सहा तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी ९९३ कोटींचा निधी मंजूर; तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समिती बैठकीत निर्णय  
महाराष्ट्र

सहा तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी ९९३ कोटींचा निधी मंजूर; तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समिती बैठकीत निर्णय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत सहा तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी ९९३ कोटी ७२ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला.

Swapnil S

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत सहा तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी ९९३ कोटी ७२ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. यामुळे संबंधित तीर्थक्षेत्रांचा कायापालट होणार असून भाविक, पर्यटकांना चांगल्या सुविधा मिळणार आहेत. तीर्थक्षेत्र विकासकामे दर्जेदार आणि कालमर्यादेत पूर्ण करण्याचे तसेच तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र भीमाशंकर आदर्श गाव विकासासाठी १७२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या विकास आराखड्यांतर्गत अत्याधुनिक बस स्थानक आणि पार्किंग सुविधा करण्यात यावी. वाहतूककोंडी कमी करण्यासाठी विविध वळण रस्ते आणि रस्ते रुंदीकरणाची कामे हाती घेण्यात यावीत. सध्या २.७ मीटर रुंदी असलेले रस्ते ७ मीटरपर्यंत रुंद करावा. भक्त आणि पर्यटकांच्या सुविधांसाठी मंदिर परिसरात पादचारी मार्ग, कव्हर्ड कॉरिडॉर, फ्लोअरिंग आणि एम्फीथिएटर, २५७ केएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आदी योजना हाती घेण्याची सूचना फडणवीस यांनी बैठकीत केली. दरम्यान, संत तुकाराम महाराज यांचे देहू येथील जन्मस्थान, वैकुंठगमन मंदिर परिसर तसेच भंडारा डोंगर परिसराच्या संवर्धन आणि विकासासाठी ४१ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, वनमंत्री गणेश नाईक, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, मुख्य सचिव राजेश अगरवाल उपस्थित होते.

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरुळ येथील प्रसिद्ध घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या विकासासाठी सुधारित आराखडा तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी २१०.४५ कोटी प्रस्तावित करण्यात आले असून यामध्ये ५३.८२ कोटींच्या वाढीव निधीची मागणी समाविष्ट आहे.

  • संगम माहुली समाधीस्थळ संवर्धनासाठी १३३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याअंतर्गत महाराणी ताराबाई, महाराणी येसूबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळांचा जीर्णोद्धार आणि लँडस्केप विकास केला जाणार आहे.

  • श्रीक्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर परिसर मूळ आराखड्यातील पुढील नवीन कामांसाठी सुमारे ३०१.५४ कोटी रुपयांचा अतिरिक्त आराखडाही तयार करण्यात आला आहे. तीन टप्प्यात या मंदिराची कामे वेळेत पूर्ण केली जाणार आहेत.

अजिंक्यतारासाठी १३४ कोटी

सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले अजिंक्यताराचे जतन, संवर्धन आणि परिसर सुशोभीकरणासाठी १३४.८० कोटी रुपयांचा विकास आराखडा आहे. यामध्ये नियोजित असलेल्या पायाभूत सुविधांचा विकास, नियोजित प्रेक्षक गॅलरी, नवे पादचारी मार्ग आणि लँडस्केपिंग, राज सदरेचे पुनरुज्जीवन, बुरुजांचे संवर्धन, पर्यटन आकर्षणे, अत्याधुनिक लटकता पूल, स्वच्छता आणि विश्रांतीगृहांची कामे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वेळेत पार पाडावीत, असे फडणवीस यांनी सांगितले.

शालेय अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षणाचा समावेश; सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारची माहिती

Nashik : पर्यटक महिलेची छेड काढल्याचा जाब विचारताच कुटुंबावर हल्ला; पाठलाग करत कारची तोडफोड, VIDEO

Thane : 'अनधिकृत होर्डिंग्ज हटवा'; बॅनर दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश

'गाडी थांबवली असती तर…'; धावत्या ट्रेनमध्ये महिलेचा मृत्यू; वैद्यकीय मदत वेळेत न मिळाल्याचा सहप्रवाशाचा आरोप, VIDEO

इराणचा UAE च्या दोन जहाजांवर क्षेपणास्त्र हल्ला; एका भारतीय खलाशाचा मृत्यू, आठ जण जखमी