महाराष्ट्र

काँग्रेसची गॅरंटी ही चायना मालासारखी; केशव उपाध्ये यांची टीका

गेल्या दहा वर्षांत प्रत्येक निवडणुकीत मतदारांनी झिडकारल्यानंतरही पुन्हा एकदा जनतेच्या फसवणुकीसाठी ‘मोहब्बत की दुकान’सारखे फसवे मुखवटे घालून काँग्रेसी नेते जनतेकडे मतांची याचना करत आहेत.

Swapnil S

प्रतिनिधी/मुंबई

अनेक वर्षे देशाची सत्ता भोगणाऱ्या काँग्रेसने ‘गरिबी हटाव’ सारखी अनेक आश्वासने दिली. मात्र यातले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. अशा काँग्रेसने पाच गोष्टींची दिलेली गॅरंटी ही चायना मेड वस्तूंसारखी असल्याची टीका प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“नक्कल करायलाही अक्कल लागते आणि ती अक्कल काँग्रेसकडे नाही. हे मोदी सरकारची नक्कल करून काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी देशाला दाखवून दिले. केवळ एका घराण्याच्या विकासाची गॅरंटी देणाऱ्या काँग्रेसच्या नव्या गॅरंटीमुळे आता देशातील जनता पुन्हा फसणार नाही, उलट देशाच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या मोदी सरकारच्या पारड्यात प्रचंड बहुमताने सत्तेचे दान टाकेल,” असेही त्यांनी सांगितले.

गेल्या दहा वर्षांत प्रत्येक निवडणुकीत मतदारांनी झिडकारल्यानंतरही पुन्हा एकदा जनतेच्या फसवणुकीसाठी ‘मोहब्बत की दुकान’सारखे फसवे मुखवटे घालून काँग्रेसी नेते जनतेकडे मतांची याचना करत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी देशाला विकासाची गॅरंटी दिली. ती पूर्ण करून दाखवली. गरीब, युवक, महिला, शेतकरी या चारच जाती देशात असून त्यांच्या विकासाकरिता भाजप कटिबद्ध असल्याची गॅरंटी पंतप्रधान मोदी यांनी देशाला दिली आहे. ‘गरिबी हटाव’ नारा देणाऱ्या काँग्रेसच्या काही मोजक्या नेत्यांची आणि पक्षाला वेठीस धरणाऱ्या गांधी घराण्याची गरीबी हटली. देश मात्र अधिकाधिक गरीब होत गेला. शेतकरी कर्जबाजारी झाला. शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीच्या नावाखाली बँकांच्या तिजोऱ्या भरून शेतकऱ्याच्या पदरात मात्र कर्जाचे ओझे कायमच ठेवण्याचा पराक्रम काँग्रेसी सत्ताधीशांनी केला,” असेही उपाध्ये म्हणाले.

१० वर्षांत मोदींनी गॅरंटी पूर्ण केली

“पंतप्रधान मोदी केवळ गॅरंटीच्या घोषणा करत नाहीत, तर गेल्या दहा वर्षांत त्यांनी दिलेली प्रत्येक गॅरंटी पूर्ण केल्याचे देशाने अनुभवले आहे. देशातील २५ कोटी लोकसंख्येच्या कपाळावरील दारिद्र्यरेषा मोदी सरकारच्या प्रयत्नांमुळे कायमची पुसली गेली असून जगाने याची दखल घेतली आहे. मोदी सरकारने जाहीर केलेला प्रत्येक संकल्प पूर्ण झाल्याचे चित्र देशाने पाहिले आहे. कलम ३७० रद्द करणे, राम मंदिर उभारणी, औद्योगिक विकास, रोजगाराच्या संधी, महिलांचे सक्षमीकरण अशा प्रत्येक क्षेत्रातील मोदी की गॅरंटी खरी ठरते हे लक्षात आल्यावर आता त्यांच्या गँरंटीची नक्कल करत न्याय आणि विकासाच्या कागदी घोषणा करून काँग्रेस पुन्हा देशातील जनतेला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करत असल्याचेही उपाध्ये म्हणाले.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत