लातूर : शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या बॅगांची मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी तपासणी करण्यात आली. यामुळे संतप्त झालेल्या उद्धव ठाकरे यांनी सामानाची तपासणी करणाऱ्या निवडणूक कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले. राज्यात मोदी, शहांच्या सभा होत आहेत, त्यांच्याही बॅगा तपासा. असे सांगत तुमच्या पाकिटात किती पैसे आहेत, तुमचे नियुक्ती पत्र दाखवा, अशी उलटतपासणी उद्धव ठाकरे यांनी केली. दरम्यान, लातूरमधून ठाकरेंच्या हेलिकॉप्टर उड्डाणास परवानगी नाकारण्यात आल्याने त्यांच्या पुढील सभेचा खोळंबा झाला.
उद्धव ठाकरे मंगळवारी लातूर दौऱ्यावर होते. औसातील हेलिपॅडवर ठाकरेंच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. सोमवारी यवतमाळच्या वणीतही ठाकरेंच्या बॅगा तपासण्यात आल्या होत्या. सलग दुसऱ्या दिवशी बॅगांची तपासणी करण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरे संतप्त झाले. यावेळी ठाकरेंनी निवडणूक अधिकाऱ्यांवर, कर्मचाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली.
हेलिपॅडवर बॅगांची तपासणी झाल्यानंतर ठाकरेंच्या हेलिकॉप्टरला उड्डाणाची परवानगी नाकारण्यात आली. ठाकरेंना लातूरहून धाराशिवमधील उमरग्याला पुढील सभेसाठी जायचे होते. पण त्यांच्या हेलिकॉप्टरला उड्डाणास काही काळ परवानगी देण्यात आली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात येणार असल्याने त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव हवाई वाहतुकीवर निर्बंध आणण्यात आले होते.
पंतप्रधान मोदींचे विमान उतरेपर्यंत बाकीची उड्डाणे रोखण्यात आली. त्याचा फटका उद्धव ठाकरेंना बसला. हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने ठाकरेंच्या हेलिकॉप्टरच्या टेक ऑफला परवानगी दिली नाही. टेक ऑफ रखडल्याने ठाकरेंचा खोळंबा झाला.
मीच का पहिला गिऱ्हाईक?
उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची तपासणी होत असताना तुम्ही कधीपासून नोकरी करत आहात? आतापर्यंत किती जणांना तपासले, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना केला. मात्र, अधिकारी काहीच न बोलल्याने मीच आहे का तुमचा पहिला गिऱ्हाईक? असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. तुमच्यावर माझा राग नाही, पण राज्यात ज्या प्रकारे राजकारण सुरू आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.
बॅग तपासणीबाबत निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची तपासणी करण्यावर शिवसेनेने (उबाठा) प्रश्न उपस्थित केल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. कोणत्याही राजकीय पक्षांच्या उच्चपदस्थ नेत्यांच्या विमानांची आणि हेलिकॉप्टरची तपासणी करणे ही प्रचलित पद्धत आहे. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विमानांची आणि हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली होती, असे निवडणूक आयोगातील सूत्रांनी सांगितले. सर्व नेत्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्याचे आदेश अंमलबजावणी यंत्रणांना मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम घोषित करताना दिले होते.
विरोधकांना त्रास देण्यासाठी खटाटोप - शरद पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला पराभव दिसत असल्याने विरोधकांचा नाहक त्रास देण्यासाठी हा खटाटोप सुरू आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी महायुतीवर केला आहे.
माझ्याही बॅगेची तपासणी - अजितदादा
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या जाहीर सभा होत आहेत. त्यामुळे सभेला जाण्यासाठी हेलिपॅडवर उतरलो की निवडणूक अधिकारी बॅगेची तपासणी करतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही लोकसभा निवडणुकीत बॅगेची तपासणी करण्यात आल्याचे अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.