बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडपे जिनिलीया देशमुख आणि रितेश देशमुख सोशल मीडियावर नेहमीच त्यांच्या कौटुंबिक क्षणांची झलक चाहत्यांसोबत शेअर करत असतात. आता त्यांचा मोठा मुलगा रिआन याच्या वाढदिवसानिमित्त दोघांनीही खास पोस्ट शेअर केल्या आहेत. २५ नोव्हेंबर रोजी रिआन १२ वर्षांचा झाला. यानिमित्त जिनिलीयाने आई झाल्याच्या पहिल्या क्षणांच्या आठवणींना उजाळा देत भावुक पोस्ट लिहिली, तर रितेशनेही मुलाचे कौतुक करत त्याच्यासाठी खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या पोस्ट चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
आई झाल्याच्या आठवणींना जिनिलीयाने दिला उजाळा
आपल्या भावुक पोस्टमध्ये जिनिलीयाने रिआनच्या जन्माच्या आदल्या रात्रीच्या आठवणींना उजाळा दिला. त्या एका क्षणाने आपले संपूर्ण आयुष्य कायमचे कसे बदलून टाकले, हे तिने सांगितले.
जिनिलीयाने रियानला उद्देशून लिहिले, "मला अजूनही २४ नोव्हेंबरची ती रात्र आठवते. मी गर्भावस्थेत होते आणि मला सांगण्यात आलं होतं की, २५ नोव्हेंबरला माझे बाळ जन्माला येणार आहे. मात्र, त्याचा खरा अर्थ काय आहे, हेही मला तेव्हा माहीत नव्हतं. त्या रात्री मी तुझ्या बाबाच्या कुशीत खूप रडले होते. कारण पुढे माझ्या आयुष्यात काय घडणार आहे, याची मला अजिबात कल्पना नव्हती."
त्यानंतर जिनिलीयाने आपल्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या त्या खास क्षणाची आठवण सांगितली. ती म्हणाली, "आणि मग २५ नोव्हेंबरचा दिवस उजाडला. त्या दिवशी एका चिमुकल्या बाळाचा जन्म झाला आणि त्याच्यासोबत एका आईचाही जन्म झाला. रिआन, हा दिवस माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे, हे तुला शब्दांत सांगता आलं असतं, अशी माझी इच्छा आहे. पण मला वाटत नाही की, ते मी कधीच पूर्णपणे सांगू शकेन. कारण २५ नोव्हेंबर २०१४ हा माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. तुझ्या बाबाच्याही आयुष्यातील तो सर्वात महत्त्वाचा दिवस आहे."
आपल्या पोस्टच्या शेवटी जिनिलीयाने आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहण्याचे आश्वासन दिले. तिने लिहिले, "माझ्या लाडक्या बाळा, मला फक्त तुला एक गोष्ट सांगायची आहे. आयुष्य तुला कुठेही घेऊन जावो, परिस्थिती कशीही असो, मी कायम तुझ्या पाठीशी असेन. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, माझ्या बाळा! तू मला 'आई' ही ओळख दिलीस आणि माझे उरलेले संपूर्ण आयुष्य मी त्या नात्याला साजेसे जगण्यात घालवेन."
रितेशने सांगितले मुलाच्या स्वभावाचे खास वैशिष्ट्य
दरम्यान, रितेश देशमुखनेही आपल्या मुलासाठी प्रेमळ आणि भावनिक वाढदिवसाचा संदेश शेअर केला. या पोस्टमध्ये त्याने रिआनच्या विनोदबुद्धीचे, आत्मविश्वासाचे आणि हजरजबाबीपणाचे कौतुक केले.
रिआनला मोठे होताना पाहण्यात आपल्याला किती आनंद मिळतो, हे सांगत रितेशने आपल्या पोस्टची सुरुवात केली. त्याने लिहिले, "माझ्या लाडक्या रिआन, तुला मोठे होताना पाहणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद आहे. रोज सकाळी उठल्यावर मला एकच उत्सुकता असते की, आज तू मला अशी कोणती नवीन गोष्ट सांगणार आहेस, जी मला माहीत नाही, याची तुला पूर्ण खात्री असते. हो, त्यातले विचित्र गाणी आणि जेन अल्फाची भाषा सोडली तर! पण खरं सांगायचं, तर त्यानेही माझ्या चेहऱ्यावर हसू येते. कारण ते सगळं तुझ्यामुळे असतं."
यानंतर रितेशने रिआनच्या हजरजबाबीपणाचे आणि विनोदबुद्धीचे कौतुक केले. तो म्हणाला, "तुझं व्यक्तिमत्त्व खूप आकर्षक आहे. तुझ्या हजरजबाबीपणाला तोड नाही. तू ज्या पद्धतीने माझी फिरकी घेतोस, त्यावर मला उत्तरच सुचत नाही. आणि खरं सांगायचं, तर मला त्यात काहीही बदल करायचा नाही. तू जिथे जातोस, तिथे हास्य पसरवतोस. प्रत्येक खोलीत आणि माझ्या मनातही तू आनंद भरून टाकतोस."
'ज्या दिवशी तू मला हरवशील, तो माझ्यासाठी अभिमानाचा क्षण असेल'
रितेशने आपल्या मुलासोबत असलेल्या मैत्रीपूर्ण स्पर्धेबद्दलही भावना व्यक्त केल्या. तसेच भविष्यात मुलाने यशस्वी व्हावे, अशी इच्छाही व्यक्त केली.
त्याने लिहिले, "तू मला तुझा प्रतिस्पर्धी मानतोस आणि मला हरवण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतोस, ही गोष्ट मला खूप आवडते. मी तुला सहजासहजी जिंकू देणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या दिवशी तू मला हरवशील, त्या दिवशी माझ्यापेक्षा जास्त आनंदी या जगात कोणीही नसेल. तुझ्याकडून हरणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात अभिमानाचा क्षण असेल."
पोस्टच्या शेवटी रितेशने आपल्या मुलासाठी खास प्रेमळ संदेश लिहिला. "माझ्या आयुष्याचं प्रेम आणि अभिमान - रिआन, वाढदिवसच्या खूप खूप शुभेच्छा बेटा!"
रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांनी २०१२ मध्ये लग्न केले. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांच्या पहिल्या मुलाचा, 'रिआन'चा जन्म झाला. तर २०१६ मध्ये त्यांचा दुसरा मुलगा 'राहील' याचा जन्म झाला. दोघेही अनेकदा आपल्या मुलांसोबतचे मजेशीर आणि भावनिक क्षण सोशल मीडियावर शेअर करत असतात. रिआनच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या या खास पोस्टमधून दोघांचेही मुलावरील प्रेम पुन्हा एकदा दिसून आले आहे.