मुंबई : सहकाराची पंढरी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात सहकारी साखर कारखानदारीला घरघर लागल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. दोन दशकांपूर्वी राज्यात २०० पेक्षा अधिक सहकारी साखर कारखाने कार्यरत होते. मात्र, मागील २५ वर्षांत प्रत्यक्ष गाळप करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांची संख्या १०० च्या आत आली असून, स्वबळावर गाळप करणारे कारखाने केवळ ७५ च्या आसपास उरले आहेत. साखर कारखान्यांच्या या घटत्या संख्येने चिंताक्रांत झालेल्या सरकारने सहकारी साखर कारखान्यांच्या पुनरुज्जीवनासाठी विशेष समिती गठित केली आहे. सहकार विभागाने सोमवारी यासंदर्भतील शासन निर्णय जारी केला.
राज्यातील सहकारी साखर कारखाने सुरू राहावेत, त्यांची आर्थिक स्थिती सुधारावी आणि अडचणीत आलेले कारखाने पुन्हा सुरू व्हावेत, यासाठी सहकार विभाग आणि महाराष्ट्र राज्य सहकारी विकास बँकेच्या संयुक्त अभ्यासातून नवीन मॉडेल तयार करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली १३ जणांची विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला दोन महिन्यांच्या आत सविस्तर अहवाल आणि शिफारशी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सहकार विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात २००० सालापर्यंत २०० पेक्षा अधिक सहकारी साखर कारखाने कार्यरत होते. मात्र, गेल्या २५ वर्षांत आर्थिक अडचणी, अवसायन प्रक्रिया आणि अन्य कारणांमुळे अनेक कारखाने बंद पडले किंवा त्यांची विक्री झाली. आजमितीस ३० ते ३२ सहकारी साखर कारखाने खासगी व्यवस्थापनामार्फत भाडेतत्त्वावर अथवा सहयोगी तत्त्वावर चालविले जातात. त्यामुळे स्वतःच्या बळावर गाळप हंगाम घेणाऱ्या सहकारी कारखान्यांची संख्या घटून ती ७५ वर आली आहे.
विशेष म्हणजे, गेल्या दोन वर्षांत शासन हमीवर एनसीडीसीमार्फत ३३ सहकारी साखर कारखान्यांना अर्थसहाय्य मिळाले. मात्र, ही मदत मिळूनही संबंधित कारखान्यांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे सक्षम झाली नाही.
त्यामुळे सहकारी साखर उद्योगाच्या सद्यस्थितीची कारणमीमांसा करून दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज शासनाने अधोरेखित केली आहे.
साखर उत्पादनावर अवलंबून न राहण्याचे धोरण
साखर कारखान्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी इथेनॉल, सीबीजी, सहवीज निर्मिती, सौरऊर्जा, हरित हायड्रोजन, शाश्वत विमान इंधन आणि जैवरसायने अशा १० उपपदार्थांच्या निर्मितीवर आधारित एकात्मिक बायोरिफायनरी मॉडेल तयार करण्याबाबत समिती अभ्यास करणार आहे. यासाठी केंद्र सरकारचा २० टक्के, राज्य सरकारचा १० टक्के आणि कारखान्याचा ७० टक्के आर्थिक सहभाग असलेल्या वित्तीय प्रारूपाची व्यवहार्यता तपासली जाणार आहे.
समितीची रचना
साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या समितीत सदस्य म्हणून सहकार आयुक्त तथा निबंधक, सहकारी संस्था, पुणे, प्रशासक/व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य सहकारी विकास बँक मर्या., मुंबई, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नाबार्ड, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, वेस्ट इंडियन शुगर मिल असोसिएशन, सहकारी आणि खासगी साखर कारखाने, ऊस संशोधन केंद्राचे प्रतिनिधी तसेच शासननियुक्त साखर उद्योगातील दोन तज्ज्ञ व्यक्ती आणि ऊस बियाणे निर्मिती विषयातील तज्ज्ञ यांचा समावेश आहे.
आर्थिक मॉडेलचा अभ्यास
स्थापन करण्यात आलेली समिती सहकारी साखर कारखान्यांच्या आर्थिक अडचणी, कर्जाचा बोजा, गाळप क्षमता, उत्पादन खर्च आणि आर्थिक व्यवहार्यता यांचा अभ्यास करणार आहे. प्रत्येक कारखान्याची स्वतंत्र आर्थिक व्यवहार्यता तपासणे, प्रत्येक हंगामासाठी स्वतंत्र कॅश क्रेडिट खाते, एस्क्रो खाते, कर्जपुरवठा आणि वसुली धोरण तसेच पुनरुज्जीवन आणि पुनर्वसन निधी यांसारख्या बाबींवर शिफारशी केल्या जाणार आहेत.
(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)