एकनाथ शिंदे,उद्धव ठाकरे,देवेंद्र फडणवीस (डावीकडून) 
महाराष्ट्र

दिग्गजांच्या अस्तित्वाची लढाई

Maharashtra assembly elections 2024 : शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले, शिवसेनेच्या ४० बंडखोरांची सुरत ते गुवाहाटी यात्रा, मूळ पक्षाच्या बंडखोरांकडे पक्षाचे नाव व चिन्ह यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अडीच वर्षांत मोठी उलथापालथ झाली.

रविकिरण देशमुख

शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले, शिवसेनेच्या ४० बंडखोरांची सुरत ते गुवाहाटी यात्रा, मूळ पक्षाच्या बंडखोरांकडे पक्षाचे नाव व चिन्ह यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अडीच वर्षांत मोठी उलथापालथ झाली. उद्धव ठाकरे यांचे सरकार उलथवून सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने अडीच वर्षे कारभार केला. आता वेळ आहे निवडणुकीला सामोरे जाण्याची. सत्ताधारी महायुती व विरोधी ‘मविआ’मध्ये जोरदार टक्कर सुरू आहे. सोमवारी सायंकाळी प्रचार संपल्यानंतर राजकीय पक्षांबरोबरच या विधानसभा निवडणुकीत राजकारणातील रथी-महारथींचे भवितव्य पणाला लागल्याचे दिसत आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना व शरद पवार यांनी स्थापन केलेली राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची शकले झाली. हे मूळ पक्ष त्यांच्या बंडखोरांच्या ताब्यात गेले, तर उद्धव ठाकरे व शरद पवार यांना नवीन पक्षचिन्हे घ्यावी लागली. या पक्षफुटीचे सूत्रधार म्हणून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोट दाखवले जात आहे. या निवडणुकीत पक्षाबरोबरच अनेक राजकीय नेत्यांकडे लक्ष लागून राहिले आहे.

शरद पवार - ८३ वर्षांचे लढवय्ये म्हणून पवार या निवडणुकीत लढत आहेत. राष्ट्रवादीची स्थापना करणाऱ्या पवारांना आयुष्यभर संघर्ष करावा लागला. १९९१ मध्ये त्यांनी आपले पुतणे अजित पवार यांना पुढे आणण्यास सुरुवात केली. आता याच पुतण्याने पवार यांच्या पक्षाचे बहुसंख्य आमदार व पक्षचिन्ह पळवले. लोकसभा निवडणुकीत १० पैकी ८ जागा पवार यांच्या पक्षाने जिंकल्या. बारामतीत त्यांनी आपली मुलगी सुप्रिया सुळे यांना निवडून आणले. आता ते आपले नातू युगेंद्र पवार यांना बारामतीतून पुढे आणत आहेत.

विजयी झाल्यास : या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) विजयी झाल्यास पुढील सरकार स्थापनेत ते मोठी भूमिका बजावतील.

पराभव झाल्यास : या निवडणुकीत चांगले यश न मिळाल्यास त्यांच्या भोवतालची गर्दी कमी होऊ शकते. तसेच पक्षाला मोठ्या प्रमाणावर संघर्ष करावा लागू शकतो.

उद्धव ठाकरे - बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे हे राजकीय पुनर्वसनासाठी संघर्ष करत आहेत. पक्षाचे नाव व चिन्ह परत मिळवण्यासाठी ते कायदेशीर लढा देत आहेत. त्यात त्यांना मुलगा आदित्य, खासदार संजय राऊत, भास्कर जाधव, अनिल परब, खासदार अनिल देसाई यांची साथ मिळत आहे. आरोग्याच्या तक्रारी असतानाही ते राज्यात दौरे करत आहेत. पुन्हा मुख्यमंत्री बनण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा आहे.

विजयी झाल्यास : या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला बहुमत मिळाल्यास त्यांचा विश्वासघात करणाऱ्यांवर ते सूड उगवू शकतात.

पराभव झाल्यास : या निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यास त्यांना पक्ष उभा करण्यासाठी आणखी झगडावे लागेल. तसेच भविष्यात मुंबई मनपाची निवडणूक त्यांच्यासाठी अधिक खडतर बनेल.

एकनाथ शिंदे - गेली ४० वर्षे शिवसेनेत असलेल्या एकनाथ शिंदे यांनी कधीही ठाकरे यांना आव्हान दिल्याचे ऐकीवात नाही. पण, अडीच वर्षांपूर्वी त्यांनी पक्षाचे नाव व चिन्ह आपल्या ताब्यात घेतले. ते भाजपमध्ये सामील होतील, असा कयास होता. तो त्यांनी खोडून टाकला. त्यांनी आपले प्राधान्यक्रम निश्चित करून महायुती सरकारचा कारभार केला. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना सोबत घेऊन त्यांनी काम केले. आघाडी सरकार त्यांनी कुशलतेने चालवले.

विजयी झाल्यास : महायुती सरकार स्थापन करण्यात त्यांचा मोठा सहभाग असेल. त्यामुळे भाजपच्या दृष्टीने ते महत्त्वाचे नेते असतील.

पराभव झाल्यास : ठाणे जिल्ह्यात त्यांना टिकून राहण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो. तसेच त्यांचे समर्थक पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या गटात जाऊ शकतात.

देवेंद्र फडणवीस - २०१४ ते २०१९ दरम्यान मुख्यमंत्री राहिलेल्या फडणवीस यांना २०१९ मध्ये निवडणुकीनंतर सत्ता गमवावी लागली. महत्त्वाकांक्षी फडणवीस यांनी पक्षाला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी २५ वर्षांपासूनचा सहकारी असलेल्या शिवसेनेला दूर केले. २०१९ च्या निवडणुकीत भाजपला १०५ जागा मिळाल्या. उद्धव यांनी ही संधी साधून काँग्रेस व राष्ट्रवादीशी आघाडी केली. मात्र, कधीही हार न मानण्याच्या वृत्तीमुळे फडणवीस यांनी राज्याच्या राजकारणात घडामोडी केल्या. त्यातून एकनाथ शिंदे व अजित पवार या दोन पक्षातील नेत्यांना त्यांनी महायुतीत आणले.

विजयी झाल्यास : महायुती पुन्हा सरकार बनवेल. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत ते पहिल्या क्रमांकावर असतील. ते मुख्यमंत्री झाल्यास त्यांच्या विरोधकांचा कठीण काळ सुरू होऊ शकतो.

पराभव झाल्यास : महायुती निवडणुकीत पराभूत झाल्यास फडणवीस हे दिल्लीत जाऊ शकतात. राज्यात मराठा किंवा ओबीसी नेत्याकडे सूत्रे दिली जाऊ शकतील.

राज्यात ६० टक्के मतदान; सर्वाधिक ६९.२२ टक्के मतदान गडचिरोलीत

सिंहासनासाठी काँटे की टक्कर! ‘एक्झिट पोल’च्या आकड्यांमध्ये संमिश्र कौल

सुसंस्कृत महाराष्ट्रातही मतदानादरम्यान हिंसक घटना

चार राज्यांतील पोटनिवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान

मुंबईत मतदारांमध्ये निरूत्साह! केवळ ५१.४१ टक्के मतदान; अनेक मतदारांची मतदानाकडे पाठ