महाराष्ट्र

२६.३४ लाख लाडक्या बहिणी अपात्र; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत आणखी २६.३४ लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. माहिती व तंत्रज्ञान विभागाने दिलेल्या माहितीनुसार या महिला अपात्र ठरल्याचे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

Swapnil S

मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत आणखी २६.३४ लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. माहिती व तंत्रज्ञान विभागाने दिलेल्या माहितीनुसार या महिला अपात्र ठरल्याचे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. दरम्यान, चुकीच्या पद्धतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्यांवर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कारवाई करण्यात येईल, असा इशारा मंत्री आदिती तटकरे यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती. यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे, काही कुटुंबांमध्ये २ पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे, तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आल्या आहेत. या माहितीच्या आधारे जून २०२५ पासून या २६.३४ लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त सुमारे २.२५ कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून २०२५ महिन्याचा सन्मान निधी वितरीत करण्यात आला आहे.

तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या २६.३४ लाख लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल, असे मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट केले आहे.

बनावट लाभार्थ्यांवर कारवाई?

शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल, असा इशारा आदिती तटकरे यांनी दिला आहे.

पहलगामच्या हल्लेखोरांचा खात्मा? श्रीनगरमध्ये ऑपरेशन 'महादेव'; चकमकीत ३ दहशतवादी ठार

नागपूरच्या दिव्या देशमुखचा ऐतिहासिक विजय; बुद्धीबळ विश्वचषकात बाजी, ठरली पहिली भारतीय महिला विश्वविजेती

"प्रत्येक गोष्टीला..."; रेव्ह पार्टी प्रकरणात पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसे यांची पहिली प्रतिक्रिया

Baramati : नियतीचा क्रूर खेळ! दोन मुलींसह वडिलांचा अपघातात मृत्यू; धक्क्याने २४ तासांतच आजोबांनीही सोडला जीव

"आता इतक्या पैशांमध्ये..."; ‘शोले’च्या तिकीटाचा फोटो शेअर करत बिग बींची खास पोस्ट