Mumbai Traffic Update : भांडुप-सोनापूर जंक्शनवरून रात्री प्रवास करताय? आजपासून ३१ डिसेंबरपर्यंत वाहतुकीत बदल; पाहा पर्यायी मार्ग

मुंबईतील भांडुप-सोनापूर जंक्शनवर आजपासून ३१ डिसेंबरपर्यंत रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. एलबीएस मार्गावरील निर्बंध आणि पर्यायी मार्ग जाणून घ्या.
Mumbai Traffic Update : भांडुप-सोनापूर जंक्शनवरून रात्री प्रवास करताय? आजपासून ३१ डिसेंबरपर्यंत वाहतुकीत बदल; पाहा पर्यायी मार्ग
Mumbai Traffic Update : भांडुप-सोनापूर जंक्शनवरून रात्री प्रवास करताय? आजपासून ३१ डिसेंबरपर्यंत वाहतुकीत बदल; पाहा पर्यायी मार्ग
Published on: 

मुंबई : भांडुप, मुलुंड आणि कांजूरमार्ग परिसरातून रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मेट्रोच्या कामामुळे भांडुपमधील सोनापूर जंक्शनजवळ लालबहादूर शास्त्री (एलबीएस) मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. हे निर्बंध आज, २८ ऑक्टोबरपासून ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत लागू राहणार आहेत. दररोज रात्री ११ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत या भागातील दोन्ही दिशांची वाहतूक वळवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी पर्यायी मार्गांची माहिती घेण्याचे आवाहन मुंबई वाहतूक पोलिसांनी केले आहे.

मेट्रोच्या कामासाठी वाहतुकीत बदल

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) मेट्रो मार्गिका ४ चे काम सुरू आहे. या अंतर्गत भांडुपमधील डॉ. कल्पना चावला चौक ते जैनम बँक्वेट-सोनापूर जंक्शनदरम्यान शांग्रीला मेट्रो स्थानकाचे काम करण्यात येणार आहे.

या कामासाठी यू, टी आणि एल आकाराचे प्रीकास्ट गर्डर बसवले जाणार आहेत. त्यासाठी मोठ्या क्रेन, गर्डर वाहून नेणारे अवजड ट्रेलर आणि इतर यंत्रसामग्रीचा वापर होणार आहे. कामादरम्यान वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा विचार करून सोनापूर जंक्शन परिसरातील वाहतूक दोन्ही दिशांनी वळवण्यात येणार आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या निर्बंधांतून सूट देण्यात आली आहे.

Mumbai Traffic Update : भांडुप-सोनापूर जंक्शनवरून रात्री प्रवास करताय? आजपासून ३१ डिसेंबरपर्यंत वाहतुकीत बदल; पाहा पर्यायी मार्ग
१८ टक्के वाहनांकडून नियमांचे उल्लंघन; MMR मध्ये १५ दिवसांत ५,८२१ वाहनांवर कारवाई; ६.२० कोटींचा दंड, आतापर्यंत १.९२ कोटींची वसुली

ठाणे-मुलुंडकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग

'फ्री प्रेस जर्नल'ने दिलेल्या वृत्तानुसार, कांजूरमार्ग आणि भांडुपकडून सोनापूर जंक्शन, मुलुंड तसेच पूर्व द्रुतगती महामार्गाकडे जाणाऱ्या वाहनांना भांडुप पोलिस ठाण्याजवळील मधुबन गार्डन परिसरातील डॉ. कल्पना चावला चौकातून वळवण्यात येईल.

ही वाहने भांडुप व्हिलेज रोडमार्गे बाळकृष्ण तातोजीराव शिंदे चौकात पोहोचतील. तेथून डावीकडे वळून सुभाष नगर रोड आणि मुलुंड लिंक रोडमार्गे सोनापूर जंक्शन, मुलुंड पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गाच्या उड्डाणपुलाकडे जाता येईल.

हलकी वाहने : डॉ. कल्पना चावला चौकातून डावीकडे वळून मारुती मंदिर रोड, लेक रोड, श्री कायकाई शेट्टी मार्ग आणि स्वातंत्र्यसैनिक नाथा बाबाजी थोरात मार्गाने महावितरण कार्यालय किंवा बिकानेरजवळील एलबीएस मार्गावर पोहोचता येईल.

कांजूरमार्ग-भांडुपकडे जाणाऱ्या वाहनांसाठी मार्ग

सोनापूर जंक्शन, मुलुंड पूर्व-पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गाकडून भांडुप व कांजूरमार्गच्या दिशेने जाणारी वाहने सोनापूर जंक्शन येथे वळवण्यात येतील.

या वाहनांना फोर्टिस रुग्णालयाजवळील रुनवाल कॉम्प्लेक्स परिसरातून डावीकडे किंवा उजवीकडे वळून सुभाष नगर रोडने पुढे जाता येईल. त्यानंतर बाळकृष्ण तातोजीराव शिंदे चौकातून उजवीकडे वळून भांडुप व्हिलेज रोडमार्गे मधुबन गार्डनजवळील डॉ. कल्पना चावला चौक गाठता येईल. तेथून भांडुप आणि कांजूरमार्गच्या दिशेने प्रवास करता येईल.

हलकी वाहने : महावितरण कार्यालय किंवा बिकानेरजवळून श्री कायकाई शेट्टी मार्ग, स्वातंत्र्यसैनिक नाथा बाबाजी थोरात मार्ग, मारुती मंदिर रोड आणि लेक रोडमार्गे डॉ. कल्पना चावला चौकाजवळील एलबीएस मार्गावर पोहोचता येईल.

Mumbai Traffic Update : भांडुप-सोनापूर जंक्शनवरून रात्री प्रवास करताय? आजपासून ३१ डिसेंबरपर्यंत वाहतुकीत बदल; पाहा पर्यायी मार्ग
Mumabai: सीएसएमटी स्थानकात तिकीट तपासनीसावर हल्ला; रेल्वे कर्मचारी असल्याचा दावा, दाम्पत्याविरुद्ध गुन्हा

जेव्हीएलआर आणि पूर्व द्रुतगती महामार्गाचाही पर्याय

गांधीनगर जंक्शनकडून सोनापूर जंक्शनच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना जोगेश्वरी-विक्रोळी जोडमार्गाचा (जेव्हीएलआर) वापर करता येईल. जेव्हीएलआर उड्डाणपुलाजवळून पूर्व द्रुतगती महामार्ग आणि गोरेगाव-मुलुंड जोडमार्गाने (जीएमएलआर) सोनापूर जंक्शनच्या दिशेने जाता येईल.

तसेच सोनापूर जंक्शनकडून गांधीनगर जंक्शनकडे जाणाऱ्या वाहनांना गोरेगाव-मुलुंड जोडमार्ग, ऐरोली उड्डाणपूल आणि पूर्व द्रुतगती महामार्गमार्गे जेव्हीएलआर जंक्शन गाठता येईल. तेथून गांधीनगर जंक्शन आणि पुढील इच्छित ठिकाणी जाता येईल.

निर्बंध किती दिवस राहणार?

वाहतुकीतील हे बदल २८ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत दररोज रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत लागू राहतील. काम पूर्ण होण्याच्या स्थितीनुसार मुलुंड वाहतूक विभागाच्या प्रभारी निरीक्षकांच्या निर्देशांनुसार वाहतुकीचे नियमन करण्यात येणार आहे.

मेट्रोच्या कामादरम्यान गैरसोय टाळण्यासाठी वाहनचालकांनी निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in