मुंबई : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून राज्यात २०२२ मध्ये ३ लाख ७४ हजार ३८ गुन्हे घडले होते. २०२२ च्या तुलनेत २०२४ मध्ये ३ लाख ८५ हजार ४३८ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश नंतर गुन्हेगारीत देशात महाराष्ट्र तिसऱ्या नंबरवर आहे. त्यामुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढेपाळली आहे, असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार विधानसभा सदस्य सुनील प्रभू यांनी सोमवारी विधानसभेत केला.
परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांनी केलेल्या मारहाणीत पोलीस कोठडीत मृत्यू झाला, असा ठपका न्यायालयाने ठेवला आहे. मात्र अद्याप कोणावर कारवाई नाही. पुण्यात आंतरजातीय विवाह केल्याने विक्रम गायकवाड यांना जबर मारहाण केल्याचे प्रकरण समोर आले आहे. बदलापूरमधील घटनेतील अक्षय शिंदे यांचा फेक एन्काऊंटर झाला. न्यायालयाने ताशेरे ओढले, मात्र कारवाई शून्य, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी विधानसभेत केला. २९३ अंतर्गत अंतिम आठवडा प्रस्तावावर विरोधकांनी राज्यातील कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करत महायुती सरकारला धारेवर धरले.
परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस मारहाणीत पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याचे ताशेरे न्यायालयाने ओढले. मात्र कोणावरही कारवाई झालेली नाही. या सरकारला गरीबांची जाण नाही का? सर्वसामान्यांनी न्याय कोणाकडे मागायचा? या सरकारला सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा तळतळाट सहन करावा लागेल, असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले. परभणीतील संतोष सूर्यवंशी मृत्यू प्रकरणावरून पोलीस यंत्रणा आणि राज्य सरकारला जितेंद्र आव्हाड यांनी धारेवर धरले. बदलापूर येथील एका खासगी शाळेत दोन मुलींवर अत्याचाराची घटना घडली. या घटनेतील संशयित आरोपी अक्षय शिंदे याचा फेक एन्काऊंटर करण्यात आला. अक्षय शिंदे याचा फेक एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला याबाबत न्यायालयानेही टिपण्णी केली. मात्र सरकार काहीच कारवाई करत नाही. संतोष देशमुख यांच्या हत्येतील फोटो व व्हिडीओ वायरल झाल्याने एका मंत्र्याचा राजीनामा आला. आका फक्त बीडमध्ये नसून संपूर्ण राज्यात आका आहेत, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केला. वर्षभरात ऑनर किलिंगची ९ प्रकरणे झाली, याकडे जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
जन सुरक्षा कायदा गळा आवळणारा
महाराष्ट्रात जन सुरक्षा कायदा आणण्याची हालचाल सुरू आहे. जन सुरक्षा कायदा विद्रोही चळवळ, महाराष्ट्राला संपवणारा आहे. ताडासारखा कायदा आणला होता. मात्र तो नंतर मागे घेण्यात आला. जन सुरक्षा कायदा हा घातक असून हा कायदा महाराष्ट्राचा गळा आवळणारा असून महायुती सरकारने याबाबत विचार करावा, अशी सूचना जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केली.
पोलिसांची २१ हजार पदे रिक्त
राज्याची लोकसंख्या १२ कोटींच्या घरात पोहोचली आहे. मात्र राज्यात पोलिसांची मंजूर पदे २ लाख १९ हजार ८२२ आहेत. मात्र १ लाख ९८ हजार ८०७ पदे भरण्यात आली आहेत. तरी २१ हजार १०८ पदे रिक्त आहेत. पदे रिक्त असल्याने पोलिसांवर कामाचा ताण येतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खाते असून मागेही त्यांच्याकडे गृह खाते होते. मात्र राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढेपाळत असून हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही, असा चिमटा सुनील प्रभू यांनी फडणवीस यांचे नाव न घेता काढला.