महाराष्ट्र

काही तलवारी म्यान, तर काहींची धार कायम! एकूण २,९३८ उमेदवारी अर्ज मागे; ४,१४० उमेदवार रिंगणात

विविध राजकीय पक्षांतील वरिष्ठ नेत्यांची मनधरणीनंतर काही ठिकाणी बंडखोरांनी आपल्या तलवारी म्यान केल्या, तर काही ठिकाणी बंडखोरांनी आपल्या तलवारी अधिकच धारदार केल्याने ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Swapnil S

मुंबई : विविध राजकीय पक्षांतील वरिष्ठ नेत्यांची मनधरणीनंतर काही ठिकाणी बंडखोरांनी आपल्या तलवारी म्यान केल्या, तर काही ठिकाणी बंडखोरांनी आपल्या तलवारी अधिकच धारदार केल्याने ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत २,९३८ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले, तर २,०५९ उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आले आहेत, तर एकूण ४,१४० अर्ज पात्र ठरले आहेत.

भाजपचा गड असलेल्या बोरिवली मतदारसंघात भाजपचे बंडखोर गोपाळ शेट्टी यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेतला, तर अंधेरी पूर्व मतदारसंघातून अपक्ष उमेदवार स्वीकृती शर्मा आणि निकिता प्रदीप शर्मा यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. मात्र, माहीम मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राजू पेडणेकर यांनी वर्सोवा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे.

सन २०२४ ची विधानसभा निवडणूक भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षासाठी प्रतिष्ठेची लढाई आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे जागावाटप करताना महायुती आणि महाविकास आघाडीने सावध भूमिका घेत उमेदवारी टप्प्याटप्प्याने जाहीर केली. मात्र, पक्षातून उमेदवारी न मिळाल्याने नाराजांनी बंडाचे हत्यार उपसले.

कोल्हापूरमध्ये मधुरिमाराजेंची माघार, कॉंग्रेसला धक्का

अर्ज माघारीसाठी अवघ्या काही मिनिटांचा कालावधी बाकी असताना मधुरिमाराजे यांनी कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. मधुरिमाराजे यांना नाईलाजाने माघार घ्यावी लागली, राजेश लाटकर यांनी माघार घेतली नाही. ते चांगले कार्यकर्ते आहेत, त्यामुळे अशा परिस्थितीत निवडणूक लढायची नाही, असे आम्ही ठरवले, अशी प्रतिक्रिया खासदार शाहू महाराज यांनी दिली. दरम्यान, मधुरिमाराजे यांनी माघार घेतल्याने कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील हे संतप्त झाले व त्यांनी याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.

श्रीगोंद्यात प्रतिभा पाचपुते यांची मुलासाठी माघार

श्रीगोंद्यातील भाजपच्या उमेदवार प्रतिभा पाचपुते यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. मुलगा विक्रम पाचपुते याच्यासाठी त्यांनी माघार घेतली आहे. भाजपने मुलगा विक्रम पाचपुते याला तिकीट द्यावे, यासाठी बबनराव पाचपुते आणि प्रतिभा पाचपुते आग्रही होते. भाजपच्या उमेदवारांच्या यादीत प्रतिभा पाचपुते यांचे नाव आल्यानंतर पाचपुते पती-पत्नी यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन मुलाला उमेदवारी देण्याचा आग्रह केला होता.

दरम्यान, महायुतीच्या ९ बंडखोरांनी सोमवारी माघार घेतली, तर मविआच्या ६ जणांना माघार घेतली. तसेच वंचितच्या एका, तर दोन अपक्षांनी आपले अर्ज मागे घेतले. चोपडा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराने माघार घेतली आहे.

गोपाळ शेट्टी नरमले

भाजपचा गड असलेल्या बोरिवलीत भाजपचे माजी नगरसेवक, खासदार गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी न दिल्याने गोपाळ शेट्टी यांनी भाजपअंतर्गत बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. गोपाळ शेट्टी यांची बोरिवलीत मतदारांमध्ये चांगली पकड असल्याने भाजपची चिंता वाढली. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी फोनवर संपर्क साधत शेट्टी यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत सूचना केली. मात्र, गोपाळ शेट्टी निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले. अखेर केंद्रीय मंत्री पियूष गोयल, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींनी मध्यस्थी केल्यानंतर शेट्टी यांनी आपली बंडखोरीची तलवार म्यान केली.

राज ठाकरेंनी भेट नाकारल्याने सदा सरवणकरांनी शड्डू ठोकला

माहीम मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर यांनाही उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपकडून दबाव टाकण्यात आला. मात्र, त्यांनी निवडणूक लढणार असल्याचे वेळोवेळी स्पष्ट केले. दरम्यान, सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी शिंदेंची भेट घेत त्यांनी माहीम मतदारसंघातील मतांचे गणित समजून सांगितले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यानुसार सरवणकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ‘शिवतीर्थ’ गाठले. मात्र, राज ठाकरे यांनी भेटीस नकार दिल्याने सदा सरवणकर यांनी आपण निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे जाहीर केले. त्यामुळे माहीम मतदारसंघात आता तिरंगी लढत होणार आहे.

येथील बंडखोरांची माघार

बोरिवली - गोपाळ शेट्टी (भाजप)

मुलुंड - संगीता वाजे (राष्ट्रवादी, शरद पवार)

भायखळा - मधु चव्हाण (काँग्रेस)

अणुशक्ती नगर - अविनाश राणे (शिवसेना)

धारावी - बाबुराव माने (एनडीए)

वरळी - जावेद इक्बाल अहमद (एनडीए), साक्षी पोटोळे (एनडीए)

वर्सोवा - चंगेज मुलतानी (एनडीए)

मालाड पश्चिम - सोहेल रिझवी (एनडीए)

दहिसर - गणेश घोसाळकर

कांदिवली पूर्व - सज्जन पवार

येथील बंडखोरी कायम

माहीम - सदानंद सरवणकर

वर्सोवा - राजू पेडणेकर

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी