शासकीय यंत्रणा सज्ज ठेवा; पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे निर्देश 
महाराष्ट्र

शासकीय यंत्रणा सज्ज ठेवा; पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबईसह किनारी भागातील जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ५० ते ७० किलोमीटर प्रति तास असण्याची शक्यता आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईसह किनारी भागातील जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ५० ते ७० किलोमीटर प्रति तास असण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी २४ बाय ७ अलर्ट मोडवर राहून आपत्कालीन परिस्थिती आल्यास तातडीने मदत कार्य करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

राज्यभरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने सोमवार आणि मंगळवारी अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. राज्य आपत्ती नियंत्रण कक्षामध्ये आयोजित बैठकीत राज्यातील पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. यावेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, "हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई आणि किनारी भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस अपेक्षित आहेत. अपेक्षित उच्च भरतीच्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती प्रतिसाद दल व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांना 'अलर्ट मोड'वर ठेवण्यात आले आहेत. पुराची परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने 'एसडीआरएफ' आणि 'एनडीआरएफ'ची पथके रवाना करण्यात यावी. आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना तातडीने मदत मिळेल, याची काळजी घ्यावी."

थोडक्यात पावसाची माहिती

  • ६ जुलै रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत मुंबई उपनगर जिल्ह्यात १५१.२ मिलिमीटर पाऊस झाला असून मुंबई शहरामध्ये १०५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

  • रायगड जिल्ह्यात २३६.६, ठाणे जिल्ह्यात १५८.७, रत्नागिरीमध्ये १५२.३ पावसाची नोंद झाली आहे.

दुर्घटनांची चौकशी करा - वडेट्टीवार

मुंबईत गेल्या दोन दिवसांत १२ जणांचा जीव गेला असून या दुर्घटनांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी विधानसभेत केली. सोमवारी सभागृहाचे कामकाज सुरू होताच वडेट्टीवार यांनी अतिवृष्टीत झालेल्या दुर्घटनांचा मुद्दा उपस्थित केला. पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण, झाडांची छाटणी, मॅनहोलची सुरक्षितता, जलनिस्सारण व्यवस्था आणि आपत्कालीन नियोजन प्रभावीपणे झाले असते तर अनेक नागरिकांचे प्राण वाचले असते, असे वडेट्टीवार म्हणाले.

तीन दिवस हवामानाची तीव्रता कायम

येत्या तीन दिवसांत म्हणजे ८ जुलैच्या रात्रीपर्यंत हवामानाची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज आहे. सर्व जिल्हा प्रशासनाने सतर्क राहावे. दरम्यान, भूस्खलनाच्या घटनाही समोर आल्या आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरही मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊन मोठ्या प्रमाणात माती व दगड रस्त्यावर आले आहेत. संबंधित यंत्रणा मार्ग मोकळा करून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्ध पातळीवर काम करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

महाराष्ट्रात आणीबाणी जाहीर करा; खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

नागरिकांच्या मृत्यूनंतरच BMC जागी होणार का? मॅनहोल्सप्रकरणी मुंबई हायकोर्टाने फटकारले; पालिकेचे प्रतिज्ञापत्र केवळ धूळफेक

मुरबाडमध्ये गावांचा संपर्क तुटला; अतिवृष्टीमुळे काळू, शाई नदीसह डोईफोडीलाही आला महापूर, आपत्तीव्यवस्थापनाचा रेड अलर्ट

उद्यापर्यंत अतिवृष्टीचा इशारा! मुंबई, ठाणेमध्ये शाळा आजही बंद; राज्यात विविध दुर्घटनांमध्ये आत्तापर्यंत १३ जणांचा बळी, तर ४ जण जखमी

नाशिकला आज ढगफुटीचा इशारा