राज्याचे माजी कृषीमंत्री आणि सध्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी विधानपरिषदेत त्यांचा मोबाईलवर ‘रमी’ खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी हा मुद्दा उचलून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या घटनेने मोठा वाद निर्माण झाला. मात्र, आता या प्रकरणी माणिकराव कोकाटेंनी न्यायालयात धाव घेतली असून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच, त्यांनी रोहित पवार यांच्यावर मानहानीचा दावा करत माफीनाम्याची मागणी केली आहे. “मी रमी खेळत नव्हतो, मला रमी खेळता येतच नाही” असा ठाम दावा त्यांनी केला आहे.
रमी प्रकरणाने कोकाटे वादाच्या भोवऱ्यात
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहातच घेतलेल्या एका व्हिडीओमध्ये कोकाटे हे आपल्या मोबाईलमध्ये काहीतरी खेळताना दिसत होते. हा व्हिडीओ आणि फोटो 'कृषिमंत्री सभागृहात रमी खेळण्यात मग्न असल्या'चे कॅप्शन देऊन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आले. या व्हिडीओनंतर रोहित पवार यांनी कोकाटेंवर जोरदार टीका केली. त्यांनी विधानसभेच्या शिस्तीचा प्रश्न उपस्थित करत कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
या प्रकरणाने राजकीय खळबळ उडाली आणि माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषिमंत्री पद काढून घेण्यात आले आणि त्यांना क्रीडामंत्री पद देण्यात आले.
माझी बदनामी करण्याचा डाव - कोकाटे
या प्रकरणावर अखेर माणिकराव कोकाटे यांनी आता न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी आज (६ ऑक्टोबर) न्यायालयात आपला जबाब नोंदवला असून माध्यमांशी बोलताना आपली बाजू सविस्तर मांडली. ते म्हणाले, हे आरोप निराधार आहेत. मी रमी खेळत नव्हतो. मला रमी खेळता येतही नाही. माझी बदनामी करण्यासाठी जाणीवपूर्वक ही गोष्ट पसरवली गेली. जेव्हा हे आरोप झाले, तेव्हा मी माध्यमांसमोर माझी भूमिका स्पष्ट केली होती. तरीही रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मी माझ्या वकिलांतर्फे त्यांना माफी मागण्याची नोटिसही पाठवली पण त्यांनी त्याचीही खिल्ली उडवली. त्यामुळे मला कायदेशीर पातळीवर जाण्याशिवाय पर्याय उरला नाही.
शेतकऱ्यांमध्ये बदनामी
तसेच ते पुढे म्हणाले, ''या आरोपांमुळे शेतकऱ्यांमध्ये आणि माझ्या पक्षात माझी प्रतिमा डागाळली गेली. पक्षाच्या नेत्यांचीही बदनामी झाली आहे आणि माझीही बदनामी झाली. त्यामुळे रोहित पवारांनी माफी मागणं आवश्यक आहे.''
दूध का दूध, पाणी का पाणी
माणिकराव कोकाटे यांचे वकील म्हणाले, की आम्ही या आधी रोहित पवारांना माफी मागण्याची नोटिस पाठवली होती. परंतु, त्यांनी त्याची दखल न घेतल्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावे लागले. त्यांनी जर तेव्हा माफी मागितली असती तर आता ४९९ आणि ५०० अंतर्गत आम्ही कारवाईची मागणी केली नसती. आता दूध का दूध, पाणी का पाणी होईल. तसेच, सभागृह हे अत्यंत संरक्षित असते. अशा ठिकाणी फोटो आणि व्हिडिओची परवानगी नसतानाही हा फोटो घेतला गेला. तो कोणी मॉर्फ केला आहे का? तसेच, हा फोन हॅक करण्याचाही प्रकार असू शकतो. अशा प्रकारे चौकशी करण्याची मागणीही आम्ही केली आहे.
या विषयाला दुजोरा देत कोकाटे म्हणाले, की माझा फोनही हॅक केला जाऊ शकतो. माझे कौटुंबिक फोटो आहेत त्यात, तसेच काही गोपनीय कागदपत्रही आहेत. त्यामुळे हा गंभीर मुद्दा आहे.
रोहित पवारांवर उलट प्रश्नांची सरबत्ती
माणिकराव कोकाटेंनी यावेळी रोहित पवारांना काही थेट प्रश्नही उपस्थित केले,
१. रोहित पवार विधानपरिषदेचे सदस्य नाहीत, तर मग परिषदेत माझा फोटो कोणी आणि कसा काढला?
२. हा फोटो रोहित पवारांना मिळाला कसा?
३. परिषदेतला तो फोटो माध्यमांपर्यंत कसा पोहोचला?
हे सर्व प्रश्न अजूनही गुलदस्त्यात आहेत. यामध्ये जवळच्या व्यक्तीचा देखील हात असू शकतो तसेच कोणी पत्रकार किंवा अन्य कोणी असल्याची शंका कोकाटेंनी व्यक्त केली. या सर्व गोष्टींची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. त्याबाबतची माहिती रोहित पवारांनी त्यांच्या जबाबात नोंदवणं आवश्यक आहे. असं कोकाटेंनी स्पष्ट केलं. या प्रकरणी ९ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.