लातूर : जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांची व्यथा पाहून संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता. वीज कोसळून एका बैलाचा मृत्यू झाल्याने पैशांअभावी त्यांनी आपल्या पत्नीलाच औताला जुंपून शेताची मशागत सुरू केली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने १० जून रोजी तातडीने त्यांना एक बैल दिला. मदतीचा मोठा गाजावाजा करत पशुसंवर्धन विभागाने दिलेला हा बैल दोनच दिवसांत शेतात काम करताना खाली बसला आणि त्याने मान टाकली. पशुवैद्यकीय डॉक्टरांनी तपासणी केली असता हा बैल गंभीर आजारी असल्याचे समजले. परिणामी, संकटग्रस्त शेतकऱ्याला मदत मिळण्याऐवजी आता त्या आजारी बैलाच्या उपचाराचा अतिरिक्त आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे. या प्रकरणी शेतकरी म्हणाला की, ‘शुक्रवारी वीज पडल्यानंतर तलाठी, डॉक्टर आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन बैल देत असल्याचे सांगितले. त्या बैलाच्या खांद्यावर जू ठेवल्यावर तो लगेच खाली बसला.
सुदृढ बैल देण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश
प्रशासनाच्या या अजब कारभाराची बातमी वाऱ्यासारखी पसरताच सरकारवर चौफेर टीका होऊ लागली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने आदेश दिले आहेत. शेतकरी काशिनाथ गायकवाड यांना त्यांच्या पसंतीचा आणि संपूर्ण सुदृढ असलेला नवीन बैल खरेदी करून देण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
कागदी घोडे आणि कार्यालयाचे हेलपाटे
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रशासकीय हालचाली तर सुरू झाल्या आहेत, मात्र लालफितीचा कारभार अद्याप संपलेला नाही. नव्या बैलाच्या खरेदीसाठी शेतकरी काशिनाथ गायकवाड यांना त्यांच्या गावापासून दूर लातूर येथील जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयात बोलावण्यात आले आहे. पेरणीचे दिवस तोंडावर आले असताना शेतकरी शेती सोडून शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारत आहे. हा बैल कुठून खरेदी होणार, कधी मिळणार याबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती दिली गेलेली नाही. त्यामुळे 'मदत देता की छळ करता?' असा उद्विग्न सवाल आता लातूरचा बळीराजा विचारत आहे.
गोशाळेतील आजारी बैल मारला गळ्यात?
या संतापजनक प्रकारामुळे लातूर जिल्हा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र टीका होत आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला शेतीच्या कामासाठी सक्षम आणि सुदृढ बैल देण्याऐवजी प्रशासनाने त्याची आरोग्य तपासणी केली होती का? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. तत्काळ मदतीची कौतुकास्पद पाठ थोपटून घेण्यासाठी प्रशासनाने गोशाळेतील एक आजारी बैल शेतकऱ्याच्या गळ्यात मारल्याची संतप्त चर्चा आता देवणी परिसरात सुरू झाली आहे. या कामचलाऊ आणि बेजबाबदार निर्णयामुळे शेतकऱ्याची अडचण कमी होण्याऐवजी उलट वाढली आहे.