घराबाहेर धुप लावण्यावरुन झालेल्या वादातून कल्याणच्या एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या शुक्ला नावाच्या परप्रांतीय व्यक्तीने थेट गुंड बोलावून शेजारी राहणाऱ्या मराठी कुटुंबाला लोखंडी रॉडने, पाईपने बेदम मारहाण करीत गंभीर जखमी केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. घटनेचे अनेक फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
"तुम थर्ड क्लास मराठी लोग बिल्डिंग में क्यू रहते हो...झोपडपट्टी में रहो...तुम मराठी गंदे लोग तुम मच्छी मटण खाते हो..तुम्हारी औकात नहीं है बिल्डिंग में रहने की. तुम्ही मराठी भिकारी आहात. तुमचे मराठीपण दोन मिनिटांत बाहेर काढतो...तुमच्यासारखे ५६ मराठी लोक माझ्या ऑफिसमध्ये झाडू मारतात...", अशी गरळ ओकणाऱ्या आरोपी शुक्ला याला अटक करुन कठोर कारवाई करावी आणि चांगली अद्दल घडवावी अशी मागणी होत आहे.
नेमकं काय झालं?
कल्याणमधील योगीधाम परिसरातील आजमेरा हाईट्स या सोसायटीत अखिलेश शुक्ला ही व्यक्ती कुटुंबासह राहते. त्यांच्याच मजल्यावर कळवीकट्टे आणि देशमूख हे दोन कुटुंब राहतात. बुधवारी रात्री पावणे आठ वाजता लता बाळकृष्ण कळवीकट्टे (वय ५६ वर्षे) यांचे अखिलेश शुक्ला आणि त्याची पत्नी गीता शुक्ला यांच्याशी घराबाहेर धुप लावण्यावरुन वाद झाला. तेव्हा शुक्लाने मराठी भाषिकांबाबत गरळ ओकण्यास सुरूवात केली. बाजूला राहणाऱ्या देशमुख कुटुंबातील धीरज देशमुख यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला आणि तुमचं भाडण आपापसात मिटवा पण सर्व मराठी लोकांचा अपमान का करताय अशी विचारणा केली. धीरज यांचे भाऊ अभिजित देखील तेथे आले. त्यावर, "मी मंत्रालयात कामाला आहे, तुझ्यासारखे ५६ मराठी लोक माझ्या ऑफिसमध्ये झाडू मारतात. एका मिनिटात मुख्यमंत्री कार्यालयातून फोन करेन आणि सगळं मराठीपण बाहेर काढेल. तुमको मालुम नही मै कौन हुं, सारी पुलिस मुझसे डरती है, अभी दिखाता हूं तुमको... अशी धमकी देत शुक्ला घरात निघून गेला.
त्यानंतर शुक्लाने ८ ते १० गुंडांना फोन करुन बोलावले आणि देशमुख यांच्या घराची बेल वाजवून त्यांना बाहेर काढले व त्यांच्यावर गंभीर वार करीत बेदम मारहाण केली. इतकंच नाही तर धीरज यांच्या पत्नीलाही शुक्ला आणि त्याच्यासोबत असलेल्या आठ ते दहा लोकांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
यानंतर रात्री १२ वाजता पोलिसांत तक्रार करण्यासाठी गेलो, पण पोलिसांनी पहाटे पाच वाजेपर्यंत बसवून ठेवले. पोलिस तक्रार घेण्यास टाळाटाळ करत होते, तर पोलिस स्थानकाबाहेरच मारहाण करणारे टोळके फिरत होते आणि तक्रार न करण्याची धमकी देत होते, अशी माहिती देशमुख यांनी दिली आहे. दरम्यान, या मारहाणीत अभिजित देशमुख, धीरज देशमुख आणि विजय कविलकट्टे हे जखमी झाले आहेत. अभिजित देशमुख यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता मनसेने शुक्ला याला तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. २४ तासांत अटक न केल्यास मनसे रस्त्यावर उतरेल आणि शुक्लाला जिथे असेल तिथून आमच्या पद्धतीने उचलून पोलीस स्टेशनमध्ये जमा केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. तर, शुक्लाचे तोंड फोडले, हात पाय सुजवले तर पोलिसांनी मध्ये येऊ नये. मराठी माणसाला दाबल तर महाराष्ट्र द्रोहाचा गुन्हा दाखल करू. शुक्ला नावाचे पार्सल जिथून आले तिथे पाठवू, असे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटले.