विलास तेरकर / लातूर :
लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या तूर पिकाला यंदाच्या दुष्काळी परिस्थितीचा मोठा फटका बसला आहे. लातूरच्या बाजारपेठेत तुरीची आवक अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मात्र, यंदा पावसाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे तुरीची आवक घटून अवघ्या १० टक्क्यांवर आल्याचे चित्र आहे. परिणामी, बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात मंदावली असून, जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचे आर्थिक चक्रच विस्कळीत झाले आहे.
दरवर्षी तूर पिकाच्या माध्यमातून होणारी सुमारे २० ते २५ हजार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल यंदा संकटात सापडल्याचे चित्र आहे. ही परिस्थिती शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, हमाल, वाहतूकदार आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी चिंताजनक ठरत आहे.
तूर हे अर्थव्यवस्थेला चालना देणारे साधन
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा यांनी ‘नवशक्ती’शी बोलताना तुरीची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याच्या बाबीकडे लक्ष वेधले. यंदाच्या कमी पावसाच्या परिस्थितीमुळे तुरीची आवक मोठ्या प्रमाणात घटली असून, त्याचा थेट परिणाम बाजारपेठेतील आर्थिक उलाढालीवर झाला असल्याचे त्यांनी सांगितले. लातूर जिल्ह्यात तूर हे केवळ एक पीक नसून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारे महत्त्वाचे आर्थिक साधन आहे. तूर उत्पादनापासून काढणी, मळणी, वाहतूक, बाजारपेठेतील खरेदी-विक्री आणि प्रक्रिया उद्योगांपर्यंत अनेक घटकांची आर्थिक साखळी या पिकाशी जोडलेली आहे. त्यामुळे तुरीचे उत्पादन घटले किंवा बाजारपेठेत आवक कमी झाली, तर त्याचा परिणाम केवळ शेतकऱ्यांपुरता मर्यादित राहत नाही. संपूर्ण बाजारपेठेतील व्यवहारांवर त्याचे पडसाद उमटतात.
छोट्या व्यवसायावरही संकट
दुष्काळी परिस्थितीचा सर्वाधिक परिणाम अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजुरांवर होत आहे. शेतीतील कामांचे प्रमाण कमी झाल्यास शेतमजुरांना नियमित रोजगार मिळणे कठीण होते. काढणी, मळणी आणि इतर शेतीकामांतून मिळणाऱ्या मजुरीवर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. शेतीतून मिळणारे उत्पन्न घटल्याने शेतकऱ्यांची खर्च करण्याची क्षमता कमी होते. त्याचा परिणाम ग्रामीण बाजारपेठेतील मागणीवर होतो. परिणामी, व्यापारी, हमाल, वाहतूकदार आणि छोट्या व्यावसायिकांच्या व्यवसायावरही संकट निर्माण होते.
आर्थिक साखळीवरही परिणाम
ग्रामीण अर्थव्यवस्थेत शेतकऱ्यांच्या हातात आलेला पैसा विविध माध्यमांतून पुन्हा बाजारपेठेत फिरत असतो. शेतकरी शेतीसाठी साहित्य खरेदी करतो, मजुरांना मजुरी देतो, वाहतूकदारांना पैसे देतो आणि दैनंदिन गरजांसाठी खर्च करतो. या व्यवहारांतून अनेक घटकांना रोजगार आणि उत्पन्न मिळते. मात्र, तुरीचे उत्पादन आणि बाजारपेठेतील आवक घटल्याने या आर्थिक साखळीवर परिणाम झाला आहे. एका घटकाचे उत्पन्न कमी झाले की त्याचा परिणाम इतर घटकांवरही होतो. त्यामुळे तुरीच्या अर्थचक्राला बसलेला फटका संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेला जाणवत आहे.
पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे गरजेचे
‘दुष्काळामुळे शेतीचे अर्थकारण कोलमडले असून, आर्थिक उलाढालीवर त्याचा गंभीर परिणाम होत आहे,’ अशी भावना शेतकरी हरिराम बाणापुरे यांनी व्यक्त केली. लातूर जिल्ह्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्यासाठी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणे आवश्यक आहे. नुकसानग्रस्त पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणे, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
अर्थचक्रावरील संकट गडद होण्याची भीती
तूर पिकाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होणाऱ्या लातूरच्या बाजारपेठेला यंदा प्रतिकूल परिस्थितीचा मोठा फटका बसला आहे. तुरीची आवक घटल्याने बाजारपेठेतील व्यवहार मंदावले असून, त्याचा परिणाम शेतकऱ्यांपासून व्यापाऱ्यांपर्यंत आणि शेतमजुरांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत जाणवत आहे. तुरीचे पीक, शेतकऱ्यांच्या हातातील पैसा आणि बाजारपेठेतील व्यवहार यांची साखळी पुन्हा गतिमान झाली, तरच लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला दिलासा मिळू शकेल. अन्यथा दुष्काळाच्या झळांमुळे ग्रामीण अर्थचक्रावरील संकट अधिक गडद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर झालाय परिणाम
यंदाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांच्या हातात पैसा कमी आल्याने बाजारपेठेतील खरेदी-विक्रीचे व्यवहारही मंदावले आहेत. तुरीच्या आवकेवर अवलंबून असलेल्या व्यापाऱ्यांसह बाजार समितीतील विविध घटकांनाही या परिस्थितीचा फटका बसत आहे.
वाढतोय आर्थिक ताण
शेतीसाठी बियाणे, खते, कीटकनाशके, मशागत आणि मजुरी यांसाठी मोठा खर्च करावा लागतो. मात्र, प्रतिकूल परिस्थितीमुळे अपेक्षित उत्पादन मिळाले नाही, तर हा खर्च वसूल करणेही शेतकऱ्यांसाठी कठीण होते. त्यातच कुटुंबाचा दैनंदिन खर्च, मुलांचे शिक्षण, आरोग्यावरील खर्च आणि कर्जाची परतफेड अशा जबाबदाऱ्यांमुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण वाढत आहे. शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने ग्रामीण भागातील बाजारपेठेतील आर्थिक व्यवहारांवरही परिणाम होत आहे. किराणा दुकानदार, कृषी सेवा केंद्रे, छोटे व्यावसायिक आणि विविध सेवा पुरवणाऱ्या घटकांची आर्थिक घडी विस्कटत आहे.