महाराष्ट्र

राज्यात आजपासून नवीन ऑटो रिक्षा व टॅक्सी परवान्यांना ब्रेक; वाहतूक कोंडी आणि प्रदूषण नियंत्रणासाठी सरकारचा मोठा निर्णय

ऑटो रिक्षांची वाढती संख्या मुंबई, पुणे आणि नागपूर यांसारख्या शहरांमध्ये वाहतूक कोंडी वाढण्याचे एक प्रमुख कारण ठरत आहे. रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढल्याने...

किशोरी घायवट-उबाळे

महाराष्ट्र सरकारने राज्यभरात नवीन ऑटो रिक्षा आणि टॅक्सी परवाने देण्यावर आजपासून (दि.९) तात्पुरती स्थगिती लागू केली आहे. शहरांमध्ये वाढत चाललेली वाहतूक कोंडी आणि पर्यावरणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

सरनाईक यांनी सांगितले की, "गेल्या काही वर्षांत राज्यात ऑटो रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आधीच गर्दीने त्रस्त असलेल्या रस्त्यांवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे." आतापर्यंत राज्यभरात अंदाजे १४ लाखांहून अधिक ऑटो रिक्षा आणि टॅक्सी परवाने देण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी दिली.

वाहतूक कोंडीत वाढ

अधिकाऱ्यांच्या मते, ऑटो रिक्षांची वाढती संख्या मुंबई, पुणे आणि नागपूर यांसारख्या शहरांमध्ये वाहतूक कोंडी वाढण्याचे एक प्रमुख कारण ठरत आहे. रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढल्याने अनेक भागांत वाहतुकीचा वेग कमी झाला असून प्रवासाचा वेळही वाढत आहे. यामुळे वाहनांना वाहतूक कोंडीत अधिक वेळ अडकून राहावे लागत असल्याने इंधनाचा वापर वाढतो आणि परिणामी शहरांतील वायू प्रदूषणातही वाढ होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सरकारने स्पष्ट केले की, "शहरी पायाभूत सुविधांवरील ताण कमी करण्यासाठी आणि वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यासाठी नवीन परवान्यांवर तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे."

चालकांची उत्पन्नाबाबत चिंता

दरम्यान, ऑटो रिक्षा चालकांनीही वाढत्या वाहनसंख्येबाबत सरकारकडे चिंता व्यक्त केली होती. चालकांच्या मते, रस्त्यांवर ऑटो रिक्षांची संख्या वाढल्याने प्रत्येक चालकाला मिळणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. वाढत्या स्पर्धेमुळे अनेक चालकांच्या दैनंदिन उत्पन्नावरही परिणाम होत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे.

परवान्यांतील गैरव्यवहारांची चौकशी

राज्य सरकारने परवाना वितरण प्रक्रियेची तपासणी केली असता काही प्रकरणांमध्ये अनियमितता आढळल्याचेही सांगितले. काही ऑटो रिक्षा परवाने बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांना दिल्याचा संशय असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू असून संबंधित नियमांनुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान, केंद्र सरकारची मंजुरी घेतल्यानंतरच नवीन ऑटो रिक्षा परवान्यांवर तात्पुरती स्थगिती लागू करण्यात आली असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहितीही देण्यात आली आहे.

‘रेटकार्ड’ बंधनकारक; खासगी रुग्णालयांत दर्शनी भागांत दरपत्रक लावणे आवश्यक, नियमभंग करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई

Mumbai : हॉटेलचे खाणे महागणार; सर्व पदार्थांच्या दरात १० ते १५ टक्के होणार वाढ, ‘आहार’ संघटनेचा निर्णय

Mumbai : अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर; दिल्लीच्या धर्तीवर वांद्रे, खार, सांताक्रूझमधील अमली पदार्थ तस्करांची बांधकामे पाडली

छ. संभाजीनगर : फळबागा वाचवण्याचे मोठे आव्हान; ठिबक सिंचन, टँकर, महागड्या पाण्यावर शेतकऱ्यांची भिस्त

सामना पाणीटंचाईशी