महाराष्ट्र

संभाजीनगरात LPG टंचाई; दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा संप; प्रवाशांचे हाल

ऑटो एलपीजी गॅस टंचाईच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरात रिक्षाचालकांनी संप पुकारला असून शहरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अचानक बंद करण्यात आलेल्या रिक्षा सेवेमुळे नागरिकांचे हाल होत आहेत.

Swapnil S

छत्रपती संभाजीनगर : ऑटो एलपीजी गॅस टंचाईच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरात रिक्षाचालकांनी संप पुकारला असून शहरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अचानक बंद करण्यात आलेल्या रिक्षा सेवेमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. त्यासोबतच गॅस दरवाढीच्या विरोधात रिक्षाचालकांनी शहरात मोर्चा काढत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मोर्चादरम्यान रिक्षाचालकांनी ‘गॅस उपलब्ध करा, दरवाढ मागे घ्या' अशा मागण्या लावून धरल्या. शहरातील विविध भागांतून निघालेल्या या मोर्चामुळे काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

दरम्यान, रिक्षाचालकांचा संताप अधिक तीव्र होताना दिसत आहे. ‘एलपीजी गॅस मिळत नाही, आणि मिळाला तरी महाग झाला आहे. अशा परिस्थितीत व्यवसाय कसा करायचा?’ असा सवाल रिक्षाचालकांनी उपस्थित केला. तर ‘रिक्षा मिळत नाहीत, त्यामुळे खूप त्रास होतोय. पर्यायी व्यवस्था नाही’, अशी प्रतिक्रिया एका प्रवाशाने दिली.

रिक्षाचालकांचा संतापही स्पष्ट दिसून येत आहे. ‘एलपीजी गॅस सहज उपलब्ध होत नाही, तासंतास रांगेत उभं राहावं लागतं. रोजचा व्यवसाय ठप्प होतोय, त्यामुळे संपाशिवाय पर्याय नाही,” असे एका रिक्षाचालकाने सांगितले. दरम्यान, रिक्षाचालक संघटनांनी प्रशासनाकडे तातडीने गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.

आगामी २ दिवस पुरवठा नाहीच : जिल्हा पुरवठा अधिकारी

जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी शहरातील चारही एलपीजी पंपांची पाहणी केली असता, सर्व पंपांवरील गॅस संपल्याचे समोर आले. पुढील दोन दिवस पुरवठा होणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, अंबादास दानवे यांच्या कार्यालयात रिक्षाचालकांची बैठक पार पडली. दोन दिवसांत प्रश्न सुटला नाही, तर ‘चक्काजाम’ आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, गॅस उपलब्ध असताना पंप २४ तास सुरू ठेवावेत आणि इंधन भरल्याची अधिकृत पावती द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.

कडाक्याच्या उन्हात रिक्षा बंद, नागरिकांची गैरसोय

दरम्यान, कडाक्याच्या उन्हात रिक्षा बंद असल्याने नागरिकांची अधिकच गैरसोय होत आहे. बसस्थानकांवर मोठी गर्दी होत असून बसही पूर्ण भरून जात आहेत. त्यामुळे अनेकांना उभ्याने प्रवास करावा लागत आहे. तर काहींना बस मिळणेही कठीण होत आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. आता प्रशासन यावर काय तोडगा काढते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Mumbai : वांद्रे-खार उड्डाणपुलाची ४५ दिवसांत पुनर्बांधणी; पश्चिम रेल्वेचा निर्णय; हार्बर मार्गावर ४५ दिवसांचा मेगाब्लॉक

लग्न न जमल्याने २९ युवकांची आत्महत्या; जळगाव जिल्ह्यात सहा महिन्यांत ४४३ आत्महत्यांची नोंद

शाळांमधील उपाहारगृहांसमोर खाद्ययादीचा पेच; जंक फूड नियमांमुळे शाळांबाहेरील स्टॉलवर संक्रांत

Mumbai : उच्च न्यायालयातील कॅन्टिनवर FDA चा बडगा; FSSAI परवाना नसल्याचे उघड

ॲग्रीगेटर कंपन्यांना १ सप्टेंबरपर्यंतची मुदत; नोंदणी न केल्यास कठोर कारवाई