महाराष्ट्र

प्रियकरासोबत पळून गेल्यास कुटुंबाची बदनामी झाली असती; मग होणाऱ्या नवऱ्यालाच दरीत ढकललं, केतन अग्रवाल प्रकरणात नवी माहिती

प्रियकरासोबत पळून गेल्यास कुटुंबाची बदनामी होईल, अशी भीती सिया गोयलला वाटत होती. केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज, कॉल रेकॉर्ड्स आणि तपासातून समोर आलेल्या नव्या माहितींमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

Mayuri Gawade

पुणे : लोहगड किल्ल्यावरून पडून झालेल्या केतन अग्रवालच्या मृत्यूप्रकरणी तपासातून नवे तपशील समोर येत आहेत. प्रियकर चेतन चौधरीसोबत पळून गेल्यास कुटुंबाची बदनामी होईल, अशी भीती सिया गोयलला वाटत होती. त्यामुळे केतन अग्रवाललाच मार्गातून दूर करण्याचा कथित कट रचण्यात आल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

पळून जाण्याऐवजी हा मार्ग का?

पोलिसांच्या मते, सियाचे चेतनसोबत असलेले प्रेमसंबंध आणि केतनशी लग्न करण्याची तिची अनिच्छा हे या गुन्ह्यामागील प्रमुख कारण असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, "चौकशीदरम्यान तपास अधिकाऱ्यांनी चेतन चौधरीला दोघांनी पळून जाण्याचा पर्याय का निवडला नाही आणि त्याऐवजी केतनची हत्या करण्याचा निर्णय का घेतला, असा प्रश्न विचारला. त्यावर चेतनने सांगितले की, सिया साखरपुडा मोडून त्याच्यासोबत पळून जाण्यास तयार नव्हती. असे केल्यास आपल्या कुटुंबाची बदनामी होईल, अशी तिची भावना होती," असे पोलिसांनी सांगितले.

लोहगडला वारंवार नेण्याचा आग्रह

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, सिया गोयलने केतनला अनेकदा लोहगड किल्ल्यावर जाण्यासाठी आग्रह केला होता. ३१ मे रोजी दोघे लोहगडला गेले होते. त्यानंतर ४ जून रोजी पुन्हा तिथे जाण्याचा आग्रह करण्यात आला होता. मात्र त्या वेळी केतनच्या आईने त्याला जाण्यास परवानगी दिली नव्हती. त्यानंतर १४ जून रोजीही दोघे लोहगडवर गेल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

१४ जूनलाच पहिला प्रयत्न झाला होता?

तपासातील माहितीनुसार, १४ जून रोजीच्या भेटीदरम्यान केतनला दरीत ढकलण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र केतनने तेथील फांदीचा आधार घेत स्वतःला सावरल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानंतर सियाने "साप दिसला होता" असे सांगून प्रकार झाकण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही तपास यंत्रणांनी केला आहे. या घटनेनंतरही केतनला कोणताही संशय आला नव्हता, अशी माहिती समोर आली आहे.

सीसीटीव्ही फुटेजमधून वाढला संशय

दरम्यान पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवत कॉल डिटेल रेकॉर्ड, डिजिटल संवाद आणि इतर तांत्रिक पुराव्यांची छाननी सुरू केली. त्याचवेळी लोहगड किल्ल्यावरील सीसीटीव्ही फुटेजचीही बारकाईने तपासणी करण्यात आली.

फुटेजमध्ये केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांच्यामागे काही अंतरावर एक संशयित व्यक्ती चालताना दिसत होती. विशेष म्हणजे, त्या वेळी तापमान सुमारे ३३ अंश सेल्सियस असतानाही संबंधित व्यक्तीने हूडी परिधान केली होती आणि त्याचा चेहरा पूर्णपणे झाकलेला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, एका फुटेजमध्ये सिया अचानक मागे वळून पाहताना दिसते. त्याचवेळी हूडी घातलेली व्यक्ती अचानक खाली बसल्याचेही आढळून आले. या संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांचा संशय बळावला आणि तपास अधिक सखोल करण्यात आला.

कॉल रेकॉर्डमधून उलगडले कथित संबंध

सीसीटीव्ही फुटेजमधून मिळालेल्या धाग्यांनंतर पोलिसांनी सिया गोयलच्या कॉल डिटेल रेकॉर्ड्स (सीडीआर) आणि डिजिटल संवादाची छाननी केली. त्यामध्ये सिया आणि चेतन चौधरी यांच्यामध्ये हजारो फोन कॉल्स झाल्याचे समोर आले. अनेक संभाषणे तासन्तास सुरू असल्याचेही तपासात आढळून आले. पोलिसांच्या मते, या तांत्रिक पुराव्यांमुळे दोघांमधील जवळीक आणि कथित कटाबाबत महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. त्यानंतर सोशल मीडिया प्रोफाइल्स, छायाचित्रे आणि इतर डिजिटल पुराव्यांचीही पडताळणी करण्यात आली.

तांत्रिक पुराव्यांनंतर चेतनपर्यंत पोहोचला तपास

सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्ती आणि सोशल मीडियावरील छायाचित्रांची तुलना केल्यानंतर तपासाची दिशा चेतन चौधरीकडे वळली. कॉल रेकॉर्ड्स, डिजिटल पुराव्यांद्वारे मिळालेल्या धाग्यांच्या आधारे लोणावळा ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी चेतन चौधरीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांच्या मते, तपासादरम्यान समोर आलेल्या विविध पुराव्यांची सांगड घातल्यानंतर या प्रकरणातील कथित कट उघडकीस आला.

केतनच्या वडिलांचा सवाल

दरम्यान, केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. लग्न करायचे नसेल तर सियाने स्पष्टपणे नकार द्यायला हवा होता, असे ते म्हणाले. "तिला हे लग्न मान्य नसेल तर आम्ही ते तात्काळ रद्द केले असते. मात्र इतके टोकाचे पाऊल उचलण्याची गरज काय होती?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच, आपल्या २६ वर्षीय मुलाचा जीव गेला असून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या प्रकरणाचा जलदगती न्यायालयात खटला चालवण्यात यावा, अशी मागणीही अग्रवाल कुटुंबाने केली आहे.

गोयल कुटुंबाची भूमिका अद्याप स्पष्ट नाही

दरम्यान, सिया गोयलच्या अटकेनंतर तिच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. विविध माध्यमांच्या वृत्तानुसार, बिबवेवाडी येथील गोयल कुटुंबाच्या निवासस्थानीही सध्या शांतता असून कुटुंबातील कोणताही सदस्य माध्यमांसमोर आलेला नाही.

Mumbai : मुसळधार पावसात धावत्या लोकलमध्ये क्षुल्लक वाद विकोपाला; २२ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या, आरोपी फरार

Mumbai Rain : मुसळधार पावसाने मुंबईची दाणादाण! ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर परिणाम, पुढील ४८ तास महत्त्वाचे

Navi Mumbai : पाडकाम रोखण्यासाठी कोर्टाचा बनावट आदेश बनवला; न्यायाधीशांचीच केली हुबेहूब खोटी सही, CBD पोलिसांत गुन्हा दाखल

बदलापूर-वांगणी रस्ता मृत्यूचा सापळा? सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

Devgad : कोकणात विनाशकारी प्रकल्प नकोच..! मुणगे ग्रामसभेत तीव्र आंदोलनाचा इशारा