महाराष्ट्र

'ChatGPT मुळे इंग्रजी आणि मराठी लेखन सुधारलं'; SSC मध्ये १०० टक्के मिळवणाऱ्या आर्य नाईकची राज्यभर चर्चा

कोल्हापूरच्या आर्य गौतम नाईकने SSC २०२६ परीक्षेत १०० गुण मिळवत यश मिळवलं. इंग्रजी आणि मराठी लेखन सुधारण्यासाठी ChatGPT ची मदत झाल्याचं आर्यने सांगितलं आहे.

Mayuri Gawade

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या दहावीच्या निकालात कोल्हापूर विभागाने यंदाही दमदार कामगिरी केली आहे. राज्यात दुसऱ्या क्रमांकाची नोंद करत कोल्हापूर विभागाचा निकाल ९५.४७ टक्के लागला. विशेष म्हणजे, विभागातील तब्बल १५ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवत शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली.

यामध्ये कोल्हापूरच्या श्रीमंत माईसाहेब बावडेकर अकॅडमीचा विद्यार्थी आर्य गौतम नाईक याने SSC परीक्षेत १०० पैकी १०० टक्के गुण मिळवत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

“१०० टक्के मिळतील असं कधी वाटलं नव्हतं”

आर्यने ‘द फ्री प्रेस जर्नल’शी बोलताना सांगितलं की, तो नेहमीच ९७ ते ९८ टक्क्यांच्या श्रेणीत गुण मिळवत होता. मात्र, SSC मध्ये परफेक्ट स्कोअर मिळेल, अशी अपेक्षा त्यालाही नव्हती.

“खरं सांगायचं तर मला १०० टक्के मिळतील असं वाटलं नव्हतं. पण माझ्या शिक्षकांचा आणि आई-वडिलांचा माझ्यावर खूप विश्वास होता. प्रयत्न सुरू ठेवले तर हे शक्य आहे, असं ते नेहमी सांगायचे,” असं आर्य म्हणाला.

रट्टा नाही, संकल्पना समजून अभ्यास

आर्यच्या मते, सातत्यपूर्ण अभ्यास आणि संकल्पना समजून घेण्यावर त्याने भर दिला. शैक्षणिक वर्षभर तो दररोज सुमारे दीड तास अभ्यास करत होता. त्यासोबत नियमित पुनरावृत्ती आणि वर्गातील शिकवणीवर त्याचा भर होता.

परीक्षेच्या शेवटच्या महिन्यात मात्र त्याने दररोज ७ ते ८ तास अभ्यास केला.

“मी नियमित अभ्यास करत होतो आणि वेळोवेळी संकल्पना स्पष्ट करून घेत होतो. परीक्षेच्या आधीच्या महिन्यात अभ्यासाचा वेळ वाढवला,” असं त्याने सांगितलं.

ChatGPT चा केला वापर

आर्यने अभ्यासादरम्यान ChatGPT सारख्या AI टूल्सचाही मर्यादित वापर केल्याचं सांगितलं. विशेषतः इंग्रजी आणि मराठीमधील क्रिएटिव्ह लेखन सुधारण्यासाठी त्याची मदत झाली, असं तो म्हणाला.

“मी ChatGPT चा थोडासा वापर केला. विशेषतः क्रिएटिव्ह भाषेसाठी त्याचा उपयोग झाला. इंग्रजी आणि मराठी लेखन सुधारायला मदत झाली. मात्र, मी त्याचा वापर फक्त रेफरन्ससाठीच केला,” असं आर्यने स्पष्ट केलं.

अभ्यासासोबत क्रिकेट आणि संगीताचीही आवड

अभ्यासाबरोबरच आर्यला क्रिकेटचीही विशेष आवड आहे. तो शाळेकडून सामने खेळला असून, पूर्वी क्रिकेट अकॅडमीतही सरावासाठी जात होता.

याशिवाय त्याला संगीताचीही आवड आहे. तो हार्मोनियम वाजवतो आणि गांधर्व महाविद्यालयाच्या तीन परीक्षा त्याने दिल्या आहेत.

या संगीत क्षेत्रातील कामगिरीमुळे SSC मध्ये त्याला अतिरिक्त ग्रेस मार्क्स मिळाले आणि त्यामुळे १०० टक्क्यांचा टप्पा गाठण्यास मदत झाल्याचं त्याने सांगितलं.

CA होण्याचं स्वप्न

आर्यने भविष्यात चार्टर्ड अकाउंटंट (CA) होण्याचा निर्णय आधीच घेतला आहे. आठवीपासूनच CA करण्याचं ध्येय त्याने ठरवलं होतं.

“मी कॉमर्स शाखा निवडणार आहे आणि पुढे CA करणार आहे. माझे वडील स्वतः CA आहेत आणि आई ११वी-१२वी कॉमर्स तसेच CA फाउंडेशनचे क्लासेस घेतात. त्यामुळे घरातूनच चांगलं मार्गदर्शन मिळालं,” असं तो म्हणाला.

कोल्हापूर विभागाची दमदार कामगिरी

महाराष्ट्र SSC फेब्रुवारी २०२६ परीक्षेत कोल्हापूर विभागाने राज्यात दुसरा क्रमांक मिळवला. विभागातून १ लाख २९ हजार ४९९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख २९ हजार ६ विद्यार्थी परीक्षेला बसले आणि १ लाख २३ हजार १७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

कोकण विभाग ९७.६२ टक्क्यांसह राज्यात अव्वल ठरला, तर कोल्हापूरने मुंबई (९४.९७%), पुणे (९४.२४%) आणि नाशिक (९०.५३%) या विभागांनाही मागे टाकलं.

तसेच विभागातील १५ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवत कोल्हापूरच्या शैक्षणिक यशाची परंपरा आणखी मजबूत केली आहे.

कोलकात्यात बांधकामाधीन गोदामाचे छत कोसळले; ३ ठार, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, Video

Mumbai : महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये पडला सफाई कर्मचारी; अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा, Video

'सत्य सांगणं इतकं कठीण झालंय का?' केतन अग्रवाल प्रकरणावर हिना खानची प्रतिक्रिया; म्हणाली, "त्याचा जीव वाचला असता...

प्रियकरासोबत पळून गेल्यास कुटुंबाची बदनामी झाली असती; मग होणाऱ्या नवऱ्यालाच दरीत ढकललं, केतन अग्रवाल प्रकरणात नवी माहिती

Mumbai : मुसळधार पावसात धावत्या लोकलमध्ये क्षुल्लक वाद विकोपाला; २२ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या, आरोपी फरार