महाराष्ट्र

भाजपसोबत युती करणे ही सर्वात मोठी चूक! ‘रासप’चे नेते महादेव जानकर यांना पश्चात्ताप

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माझ्या भावाला निवडून द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतरही राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांना पराभव पत्करावा लागला होता. मात्र...

Swapnil S

अकोला : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माझ्या भावाला निवडून द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतरही राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांना पराभव पत्करावा लागला होता. मात्र, भाजपसोबत युती करणे ही माझ्या राजकीय जीवनातील सर्वात मोठी चूक होती, अशा शब्दांत महादेव जानकर यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून २० वर्षांत प्रथमच एकत्र आले असताना, जानकर यांनी ठाकरे बंधूंना पाठिंबा दर्शवत त्या मेळाव्याला हजेरी लावली होती. ते म्हणाले की, “आता आम्ही कुणाशीही युती करू, पण भाजपला पराभूत करून दाखवू. २०२९ मध्ये मी लोकसभेची निवडणूक लढणार असून, केंद्र सरकारमध्ये मंत्री होणे हेच आमचे पुढचे लक्ष्य आहे.”

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठीही महादेव जानकर यांनी बैठका-मेळाव्यांवर भर दिला आहे. “येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ‘रासप’ स्वबळावर निवडणुका लढणार आहे. मात्र शक्य होईल, त्या ठिकाणी आम्ही आघाडीसाठी प्रयत्न करणार आहोत. भाजपला पराभूत करण्यासाठी आम्ही कुणाशीही युती करायला तयार आहोत. येत्या काळात काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्यासह कोणत्याही राजकीय पक्षाशी आम्ही आघाडी करण्यास तयार आहोत,” असे संकेतही जानकरांनी दिले.

राज्याच्या राजकारणात फारसे लक्ष न देता, मी २०२९च्या लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. केंद्राच्या राजकारणात राहण्याची माझी इच्छा असून २०२९ची निवडणूक जिंकून केंद्रात मंत्रिपद भूषवण्याची माझी इच्छा आहे, असेही जानकर यांनी सांगितले.

राज्यात नव्या आघाडीचे संकेत

राज्यात स्वतंत्रपणे निवडणुका लढवून आपापल्या भागात दबदबा असणाऱ्या राजकीय नेत्यांची मोट बांधण्याचे संकेत जानकर यांनी दिले आहेत. राजू शेट्टी, बच्चू कडू, शेकाप तसेच रविकांत तुपकर यांच्यासह काही राजकीय नेत्यांना एकत्र आणून राज्यात नवी आघाडी तयार करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. “सर्व राजकीय नेत्यांशी समन्वय साधून मोठा पर्याय उभा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्यातील प्रामाणिक, शेतकरीहिताचे आणि परिवर्तनवादी नेतृत्व एकत्र आणण्याचे आमचे ध्येय आहे,” असेही जानकर म्हणाले.

प्रतीक्षा संपली, बाप्पा आज घरोघरी! चैतन्यमूर्तीच्या आगमनासाठी मुंबईसह राज्यात उत्साहाला उधाण

भारतावर 'टॅरिफ' विघ्न! अमेरिकेकडून अतिरिक्त २५ टक्के 'टॅरिफ' लागू; भारताच्या ४८ अब्ज डॉलरच्या निर्यातीला फटका

हायकोर्टाच्या मनाईनंतरही जरांगे आंदोलनावर ठाम

मुंबईच्या लढाईत ठाकरे-शिंदे सेना आमनेसामने; गणेश मंडळांसाठी शिवसेनेची रणनीती

आता दररोज १३ तास काम! वाढीव तास काम करण्यास मुभा; महिलांना रात्रीच्या शिफ्टसाठी परवानगी