महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; ‘लोणार’चा जागतिक भूवैज्ञानिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश  
महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; ‘लोणार’चा जागतिक भूवैज्ञानिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

उल्कापातामुळे निर्माण झालेले बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर आता जागतिक स्तरावर विशेष ओळख मिळवणार आहे. लोणार सरोवराचा समावेश प्रतिष्ठेच्या ‘थर्ड १०० आययूजीएस जिऑलॉजिकल हेरिटेज साइट्स’ अर्थात आंतरराष्ट्रीय भूवैज्ञानिक वारसा स्थळांच्या तिसऱ्या १०० स्थळांच्या यादीत करण्यात आला आहे.

Swapnil S

नागपूर : उल्कापातामुळे निर्माण झालेले बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर आता जागतिक स्तरावर विशेष ओळख मिळवणार आहे. लोणार सरोवराचा समावेश प्रतिष्ठेच्या ‘थर्ड १०० आययूजीएस जिऑलॉजिकल हेरिटेज साइट्स’ अर्थात आंतरराष्ट्रीय भूवैज्ञानिक वारसा स्थळांच्या तिसऱ्या १०० स्थळांच्या यादीत करण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय भूवैज्ञानिक विज्ञान संघटना (आययूजीएस) भूवैज्ञानिक वैशिष्ट्ये, प्रक्रिया आणि शोध यांचा उत्कृष्ट संगम असलेल्या स्थळांना त्यांच्या अलौकिक वैज्ञानिक महत्त्वासाठी ‘भूवैज्ञानिक वारसा स्थळ’ म्हणून मान्यता देते. पृथ्वीची निर्मिती आणि तिचा इतिहास समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या जगभरातील निवडक स्थळांचा या यादीत समावेश केला जातो, अशी माहिती पत्र सूचना कार्यालयाच्या (पीआयबी) निवेदनात दिली आहे.

विवराच्या मध्यभागी खारट आणि अल्कधर्मी पाण्याचे सरोवर आहे. त्यामुळे या परिसराला वैशिष्ट्यपूर्ण भूवैज्ञानिक आणि पर्यावरणीय स्वरूप प्राप्त झाले आहे. विवराचा गोलाकार आकार, त्याची खोली आणि व्यास यांचे प्रमाण, आतील उतारांवर दिसणारे बेसॉल्ट लाव्हाचे थर, खडकांचे तुकडे, बाहेरच्या दिशेने झुकलेले मूळ खडक तसेच उल्कापातामुळे बाहेर फेकल्या गेलेल्या खडकांचे अवशेष यांमधून या विवराच्या उल्कापाती उत्पत्तीचे ठोस पुरावे मिळतात. उल्कापातामुळे निर्माण झालेले काचेसारखे पदार्थ, सूक्ष्म गोलाकार कण आणि वितळलेल्या खडकांचे नमुने यांमधून अतिवेगवान उल्कापातादरम्यान घडणाऱ्या भौतिक आणि भू-रासायनिक प्रक्रियांचा अभ्यास करण्यास मदत होते.

वारसा स्थळे ४७ देशांमध्ये

‘थर्ड १००’ भूवैज्ञानिक वारसा स्थळे ४७ देशांमध्ये आहेत. त्यांत आफ्रिकेतील ११, अमेरिका खंडातील २२, आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील २२, मध्य पूर्वेतील सहा, युरोपमधील ३४, अंटार्क्टिकामधील दोन आणि आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रातील तीन स्थळांचा समावेश आहे. जपानमधील माउंट फुजी, नॉर्वेचे फ्योर्ड्स, अमेरिकेतील सॅन अँड्रियास फॉल्ट, अर्जेंटिनातील माउंट अकोनकागुआ आणि फिलिपिन्समधील चॉकलेट हिल्स यांसारख्या प्रसिद्ध भूवैज्ञानिक स्थळांनाही या यादीत स्थान मिळाले आहे.

आययूजीएसची मान्यता मिळाल्यामुळे या स्थळांना जागतिक स्तरावर ओळख मिळते आणि त्यांच्या वैज्ञानिक महत्त्वावर शिक्कामोर्तब होते. भूविज्ञान शास्त्राच्या विकासात योगदान देणारी तसेच पृथ्वीची वैशिष्ट्ये आणि इतिहास समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलेली ही स्थळे आहेत. या यादीतील अनेक स्थळे राष्ट्रीय उद्याने, जिओपार्क आणि नैसर्गिक राखीव क्षेत्रांमध्ये संरक्षित आहेत; मात्र काही स्थळांना अद्याप संरक्षण मिळालेले नाही. त्यामुळे या मान्यतेमुळे भूवैज्ञानिक वारसा स्थळांविषयी जनजागृती वाढण्यास, शैक्षणिक साधन म्हणून त्यांचा वापर होण्यास आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांचे संवर्धन करण्यास मदत होणार आहे.

  • लोणार सरोवर हे पृथ्वीवरील उल्कापातामुळे निर्माण झालेले सर्वांत तरुण (सुमारे १२ हजार वर्षे जुने) उत्तम स्थितीत जतन करण्यात आलेले विवर आहे.

  • सरोवराचचा व्यास सुमारे १.८८ किलोमीटर आहे. सुमारे ६.५ कोटी वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या दख्खनच्या बेसॉल्ट खडकांच्या विस्तृत थरांमध्ये हे विवर आहे.

  • बेसॉल्ट खडकांमध्ये उल्कापातामुळे निर्माण झालेल्या दुर्मीळ विवरांपैकी लोणार हे एक महत्त्वाचे उदाहरण आहे.

  • पृथ्वीवर बेसॉल्ट खडकांमध्ये निर्माण झालेल्या अतिवेगवान उल्कापाताच्या केवळ पाच ज्ञात विवरांमध्ये त्याचा समावेश होतो.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून; दुष्काळ, पाणीटंचाई, शेतकऱ्यांना मदत हे कळीचे मुद्दे

मनमानी वेतन कपातीला लगाम; कामाचे तास, साप्ताहिक सुट्टीबाबत महाराष्ट्र वेतन नियम २०२६ लागू

Mumbai : वर्षभर रस्ते स्वच्छ ठेवा; VIP भेटीवेळीच देखावा नको; उच्च न्यायालयाने महापालिकेला सुनावले

बाळासाहेबांचा फोटो फाडल्यावरून वाद : पालिकेत ठाकरे सेनेसह काँग्रेसचाही सभात्याग

बाळासाहेबांचा फोटो फाडल्यावरून वादंग; शायना यांनी सोनियांच्या पुस्तकातील फोटो फाडल्याने विरोधकांकडून टीकेची झोड