Kolhapur : भरधाव Ertiga ची दुचाकीला जबर धडक; पती-पत्नी थेट हवेत; एकजण जागीच ठार, अंगावर काटा आणणारा Video व्हायरल (X व्हिडीओतून घेतलेले स्क्रीनशाॅट्स)
महाराष्ट्र

Kolhapur : भरधाव Ertiga ची दुचाकीला जबर धडक; पती-पत्नी थेट हवेत; एकजण जागीच ठार, अंगावर काटा आणणारा Video व्हायरल

सकाळी साडेसात ते आठच्या सुमारास त्यांची दुचाकी मिणचे गावाच्या हद्दीत आली. त्याचवेळी समोरून आलेल्या Ertiga कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली...

किशोरी घायवट-उबाळे

कोल्हापूर : नातेवाईकांना भेटून घरी परतण्याचा प्रवास शिंदे कुटुंबासाठी अखेरचा ठरला. पेठवडागाव–हातकणंगले मार्गावर सोमवारी (दि. २८) सकाळी भरधाव Ertiga कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर दीपक रावसाहेब शिंदे (४५) आणि त्यांच्या पत्नी आशाराणी ऊर्फ आशादेवी शिंदे (४०) हे दोघेही दुचाकीसह हवेत फेकले गेले. या दुर्घटनेत दीपक शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला, तर आशाराणी गंभीर जखमी झाल्या. या भीषण अपघाताचा थरार रस्त्यालगतच्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

माहितीनुसार, दीपक शिंदे हे सांगली येथील HDFC बँकेच्या शाखेत मॅनेजर म्हणून कार्यरत होते. मूळचे तळसंदे येथील शिंदे रविवारी पत्नी, मुलगा हर्षवर्धन आणि वडील रावसाहेब यांच्यासह आजारी नातेवाईकाला भेटण्यासाठी वडगाव येथे आले होते. रात्री नातेवाईकांकडे मुक्काम केल्यानंतर सोमवारी सकाळी कुटुंबीय मिरजच्या दिशेने निघाले.

Ertiga ची दुचाकीला जोरदार धडक

दीपक शिंदे हे पत्नी आशाराणी यांच्यासह एका दुचाकीवरून, तर मुलगा आणि आजोबा दुसऱ्या दुचाकीवरून प्रवास करत होते. सकाळी साडेसात ते आठच्या सुमारास त्यांची दुचाकी मिणचे गावाच्या हद्दीत आली. त्याचवेळी समोरून आलेल्या Ertiga कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर दीपक आणि आशाराणी हे दुचाकीसह रस्त्यापासून दूर फेकले गेले. दीपक यांच्या छाती, पोट आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. आशाराणी यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनास्थळी तणावाचे वातावरण

अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. कुटुंबीयांच्या डोळ्यांदेखत झालेल्या या दुर्घटनेने घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दीपक शिंदे यांच्या मृतदेहाची पारगाव येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणी करण्यात आली. त्यानंतर तळसंदे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कारचालकावर गुन्हा दाखल

या प्रकरणी विजय बाळासाहेब यादव (रा. पेठवडगाव) यांच्या फिर्यादीवरून कारचालक साहिल राजू फाजल (२४, रा. यड्राव, ता. शिरोळ) याच्याविरुद्ध वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार इंद्रजित शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. अपघाताचा संपूर्ण प्रकार CCTV मध्ये कैद झाल्याने पोलिसांकडून त्या फुटेजच्या आधारे तपास करण्यात येत आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : १४ फूट उंच झोपड्यांच्या कारवाईवरून विरोधक आक्रमक; काँग्रेस, ठाकरेंच्या शिष्टमंडळांनी घेतली आयुक्तांची भेट

समुद्रातील तरंगता कचरा हटवण्यासाठी रोबोटिक बोटी; ३.६ कोटींच्या प्रकल्पाला BMC ची मंजुरी, गेट वे, बधवार पार्क येथील प्रयोग यशस्वी

मुंबई मेट्रो वनची व्यवस्थापन क्षेत्रात भरारी; एकात्मिक आयएमएस-आयएसएमएस प्रमाणपत्र मिळवणारी देशातील पहिली मेट्रो

Mira-Bhayandar : कृत्रिम तलावांतील मूर्तींवर जेसीबीने भराव; पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

ठाण्यातील आरोग्य केंद्रांवर करडी नजर