निवृत्तीवेतनधारकांसाठी १ जुलैपासून ‘महा-उपलब्धी’ ॲप 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

निवृत्तीवेतनधारकांसाठी १ जुलैपासून ‘महा-उपलब्धी’ ॲप

राज्य सरकारच्या सेवेतून निवृत्त झालेल्या निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना विविध सेवा एका डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने ‘महा-उपलब्धी’ (महाराष्ट्र युनिफायइड पेन्शन लाभ डिजिटल हब ॲण्ड इन्फॉर्मेशन) ॲप विकसित केले आहे.

Swapnil S

मुंबई : राज्य सरकारच्या सेवेतून निवृत्त झालेल्या निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना विविध सेवा एका डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने ‘महा-उपलब्धी’ (महाराष्ट्र युनिफायइड पेन्शन लाभ डिजिटल हब ॲण्ड इन्फॉर्मेशन) ॲप विकसित केले आहे. हे ॲप येत्या १ जुलैपासून कार्यान्वित होणार असून या ॲपद्वारे निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना निवृत्तीवेतनाशी संबंधित विविध माहिती आणि सेवा ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत.

राज्यातील अनेक निवृत्तीवेतनधारकांना मासिक निवृत्तीवेतनाचा तपशील, आयकर कपात दाखला (फॉर्म-१६), उत्पन्नाचा दाखला, शासन निर्णय आदी माहितीसाठी कोषागार कार्यालयांमध्ये प्रत्यक्ष जावे लागत होते. ज्येष्ठ नागरिकांना होणारा हा त्रास कमी करण्यासाठी हे ॲप विकसित करण्यात आले आहे. यासंदर्भातील शासन निर्णय वित्त विभागाने शुक्रवारी जारी केला.

या ॲपमुळे निवृत्तीवेतनधारकांना एकाच डिजिटल व्यासपीठावर सर्व सेवा उपलब्ध होणार आहेत. त्याचप्रमाणे निवृत्तीवेतनाशी संबंधित माहिती जलद, अचूक मिळणार असून यामुळे कोषागार, अधिदान आणि लेखा कार्यालयांना भेट देण्याची आवश्यकता भासणार नसल्याचा सरकारचा दावा आहे. ‘महा-उपलब्धी’ या मोबाईल ॲपमुळे अधिदान आणि लेखा कार्यालय तसेच कोषागार कार्यालयांकडून द्यायच्या सूचना आणि निवृत्तीवेतनविषयक माहिती वेळेवर उपलब्ध होणार आहे.

पहिल्या टप्प्यात उपलब्ध होणाऱ्या सेवा

हे ॲप सुरू झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात निवृत्तीवेतनधारकांना २०२४-२५ पासूनच्या मासिक आणि वार्षिक निवृत्तीवेतनाचा तपशील पीडीएफ स्वरूपात उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे उत्पन्न प्रमाणपत्र, ईपीपीओ, ईसीपीओ आणि ईजीपीओची प्रत ऑनलाइन मिळणार आहे. त्याचप्रमाणे आर्थिक वर्ष २०२५-२६ पासूनचे आयकर कपात दाखला फॉर्म ए आणि फॉर्म बी ही ऑनलाइन ॲपद्वारे मिळणार आहे. निवृत्ती वेतनविषयक महत्त्वाचे शासन निर्णय आणि परिपत्रकेही या ॲपवर दिसणार असल्याने सरकारी निर्णयांची माहिती निवृत्तीवेतनधारकांना मिळेल. हे ॲप ॲण्ड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रकारच्या मोबाईलवर डाऊनलोड करता येईल.

दुसऱ्या टप्प्यातील सेवा

दरम्यान, ॲपच्या दुसऱ्या टप्प्यात ऑनलाईन हयातीचा दाखला आणि ऑनलाईन निवृत्तीवेतन तक्रार निवारण प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. यासाठी तांत्रिक चाचण्या आणि सुरक्षा पडताळणी पूर्ण झाल्यानंतर स्वतंत्र आदेश जारी करण्यात येतील, असे वित्त विभागाने शासन निर्णयात म्हटले आहे.

तरुण तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; याचिका फेटाळली, दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

Mumbai : माझगावच्या गणपती मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा आरोप; २२ वर्षीय तरुणाला अटक

Mumbai : बीकेसीतील 'एमसीए'च्या ५ उपाहारगृहांचे परवाने रद्द; FDA चा दणका; कारवाई सुरूच

Mumbai : चर्चगेट मेट्रो स्थानकातील लिफ्ट अचानक बंद; ६ प्रवासी अडकले

गर्लफ्रेंडने कारवर उमटवले ३४०० 'किस'; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची कारवाई, तरुणाला ५,५०० रुपयांचा दंड