रत्नागिरी : औरंगजेब हा क्रूर विचाराचा होता. त्यांने स्वत:च्या वडिलांना तुरुंगात टाकले, मोठ्या भावाचा खून केला. त्याचे मुंडके कापून पूर्ण दिल्लीमध्ये फिरवले. लहान भावावर विषप्रयोग करत त्यांची हत्या केली. औरंगजेब प्रत्येकवेळी धर्माचा आधार घेत होता. आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर शासक आहेत. तेही धर्माचा आधार घेत आहेत. औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकसारखाच आहे, असा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी चढवला.
रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, “औरंगजेबाची कबर ही शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष आहे. क्रूर प्रवृत्तीच्या माणसाला आम्ही गाडतो, हे त्या ठिकाणी दिसून येते. औरंगजेबाची कबर उखडून टाका, असे फडणवीस सांगत आहेत. याचा अर्थ त्यांना मराठी माणसांचा, मावळ्यांचा आणि शिवाजी महाराजांचा इतिहास पुसून टाकायचा आहे. औरंगजेबाची कबर ही शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक आहे, ते शौर्य पुसून टाकायचे हे षडयंत्र आहे.”
“राज्यात कायदा-सुव्यवस्था अत्यंत बिघडलेली आहे. बीड जिल्ह्यात सरपंचाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली, त्यामागे कोण आका होता ते जनतेने पाहिले. आका नंतर आता खोक्या आला आहे. एक मंत्री खोटी कागदपत्रे दिल्याप्रकरणी दोषी ठरला आहे, तर सिंधुदुर्गचे पालकमंत्री रोज बेताल वक्तव्य करून राज्यातील शांतता व सौहार्दाला छेद देत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती पसरवली जात आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे. कोकण व मुंबईचा घनिष्ठ संबंध आहे. कोकणातील मराठी बाणा बिघडवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. कोकणात विपुल प्रमाणात खनिज सापडले आहे ते उद्योगपतींना द्यायचे आहे आणि याप्रकरणी कोकणातील माणूस आडवा येऊ नये म्हणून जातीधर्मात तेढ वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा हल्लाबोल सपकाळ यांनी केला.
रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेस संघटना मजबूत करण्याची गरज आहे. महिनाभरात स्थानिक लोकांशी चर्चा करून निर्णय घेतले जातील. आता रडायचे नाही तर लढायचे आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी स्थानिक पातळीवर काम करा, प्रदेश काँग्रेस तुमच्या पाठीशी आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी आमदार भाई जगताप, ज्येष्ठ नेते माजी खासदार हुसेन दलवाई, माजी आमदार हुस्नबानो खलिफे, रमेश कीर, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन गणेश पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
देश व राज्याच्या राजकारणात आघाड्या, युती अपरिहार्य आहे, त्याची किंमत काँग्रेसने मोजलेली आहे. युती, आघाडीमुळे कोकणात काँग्रेस निवडणुका लढू शकली नाही. इंडिया आघाडी वा मविआ म्हणून काम करत असताना काही मर्यादा व अडचणी येणे स्वाभाविक आहे. आता कोकणातही पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. सिंधुदुर्गपासून या कामाला सुरुवात झालेली आहे आणि कोकणातही काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी आगामी काळात प्रयत्न केले जाणार आहेत, असा विश्वास सपकाळ यांनी व्यक्त केला.
महायुती सरकार म्हणजे ‘गँग्ज ऑफ वासेपूर’
विधानसभा निवडणुकीत शेतमालाला हमीभाव, शेतकऱ्यांची कर्जमाफी, सत्तेत येताच १० लाख लाडक्या बहिणींची फसवणूक, महायुतीचे सरकार म्हणजे ‘गँग्ज ऑफ वासेपूर’सारखे घोटाळ्यांचे सरकार आहे, अशी टीकाही सपकाळ यांनी केली.
शिवेंद्रराजे राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर पडा!
भाजप ज्या कुशीत जन्मला, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला आहे. भाजप संविधान मानत नाही, ते सरसंघचालक गोळवलकर यांचे ‘बंच ऑफ थॉट्स’ मानते, याच पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काय लिहिले आहे, ते शिवेंद्रराजेंनी वाचावे. सावरकरांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काय लिहिले ते वाचावे. भाजपच्या पिल्लावळी छत्रपती शिवाजीराजे व संभाजीराजे यांचा सातत्याने अपमान करत आहेत. शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या सोलापूरकर व कोरटकरला संरक्षण दिले जाते, त्या सरकारमध्ये शिवेंद्रराजे भोसले आहेत, आपण हा अपमान का सहन करता? राजीनामा देऊन महाराजांचा अपमान करणाऱ्या सरकारमधून बाहेर पडा, असे आवाहन सपकाळ यांनी केले.