व्यावहारिक मराठी येत नसलेल्या ६६४ चालकांना नोटिसा; ३० सप्टेंबरपर्यंत राज्यभर तपासणी मोहीम, ३,९९५ वाहनचालकांची तपासणी 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

व्यावहारिक मराठी येत नसलेल्या ६६४ चालकांना नोटिसा; ३० सप्टेंबरपर्यंत राज्यभर तपासणी मोहीम, ३,९९५ वाहनचालकांची तपासणी

राज्यात व्यावसायिक प्रवासी वाहने चालविणाऱ्या चालकांना प्रवाशांशी सुसंवाद साधता यावा, यासाठी व्यावहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे.

Swapnil S

मुंबई : राज्यात व्यावसायिक प्रवासी वाहने चालविणाऱ्या चालकांना प्रवाशांशी सुसंवाद साधता यावा, यासाठी व्यावहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. या नियमाच्या अंमलबजावणीसाठी आजपासून राज्यभर तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. ज्या चालकांना व्यवहारिक मराठीचे ज्ञान नसल्याचे तपासणीत आढळेल, त्यांना नोटीस बजावून एक महिन्याच्या कालावधीत मराठी भाषा शिकणे बंधनकारक करण्यात येत आहे. या मुदतीत मराठीचे ज्ञान आत्मसात न केल्यास संबंधित चालकाचा बॅज तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात येणार आहे.

मुंबई महानगर क्षेत्रात गुरुवारी झालेल्या तपासणीत ३,९९५ वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६०४ चालकांना व्यावहारिक मराठीचे पुरेसे ज्ञान नसल्याचे आढळून आले असून, या सर्वांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. उर्वरित राज्यातील आकडेवारीनुसार आतापर्यंत ४,२२२ चालकांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ६६४ चालकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.

ही तपासणी मोहीम ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. तपासणीदरम्यान चालकांना व्यावहारिक मराठीचे ज्ञान तपासले जाईल. मराठीचे ज्ञान नसलेल्या चालकांना सुधारणा करण्याची संधी देण्यात येणार असली, तरी त्यानंतरही नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात विहित मुदतीनंतर बॅज निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.

मुंबईतील चार प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) १,३९० वाहनचालकांची तपासणी केली. यामध्ये ४२२ चालक मराठीच्या तोंडी परीक्षेत अपयशी ठरले. आरटीओच्या विशेष मोहिमेत चालकांची १५ प्रश्नांची तोंडी परीक्षा घेण्यात आली. या माध्यमातून प्रवाशांशी दैनंदिन व्यवहारातील मराठी संवाद साधण्याची क्षमता तपासण्यात आली. मूलभूत शब्दांची ओळख आणि दैनंदिन व्यवहारातील मराठीचा वापर याची पडताळणी करण्यात आली. मराठीचे आवश्यक ज्ञान नसलेल्या चालकांविरुद्ध नियमानुसार कारवाई सुरू करण्यात आली असून त्यांना नियमांनुसार मराठी शिकण्यासाठी मुदत दिली जाणार आहे.

मुंबई सेंट्रल आरटीओ

तपासलेले वाहनधारक - ३८५

व्यावहारिक मराठी येत नसलेले वाहनधारक - ९४

बोरिवली सेंट्रल आरटीओ

तपासलेले वाहनधारक - ३५०

व्यावहारिक मराठी येत नसलेले वाहनधारक - १०१

अंधेरी आरटीओ

तपासलेले वाहनधारक - ४०३

व्यावहारिक मराठी येत नसलेले वाहनधारक - १४०

वडाळा आरटीओ

तपासलेले वाहनधारक - १९२

व्यावहारिक मराठी येत नसलेले वाहनधारक - ७५

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या त्या वेळच्या सगळ्या आमदारांना अपात्र करा; सर्वोच्च न्यायालयात ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

मराठवाड्यात दाटले दुष्काळाचे ढग; ११ मोठ्या धरणांमध्ये ६९ टक्के पाणीसाठा

Mumbai : तीन वर्षांत एसी लोकलची तयारी; आयसीएफ १२०, आरसीएफ ७१, एमसीएफ ४७ रेक तयार करणार

महापौरांच्या पत्रामुळे नव्या वादाला तोंड; शैक्षणिक सल्लागाराच्या नियुक्तीसाठी शिक्षण समिती अध्यक्षांना पत्र

मेट्रो १० च्या खर्चात ७१६ कोटींची वाढ; साडेपाच किमी रस्त्याच्या रुंदीकरणाचाही समावेश