महाराष्ट्र

अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली! छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे राज्यात दाखल, उद्या होणार भव्य कार्यक्रम

लंडन येथील ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम’मधील छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे अखेर राज्यात बुधवारी दाखल झाली.

Swapnil S

मुंबई : लंडन येथील ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम’मधील छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे अखेर राज्यात बुधवारी दाखल झाली. बुधवारी मुंबई विमानतळावर आणण्यात आलेली वाघनखे पोलीस बंदोबस्तात साताऱ्यात नेण्यात आली. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज पुरातन वस्तू संग्रहालयात ही नखे प्रदर्शनार्थ ठेवण्यात येणार आहेत. यासंबंधीचा विशेष सोहळा शुक्रवार, १९ जुलैला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. त्यानंतर शिवप्रेमींना महाराजांच्या वाघनखांचे दर्शन घेता येणार आहे.

मोघल सरदार अफझल खान याचा छत्रपती शिवरायांनी वाघनखांनी कोथळा बाहेर काढला होता. ही वाघनखे लंडन येथील ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम’मध्ये ठेवण्यात आली होती. राज्यात ही वाघनखे आणण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम’कडे वारंवार पाठपुरावा केला. त्यानंतर ही वाघनखे तीन वर्षांसाठी महाराष्ट्रात आणण्याचा करार झाला आहे. या करारानुसार ही वाघनखे लंडनहून विशेष विमानाने मुंबईत दाखल झाली. राज्यातील जनतेला ही वाघनखे पाहता यावीत, यासाठी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, नागपूरमधील सेंट्रल म्युझियम, कोल्हापुरातील लक्ष्मी विलास पॅलेसमधील वस्तू संग्रहालयात वाघनखरे टप्प्याटप्प्याने ठेवली जाणार आहेत. राज्य सरकार तीन वर्षांसाठी लंडनच्या ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम’ला यासाठी सुमारे १४ लाख ८ हजार रुपये मोजणार आहे.

चार शहरांत प्रदर्शनार्थ ठेवणार वाघनखे

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे सध्या सातारा येथे राहतील, त्यानंतर ही वाघनखे सातारा, कोल्हापूर, मुंबई आणि नागपूर या चार शहरांत प्रदर्शनार्थ ठेवली जाणार असल्याचे समजते. मात्र, याबाबतचे नियोजित वेळापत्रक अजून ठरलेले नाही.

Pune Ganesh Visarjan 2025 : पुण्यात मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीत भक्तांचा उत्साह; पारंपरिक जल्लोषात विसर्जन

पालखी निघाली राजाची...लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ; भाविकांना अश्रू अनावर | Video

Mumbai : मुंबापुरी गणेश विसर्जनासाठी सज्ज; मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Pune : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणेकर सज्ज; वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Mumbai : मित्राला अडकवण्यासाठी मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी; नोएडामधून ज्योतिषाला अटक