जलाशयांतील पाणी आता पिण्यासाठीच! शेतीला पाणी बंद; पिके जगवायची कशी?  'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

जलाशयांतील पाणी आता पिण्यासाठीच! शेतीला पाणी बंद; पिके जगवायची कशी?

मराठवाड्यातील कन्नड जलाशयांमधून शेतीसाठी होणारा पाणीउपसा बंद करण्यात आला असून, आगामी काळात पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. तालुक्यातील शिवना-टाकळी मध्यम प्रकल्पात २७.९६ टक्के, तर कन्नड शहरासह १५ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या अंबाडी प्रकल्पात अवघा ७.५२ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

Swapnil S

सुजित ताजणे /छत्रपती संभाजीनगर

मराठवाड्यातील कन्नड जलाशयांमधून शेतीसाठी होणारा पाणीउपसा बंद करण्यात आला असून, आगामी काळात पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. तालुक्यातील शिवना-टाकळी मध्यम प्रकल्पात २७.९६ टक्के, तर कन्नड शहरासह १५ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या अंबाडी प्रकल्पात अवघा ७.५२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. या तुलनेत पूर्णा-नेवपूर प्रकल्पात ७६.७७ टक्के, माटेगाव प्रकल्पात ७८.७५ टक्के आणि वडोद प्रकल्पात ६०.८० टक्के पाणीसाठा आहे. मात्र, सर्वच जलाशयांतील पाण्याचा वापर आता काटकसरीने करण्याची गरज निर्माण झाली आहे.

शिवना-टाकळी धरणातील शिल्लक असलेले पाणी हे पिण्यासाठी साधारण वर्षभर पुरेल, असा अंदाज संबंधित विभागाने व्यक्त केला आहे. जलाशयातून होणारा सिंचनासाठीचा पाणीउपसा बंद करण्यात आला आहे. मात्र, खासगी मालकीच्या विहिरींमधून पाणीउपसा सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

शिवना-टाकळीवर अनेक गावांची भिस्त

शिवना-टाकळी प्रकल्पावर चापानेर, रुईखेडा, हतनूर, टापरगाव, शिवराई, जवळी, जळगाव (घाट), गल्लेबोरगाव, जैतापूर, टाकळी, पळसगाव, वेरूळ आणि लेणी या गावांच्या पाणीपुरवठा योजनांची भिस्त आहे. काही गावांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी विहिरींची कामे पूर्ण झाली असली, तरी त्यांच्यामार्फत अद्याप पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. त्यामुळे उपलब्ध जलसाठ्याचे नियोजन करतानाच पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्था कार्यान्वित करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

जुन्या जलस्रोतांच्या पुनरुज्जीवनावर भर

दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता गावांमधील जुन्या बारवा, विहिरी, बोअरवेल आणि हातपंप दुरुस्त करून ते पुन्हा वापरात आणण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार पंचायत समितीमार्फत ग्रामपंचायतींना स्थानिक स्तरावर पाणीटंचाई निवारण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यास सांगण्यात आले आहे.

अकरा प्रकल्पांतील पाणीसाठा संपलाय...

तालुक्यातील गौताळा, गणेशपूर, मुंगसापूर, आंबा, सिरसगाव, आठेगाव खेडा, देवपुडी, डोणगाव के.टी., औराळा, चापानेर आणि कोळवाडी या प्रकल्पांतील पाणीसाठा पूर्णपणे संपला आहे. त्यामुळे या भागांतील पाणीटंचाईचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.

दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता गावांमधील उपलब्ध जुन्या जलस्रोतांची दुरुस्ती व पुनरुज्जीवन करण्यावर भर देण्यात येत आहे. पाणीटंचाई निवारण्यासाठी ग्रामपंचायतींनी आपल्या स्तरावर आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
सारिका भगत, तहसीलदार, कन्नड
अंबाडी धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे गव्हाच्या पिकासाठी पाण्याची उपलब्धता अनिश्चित झाली आहे. त्यातच गहू उत्पादनाचा खर्च वाढत असून बाजारातील गव्हाचे दरही वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च आणि पाणीटंचाई अशा दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. पाण्याअभावी पिकांचे नुकसान होण्याची भीती असून, शेतकऱ्यांना देण्यासाठी शासनाने योग्य उपाययोजना कराव्यात.
भय्यासाहेब पैठणे, शेतकरी, कन्नड

अनावश्यक खर्चावर नियंत्रण; वित्त विभागाचे सर्व खात्यांना निर्देश जारी

अविनाश भोसलेंच्या जप्त केलेल्या मालमत्तांवरील टाच हटवण्याचे आदेश; हायकोर्टाचा ED ला मोठा झटका; न्यायालय म्हणते...

Mumbai : अखेर ३० महिन्यांनंतर सायन पूल सेवेत; विद्याविहार, गोरेगाव-मुलुंड उड्डाणपुलांचे आज लोकार्पण

'निष्पक्ष निवडणुकीसाठी हात बांधलेले नाहीत' - सर्वोच्च न्यायालय

न्यूझीलंडची वारी आजपासून! टी-२० मालिकेसाठी भारत सज्ज; वातावरणाशी जुळवून घेण्याचे आव्हान