महाराष्ट्र

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘रत्नागिरीचा राजा’ शहरात दाखल; हापूसच्या आगमनाने बाजारात सुगंध, दर मात्र दुपटीने वाढले

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कोकणातील प्रसिद्ध हापूस आंब्याचे शहरात आगमन झाले असून आंबाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Swapnil S

छत्रपती संभाजीनगर : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कोकणातील प्रसिद्ध हापूस आंब्याचे शहरात आगमन झाले असून आंबाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. रत्नागिरी आणि देवगड परिसरातील हापूस आंब्याच्या पेट्या छत्रपती संभाजीनगरच्या घाऊक बाजारात दाखल होऊ लागल्या आहेत. मात्र यंदा बाजारात आवक कमी असल्याने दर जवळपास दुपटीने वाढल्याची माहिती आंबा विक्रेत्यांनी दिली.

उन्हाळ्याची चाहूल लागताच बाजारात विविध प्रकारची हंगामी फळे येण्यास सुरुवात होते. त्यामध्ये ‘फळांचा राजा’ म्हणून ओळखला जाणारा हापूस आंबा ग्राहकांची सर्वाधिक पसंती मिळवतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही बाजारात हापूस आंब्याची विक्री सुरू झाली असून शहरातील विविध भागांत आंब्यांची दुकाने सजू लागली आहेत. विशेषतः रत्नागिरी आणि देवगड परिसरातील दर्जेदार हापूस आंब्याला ग्राहकांकडून मोठी मागणी आहे.

सध्या बाजारात हापूस आंब्याचे दर सुमारे १५०० रुपये डझन इतके असून मागील वर्षी हेच आंबे ७०० ते ७५० रुपये डझन दराने विकले जात होते. त्यामुळे दर जास्त असले तरी दर्जेदार देवगड व रत्नागिरी हापूस खरेदीसाठी ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता दिसून येत आहे. हापूस आंब्याच्या आगमनामुळे छत्रपती संभाजीनगरच्या बाजारात पुन्हा एकदा आंब्याचा दरवळ जाणवू लागला आहे. दर जास्त असले तरी पहिल्या हापूसची चव घेण्यासाठी अनेक ग्राहक बाजारात गर्दी करताना दिसत आहेत.

आवक वाढल्यावर दर कमी होण्याची शक्यता

कोकणातील बागांमध्ये आता हळूहळू आंबा काढणीला सुरुवात होत आहे. पुढील १० ते १५ दिवसांत बाजारात मोठ्या प्रमाणात आवक वाढेल, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. आवक वाढल्यानंतर दर काही प्रमाणात स्थिर होण्याची शक्यता आहे.

पंधरा दिवस उशिरा सुरू झाला सिजन

यंदा कोकण पट्ट्यात बदलते हवामान, काही ठिकाणी झालेला अवेळी पाऊस आणि थंडीचा वाढलेला कालावधी यामुळे आंब्याची मोहोर व फळधारणा उशिरा झाली. त्यामुळे दरवर्षी फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू होणारी आवक यंदा मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू झाली आहे. परिणामी शहरात हापूस आंब्याचे आगमन सुमारे पंधरा दिवस उशिरा झाले असल्याचे व्यापारी राजू आंबेवाले यांनी सांगितले.

दिल्लीत ५ मजली PG इमारत जमीनदोस्त; एकाचा मृत्यू, अनेक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

VIDEO : जखमी गोविंदांच्या उपचारावरून पालघरच्या रुग्णालयात कर्मचाऱ्याला मारहाण; शिवसेना आमदार पुत्रासह १७ जणांवर गुन्हा

जन्माष्टमीच्या रात्री संतापजनक प्रकार! मंदिरात जात असलेल्या १४ वर्षीय मुलीचं अपहरण अन्...

Mumbai : गणेशभक्तांना दिलासा; मध्यरात्रीपर्यंत धावणार ॲक्वा लाईन मेट्रो, जाणून घ्या वेळ

Delhi : उशिरा घरी परतल्याने कुटुंबीय रागावले; १३ वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल