अलिबाग : मुरूडजवळील कोर्लई समुद्रकिनारी रविवारी रात्री आढळून आलेली संशयास्पद वस्तू 'पाकिस्तानी बोट' असल्याचा संदेश मिळताच सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली होती. मात्र, सखोल तपासानंतर ती वस्तू बोट नसून मासेमारीसाठी वापरला जाणारा फ्लोटिंग बोया असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानी मच्छीमारांचा बोया भारतीय समुद्र हद्दीत वाहून आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी रायगड पोलिसांनी आणि तटरक्षक दलाने संयुक्तरीत्या शोधमोहीम राबवत खुलासा केला आहे.
या बोयाचा वापर मासेमारीदरम्यान जाळी ओढण्यासाठी व त्याची स्थिरता राखण्यासाठी केला जातो. यापूर्वीही अशा प्रकारची तरंगती यंत्रणा गुजरातच्या ओखा किनाऱ्यावर आढळून आली होती. त्यामुळे सदर घटना नव्याने घडलेली नसली तरीही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ती अत्यंत महत्त्वाची मानली गेली होती.
तटरक्षक दलाकडून रविवारी रात्री संदेश प्राप्त होताच स्थानिक पोलीस, नौदल, गुप्तचर यंत्रणा आणि अन्य सुरक्षा यंत्रणा तत्काळ सतर्क झाल्या होत्या. या धावपळीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक जनतेमध्येही काहीसा तणाव निर्माण झाला होता. मात्र, ही वस्तू बोट नसून बोया असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे सर्वांनीच सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
सदर वस्तू ही पाकिस्तानी मासेमारांनी वापरण्यात येणारी जीपीएस ट्रॅकरसह सुसज्ज अशी एआयएस ट्रान्सपॉन्डर यंत्रणा असलेली बोया आहे. ती समुद्राच्या प्रवाहामुळे वाहून भारतीय जलसीमेत आली होती. - आंचल दलाल, पोलीस अधीक्षक रायगड