्तांमध्ये वाद निर्माण झाला. त्यातील तिघांनी राजीनामे दिले. सध्या संस्थानवर अध्यक्ष म्हणून अशोक खरात, उपाध्यक्ष म्हणून डॉ. जितेंद्र शेळके कार्यरत होते. सरचिटणीसपदी खरातची पत्नी कल्पना खरात असून, महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा रुपाली चाकणकर, सुभाष गमे, ललित पोफळे, डॉ. नंदकिशोर कातोरे हे विश्वस्त मंडळावर आहेत.
कल्पना खरातच्या जामिनावर २२ एप्रिलला निर्णय
भोंदूबाबा अशोक खरातने त्याच्या स्वत:च्या दोन भाचांच्या ८ खात्यात ४ कोटी ८० लाख रुपयांची उलाढाल केली होती, अशी माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. राहता येथील समता पतसंस्थेत ही खाती होती. दरम्यान, खरातच्या शिर्डीतील जमीन खरेदी प्रकरणात अशोक खरातची पत्नी कल्पनाच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली. आता याबाबतचा निर्णय २२ एप्रिलला होणार आहे. दरम्यान, सध्या इतर प्रकरणाचाही तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
‘७१-४९’ फॉर्म्युलाचाही तपास सुरू
भोंदू खरातने समता पतसंस्थेत ५७ जणांच्या नावावर तब्बल १०० खात्यांचा व्यवहार पोलिसांनी तपासला. तेव्हा अनेक खात्यांमध्ये ७१ लाख आणि ४९ लाख रुपये अशाच ठराविक रकमा वारंवार जमा केल्या आणि काढण्यात आल्याचे दिसले. विशेष म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या नावावर दोन खाती उघडली होती. यातील आणखी संशयास्पद बाब म्हणजे बहुतांश खाती कोरोना संकटकाळात प्रत्येक महिन्याच्या २१ तारखेला उघडण्यात आली. या सर्व खात्यांमध्ये खरातचेच नाव नॉमिनी म्हणून नोंदवले गेले होते. अंकशास्त्राच्या आधारे लोकांना गंडा घालणारा खरात हा स्वत:च्या व्यवहारातही ठराविक अंकांचा वापर करत होता का, की हा केवळ आर्थिक व्यवहार लपवण्याचा तांत्रिक फॉर्म्युला होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत.