मुंबई : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचे फेब्रुवारी व मार्च या दोन्ही महिन्यांचे पैसे शुक्रवारी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले. ८ मार्च या ‘जागतिक महिला दिना’च्या पूर्वसंध्येला राज्यातील दोन कोटी ५२ लाख लाडक्या बहिणींना १५०० रुपयांचे दोन हप्ते त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने जुलै २०२४ मध्ये ‘लाडकी बहीण’ योजना जाहीर केली. त्यानंतर पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात झाली. ऑगस्ट ते डिसेंबर २०२४ पर्यंत या योजनेंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले होते.
महायुतीने केलेली घोषणा फसवी असून विधानसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण पोरकी होणार, योजना बंद होणार, अशी टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली होती. मात्र, सत्तेवर आल्यानंतर महायुती सरकारने जानेवारी २०२५ चा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा केला. नंतर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे पैसे देणे बाकी होते. आता ८ मार्च या ‘जागतिक महिला दिना’चे औचित्य साधून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात फेब्रुवारी व मार्च असे दोन्ही महिन्यांचे पैसे जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवार, ७ मार्चला दोन कोटी ५२ लाख पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात आल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले.
लाडक्या बहिणींना दिले पाच महिन्यांत १७,५०५ कोटी रुपये
योजना सुरू झाल्यापासून डिसेंबरपर्यंत पाच महिन्यात एकूण २ कोटी ३८ लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात १७,५०५.९० कोटी रुपये जमा करण्यात आल्याचे राज्य सरकारच्या अर्थसंकल्पपूर्व आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे.
'लाडकी बहीण योजना' सुरूच राहील आणि या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीचा प्रत्यक्ष लाभ लाभार्थींना मिळावा यासाठी सरकार कार्यरत आहे. लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही. राज्य सरकार आर्थिक मदतीचा योग्य फायदा लाभार्थींना मिळावा यासाठी प्रयत्नशील आहे. ही योजना प्रभावीपणे राबवली जाईल. डिसेंबर २०२४ पर्यंत योजनेअंतर्गत २.३८ कोटी महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात एकूण १७,५०५.९० कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री