हारुन शेख/लासलगाव :
आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी मध्य रेल्वेने मालवाहतूक अधिक गतिमान आणि वेळेत करण्याच्या दृष्टीने ९५ गुड्स शेड्सचे नवीन वार्षिक वर्गीकरण जाहीर केले आहे. यामध्ये लासलगावसह ११ गुड्स शेड्सना उच्च श्रेणीत पदोन्नती मिळाली असून यामुळे रेल्वेच्या मालवाहतूक व्यवस्थेला नवी गती मिळणार आहे. पण त्याचबरोबर लालसगाव कांदा बाजारपेठ अधिक मजबूत होणार असून त्यामुळे एक प्रकारे तिचा विस्तारच होणार आहे. दरम्यान, नवीन वर्गीकरण १ जुलैपासून लागू करण्यात आले आहे.
रेल्वेकडून दरवर्षी माल हाताळणीची क्षमता, कामकाजाची कार्यक्षमता आणि उपलब्ध सुविधांच्या आधारे गुड्स शेड्सचे वर्गीकरण केले जाते. यंदा ९५ गुड्स शेड्सपैकी ४२ गट-१, १२ गट-२ आणि ४१ गट-३ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. या व्यवस्थेमुळे मालगाड्यांच्या वॅगनचा अनावश्यक थांबा कमी होऊन रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा अधिक परिणामकारक वापर होणार आहे.
देशातील प्रमुख कांदा बाजारपेठ म्हणून लासलगावची ओळख अधिक बळकट होण्यास या निर्णयाची मदत होईल. मालाची लोडिंग-अनलोडिंग प्रक्रिया अधिक वेगवान होऊन रेल्वे मालवाहतुकीत कार्यक्षमता वाढेल. त्यामुळे शेतकरी, व्यापारी, निर्यातदार आणि बाजार समितीशी संबंधित सर्व घटकांना याचा थेट लाभ मिळणार आहे.डी. के. जगताप, सभापती, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती
उद्योगांना, शेतकऱ्यांना होणार फायदा
या नव्या वर्गीकरणामुळे लासलगावसारख्या महत्त्वाच्या कृषी मालवाहतूक केंद्रातून होणारी मालाची वाहतूक अधिक कार्यक्षम होण्यास मदत मिळणार असून व्यापारी, उद्योग आणि शेतकरी वर्गालाही त्याचा लाभ होणार आहे. मध्य रेल्वेकडून लासलगाव गुड्स शेडला उच्च श्रेणीत स्थान देण्यात आल्याने लासलगावच्या कृषी बाजारपेठेच्या कार्यक्षमतेची दखल घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
शुल्क दर लागू
लोडिंग आणि अनलोडिंगसाठी निश्चित करण्यात आलेली मोफत वेळ संपल्यानंतर आकारण्यात येणाऱ्या ‘व्हार्फेज शुल्काचे दरही रेल्वेने जाहीर केले. त्यानुसार गट-१ साठी प्रतिवॅगन प्रतितास १५० रुपये, गट-२ साठी १२० रु. आणि गट-३ साठी ७५ रु. शुल्क आकारले जाईल.
या गुड्स शेडचा समावेश
नागपूरमधील राजूर, न्यू बल्हारशाह, चंद्रपूर, मुलताई, मरामझिरी, देवळी, पुण्यातील श्रीगोंडा रोड व विलद, सोलापूरच्या शिवगाव व ताज सुलतानपूर तसेच भुसावळमधील लासलगाव, मर्यारगाव यांचा समावेश आहे.