वृक्षतोडीविरुद्ध जनक्षोभ; स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष, कर्जतमध्ये राजकीय वातावरण तापले 
महाराष्ट्र

वृक्षतोडीविरुद्ध जनक्षोभ; स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष, कर्जतमध्ये राजकीय वातावरण तापले

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेल्या टोरंट पॉवरच्या पंप स्टोरेज प्रकल्पावरून राज्यातील राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीवरून जनक्षोभ उस‌ळला असून विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आले आहेत.

Swapnil S

कर्जत/रायगड : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेल्या टोरंट पॉवरच्या पंप स्टोरेज प्रकल्पावरून राज्यातील राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीवरून जनक्षोभ उस‌ळला असून विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सोमवारी प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करत सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली.

पालीतर्फे कोथळ खलाटी ग्रामपंचायत हद्दीतील साईडोंगर परिसरात सुमारे तीन हजार मेगावॉट क्षमतेचा टोरंट जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ९३२ एकर क्षेत्राचा वापर होणार असून, त्यात अंदाजे ६०० एकर वनक्षेत्र आणि ३३२ एकर खासगी जमिनींचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

वृक्षतोडीला ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमींचा विरोध

टोरंट कंपनीच्या साईडोंगर-१ प्रकल्पासाठी २० ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या वृक्षतोडीमुळे स्थानिकांमध्ये चिंता वाढली आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे ३२ हजार झाडे तोडण्याचे नियोजन असल्याची माहिती आहे. या वृक्षतोडीला ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमींनी विरोध केला असून, राजकीय नेत्यांनीही निषेध नोंदवला आहे. त्यामुळे हा प्रश्न आता राज्यभर चर्चेत आला आहे.

वृक्षतोडीवर पर्यावरण बचाव समितीची हरकत

साईडोंगर परिसरातील आदिवासी वाडीपासून पुढील जंगलात इलेक्ट्रिक कटर यांच्या सहाय्याने झाडे तोडली जात आहेत. तोडण्यात आलेली झाडे उचलून नेण्यासाठी कामगार लावण्यात आले आहेत. या बेसुमार वृक्षतोडीवर कर्जतच्या पर्यावरण बचाव समितीने हरकत घेतली आहे. सामान्य माणसाने एखादे झाड तोडले तर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र कुठलीही ठोस परवानगी नसताना इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड कशी केली जाते, असा प्रश्न समितीचे प्रमुख अॅड. केलाश मोरे यांनी केला आहे.

प्रकल्पासाठी ३७० हेक्टरची आवश्यकता

गुजरात राज्यातील टोरंट पॉवर या कंपनीकडून येथे सायडोंगर भागात उभारल्या जाणाऱ्या ३ हजार मेगावॉट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पासाठी १३ हजार ५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. प्रकल्पासाठी ३७० हेक्टर जागेची आवश्यकता असून, त्यापैकी २३३ हेक्टर हे वनक्षेत्र आहे, तर १४४ हेक्टर हे बिगर वनक्षेत्रातील आहे. पेज नदीवर हा प्रकल्प उभारण्यात येणार असून यासाठी दोन धरणांची निर्मिती केली जाणार आहे. डोंगरमाथ्यावरील धरणाची उंची ही २७ मीटर असणार असून, खालच्या धरणाची उंची ५९ मीटर असणार आहे.

प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी हालचाली

प्रकल्पासाठी भालीवाडी, आंबोट, पोतळ, पाली, साईडोंगर, धाक या गावातील जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. भूसंपादन आणि पुनर्वसनाचे काम अद्याप झालेले नसले तरी प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होण्याची शक्यता असून, ३ नोव्हेंबर रोजी प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ होण्याची शक्यता आहे.

वन विभागाचे जमीनीचे पत्र उपलब्ध नाही

वन विभागाने या प्रकल्पासाठी प्रकल्पाला जमीन दिल्याचे कोणतेही पत्र उपलब्ध नाही. अशावेळी कंपनी अथवा प्रशासन मनमानी पद्धतीने झाडांची कत्तल कशी करू शकते, असा प्रश्न पर्यावरण बचाव समितीने उपस्थित केला आहे. त्यामुळे ही वृक्षतोड तातडीने थांबवावी, अन्यथा पर्यावरण बचाव समितीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

