महाराष्ट्र

अजित पवार यांची भावनिक की तिरकी चाल? पुत्र जयला बारामतीच्या आखाड्यात उतरविण्यासाठी चाचपणी

रविकिरण देशमुख

रविकिरण देशमुख

मुंबई : आपले काका शरद पवार यांच्यापासून फारकत घेतल्यानंतर महायुती सरकारमधील आपली भूमिका वठविणे असो किंवा धूर्त राजकीय नेता म्हणून आपले स्थान पक्के करण्याचे प्रयत्न असो, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या गोंधळलेल्या अवस्थेत तर नाहीत ना, त्यांची ती भावनिक वा तिरकी चाल तर नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातून बहीण सुप्रिया सुळे यांच्यावरुद्ध आपली पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले ती आपली चूक झाली अशी कबुली देण्यापासून ते यापुढे निवडणूक लढविण्यात आपल्याला स्वारस्य नसल्याचे सांगण्यामागे नेमके काय, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

बारामती विधानसभा मतदारसंघातून सहा वेळा निवडून आलेल्या अजित पवार यांनी, यापुढे निवडणूक लढविण्यात स्वारस्य नसल्याचेही सांगितले. पुत्र जय पवार यांच्या समर्थकांनी मागणी केल्याप्रमाणे त्यांना बारामती मतदारसंघातून उमेदवारी देणार का, असे विचारले असता अजित पवार म्हणाले की, ही लोकशाही आहे, आपण सात-आठ वेळा निवडणूक लढविली आहे, मतदारांची आणि समर्थकांची इच्छा असल्यास जय यांच्या उमेदवारीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस संसदीय मंडळाच्या बैठकीत चर्चा होईल. संसदीय मंडळाने जय यांना रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला तर पक्ष त्यासाठी तयार आहे, असेही अजित पवार म्हणाले.

अजित पवार यांच्या वक्तव्याने अपेक्षेनुसार त्यांचे मतदारसंघातील समर्थक आणि त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पक्षात चलबिचल सुरू झाली आहे. बारामती मतदारसंघातील मतदारांनी अजित पवार यांचा राजकीय प्रवास पाहिला आहे, त्यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला तर सुनेत्रा पवार यांचा लोकसभा निवडणुकीत १.५८ लाख मतांनी पराभव झाल्यापासून ते निराश झाले आहेत. बारामती मतदारसंघातून सुनेत्रा यांना मताधिक्य मिळाले नसल्याने त्यांच्या जखमेवर मीठ चोळले गेले.

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना ४७ हजारांहून अधिक मताधिक्य मिळाले ती दरी कशी भरून काढावयाची हा त्यांच्यापुढे यक्षप्रश्न आहे. या मताधिक्याने अजित पवार इतके घायाळ झाले की त्यांनी फेररचनेसाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पदांचे राजीनामे देण्यास सांगितले, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

मतदारसंघाचा कल कसा आहे ते जाणून घेण्यासाठी रचण्यात आलेला हा डाव असू शकतो, असे बारामती मतदारसंघाची खडानखडा माहिती असलेल्यांचे म्हणणे आहे. सुनेत्रांना उमेदवारी देऊन चूक केली असे सांगून पवार कुटुंबातील कोणीही विधानसभेच्या आगामी निवडणुकीत रिंगणात आपल्यासमोर उतरू नये, असा संदेश देण्याचा अजित पवार यांचा हेतू असू शकतो. तरीही पवार कुटुंबातील कोणी रिंगणात उतरलेच तर अजित पवार यांना बारामतीतच ठाण मांडून बसावे लागेल, राज्याच्या अन्य भागात त्यांना प्रचार करता येऊ शकणार नाही.

दरम्यान, अजित पवार यांच्याविधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, विधानसभेची आगामी निवडणूक आपण लढणार नाही, असे अजित पवार यांनी म्हटलेले नाही. त्यांची अन्य काही योजना असू शकते, आम्हाला जास्तीत जास्त जागा जिंकावयाच्या आहेत, असे तटकरे यांनी म्हटले आहे.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत