राज्यात चार अत्याधुनिक कार्डियाक कॅथलॅब उभारणार; १०० कोटींचा निधी मंजूर - आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर 
महाराष्ट्र

राज्यात चार अत्याधुनिक कार्डियाक कॅथलॅब उभारणार; १०० कोटींचा निधी मंजूर - आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

पुणे, जालना, गडचिरोली व कोल्हापूर या चार जिल्ह्यांत कार्डियाक कॅथलॅब उभारणीस सार्वजनिक आरोग्य विभागाने मंजुरी दिली आहे.

Swapnil S

मुंबई : पुणे, जालना, गडचिरोली व कोल्हापूर या चार जिल्ह्यांत कार्डियाक कॅथलॅब उभारणीस सार्वजनिक आरोग्य विभागाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी ९९ कोटी ८५ लाख ८९ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने शासन निर्णयाद्वारे प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

राज्यात हृदयविकार व रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक ठरणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज तसेच कोल्हापूर शहरातील सेवा रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध होत असल्याने कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत हृदयविकाराच्या गंभीर रुग्णांना अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टीसारख्या तपासण्या व उपचारांसाठी पुणे किंवा मुंबई येथे जावे लागत होते. त्यामुळे रुग्णांच्या उपचारात विलंब होण्याबरोबरच आर्थिक भार आणि मानसिक तणावही मोठ्या प्रमाणात वाढत होता. ही बाब लक्षात घेऊन शासनाने राज्यातील पुणे, जालना, गडचिरोली आणि कोल्हापूर या चार जिल्हा रुग्णालयांमध्ये कार्डियाक कॅथलॅब उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी ईपीसी पद्धतीने करण्यात येणार असून, यामध्ये कॅथलॅब उभारणीसाठी आवश्यक असलेली संरचनात्मक रचना, यांत्रिकी, विद्युत, प्लंबिंग आराखडे, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची खरेदी, त्यांची उभारणी, चाचणी, साठवण, वितरण तसेच पुरवठा साखळी व्यवस्थापन या सर्व बाबींचा समावेश राहणार आहे. उपकरणांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये यासाठी शासनाने निश्चित केलेल्या तांत्रिक निकषांनुसार प्री-डिस्पॅच आणि पोस्ट-डिस्पॅच रँडम सॅम्पल तपासणी केली जाणार आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य सेवा संचालक, आरोग्य सेवा आयुक्तालय तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. कार्डियाक कॅथलॅबमुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील अडथळे तातडीने शोधणे व त्यावर त्वरित उपचार करणे शक्य होणार असून, हृदयविकाराच्या रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाच्या 'गोल्डन अवर'मध्ये उपचार उपलब्ध झाल्याने अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे. शासकीय रुग्णालयात ही सुविधा सुरू झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील आरोग्यसेवा अधिक सक्षम व आधुनिक होणार असून, सामान्य व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना अत्यल्प खर्चात उच्च दर्जाचे हृदयविकार उपचार मिळणार आहेत.

हृदयविकार रुग्णांसाठी महत्त्वाचा निर्णय

राज्यात हृदयविकार व रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. या रुग्णांना वेळेवर निदान व उपचार मिळणे अत्यंत आवश्यक आहे. आतापर्यंत कार्डियाक कॅथलॅबसाठी रुग्णांना पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरात जावे लागत होते. त्यामुळे आर्थिक, शारीरिक व वेळेचा मोठा ताण रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांवर पडत होता.

मुंबईत आजपासून क्लायमेट वीक! अंतराळवीर राकेश शर्मा, शुभांशू शुक्ला एकाच मंचावर; सचिन तेंडुलकरसह क्लिंटन, गेट्स यांची उपस्थिती

फ्रान्स अध्यक्षांच्या भारत दौऱ्यात द्विपक्षीय संबंध दृढ होणार; दक्षिण मुंबईत कडेकोट बंदोबस्त, मुंबईत आज मोदी-मॅक्रॉन द्विपक्षीय बैठक

यावर्षीचे पहिले सूर्यग्रहण आज दुपारी; पण, भारतात दिसणार का?

Mumbai : स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी; चार नावे चर्चेत

राज्य सरकारने मागवली थकीत शेतकरी कर्जदारांची माहिती; अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिलासा मिळणार?