...तर तुमच्यासाठी ठाण मांडून बसू -आदित्य ठाकरे

भकास करून कधी विकास होत नाही. मुख्यमंत्र्यांचा आवडता शब्द पारदर्शक आहे, त्याप्रमाणे सर्व पारदर्शकपणे करा. जनसुनावणीत किती लोकांचे म्हणणे तुम्ही ऐकले? हा प्रकल्प करण्यासाठी किती पर्याय होते. ही जागा निवडल्यानंतर एका कंपनीसाठी इतका फौजफाटा कशाला लागतो. मेगावॉट, मेगावॉट करता पण मेगा वाट तुम्ही लावत आहात. तुम्हाला दमदाटी करतील, खोट्या केसेस करतील. जसे आमदार, खासदारांना विकत घेतात. तसे तुम्हाला विकत घेतले जाईल. राजस्थानसारखे ‘चिपको’ आंदोलन आपल्याला करावे लागेल. तुम्हाला तुमच्या जमिनी वाचवायच्या असतील व प्रकल्प नको असेल तर आम्ही तुमच्यासाठी येथे ठाण मांडून बसण्यास तयार आहोत, असे आश्वासन ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिले.

आवश्यकता नसताना वृक्षतोड करू नये -मुनगंटीवार

‘आवश्यक नसताना कोणतीही वृक्षतोड करू नये, ही राज्य शासनाच्या वनविभागाची आणि केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाची कायमच मूलभूत भूमिका राहिलेली आहे. जर संबंधित प्रकल्पासाठी दुसऱ्या प्रकल्पावर काम करणे शक्य असेल, तर जंगलांचा नाश होण्यापासून वाचवलेच पाहिजे. प्रकल्पांसाठी पर्यायी जागांचा विचार झाला पाहिजे आणि वृक्षतोड कशी टाळता येईल, याचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला पाहिजे,’ अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वृक्षतोडीबाबत स्पष्ट भूमिका मांडत सत्ताधारी भाजपला घरचा आहेर दिला.

महायुतीच्या प्रकल्पालाच विरोध का? -मेघना बोर्डीकर

“वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, महायुतीचा प्रकल्प आला की थयथय नाचणे, अशीच गत विरोधकांची झालेली आहे. कारण जे निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी आहेत, त्यांना माहिती आहे का, कोळशापासून वीजनिर्मिती तयार करताना निसर्गाचा किती ऱ्हास होतो, निसर्गात किती प्रदूषण होते? त्याचाच पर्याय म्हणून हा पंपस्टोरेज प्रकल्प निसर्गाचे संवर्धन करणारा आहे,” असे मत राज्याच्या ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी मांडले.

सह्याद्रीचे वाळवंट करू नका - सयाजी शिंदे

मुंबई : विकासाच्या नावाखाली सह्याद्रीच्या जंगलांचा ऱ्हास सुरू असेल, तर तो रोखण्यासाठी आता जनतेने एकत्र आले पाहिजे, असे आवाहन अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी केले. “जुनी झाडे तोडून नवी झाडे लावण्याचा दिखावा कशासाठी? सह्याद्रीतील नैसर्गिक संपत्ती, जुनी झाडे आणि वन्यजिवांचे अधिवास वाचवण्यासाठी ‘सेव्ह सह्याद्री’ ही मोहीम उभारणार आहोत. या प्रकल्पासाठी झाडांचा बळी देण्याऐवजी पर्यावरणाला कमीत कमी हानी पोहोचेल, अशा पर्यायांचा विचार करावा. भारतातील जंगलांपैकी ५ टक्के जंगल जमीन सह्याद्रीत आहे. येथील वाहत्या नद्या, झाडे, डोंगर यामुळे पाऊस येऊन त्या पाण्यावर महाराष्ट्र जगत आहे. मात्र, त्याच जागेवर टोरंट प्रकल्प आणला जात आहे. शंभर-दीडशे वर्षे जुन्या झाडांची तोड करून, पशुपक्ष्यांची घरे उद्ध्वस्त करण्यातून काय साध्य होणार आहे,” असे आवाहन शिंदे यांनी केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

लोकशाहीवरील हल्ल्याचा विफल प्रयत्न

आजचे राशिभविष्य, २७ ऑक्टोबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Diwali 2026: भाजणीची झंझट नको! मूग डाळ अन् गव्हाच्या पिठापासून बनवा खमंग चकल्या; कुरकुरीतपणा टिकवण्यासाठी खास टिप्स

Diwali 2026 : दिवाळीच्या फराळात यंदा ट्राय करा ओट्स-बदामाचे लाडू; चविष्ट अन् पौष्टिकही, वाचा सोपी रेसिपी

Mumbai : भांडुप स्थानकात रेल्वे रुळ ओलांडताना दुर्घटना; एसी लोकलच्या धडकेत २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू