महाराष्ट्र

World Diabetes Day : राज्यात २८ लाखांहून अधिक रुग्ण मधुमेहग्रस्त; यंदा रुग्णांच्या संख्येत वाढ, १.५० कोटी रुग्णांची तपासणी

बदलती जीवनशैली, धावपळीच्या जीवनात नागरिक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे. ३० ऑक्टोबर २०२५-२६ या कालावधीत १ कोटी ५० लाख ७९ हजार ८५२ नागरिकांची तपासणी केली असता २८ लाख ५५ हजार ७०९ जणांना मधुमेहाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

गिरीश चित्रे

मुंबई : बदलती जीवनशैली, धावपळीच्या जीवनात नागरिक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे. ३० ऑक्टोबर २०२५-२६ या कालावधीत १ कोटी ५० लाख ७९ हजार ८५२ नागरिकांची तपासणी केली असता २८ लाख ५५ हजार ७०९ जणांना मधुमेहाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

२०२४-२५ च्या तुलनेत ६ लाखांहून अधिक मधुमेह रुग्णांमध्ये वाढ झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे. दरम्यान, शुक्रवार, १४ नोव्हेंबर रोजी राज्यभरात जागतिक मधुमेह दिन साजरा करण्यात येणार आहे. विविध उपक्रमांद्वारे जनजागृती करण्यात येणार असून यावर्षी जागतिक आरोग्य संघटनेने “आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मधुमेह” असे घोषवाक्य जाहीर केले आहे. धावपळीच्या जीवनात आज आपणच आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहोत. त्यामुळे आपणच विविध आजारांना आमंत्रण देत आहोत. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर मधुमेह परिणाम करू शकतो.

मधुमेह प्रतिबंध, तपासणी आणि उपचार यावर भर देण्यात आला आहे. आरोग्यदायी आहार, नियमित व्यायाम, ताणतणाव नियंत्रण आणि वेळेवर तपासणी हे मधुमेह नियंत्रणाचे मुख्य घटक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मधुमेह हा बालपण, प्रजननकाळ, कार्यक्षम प्रौढ वय आणि वृद्धत्व या सर्व टप्प्यांवर परिणाम करू शकतो.

जागतिक मधुमेह दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

३० ऑक्टोबर २०२५-२६

  • मधुमेह रुग्णांची तपासणी - १ कोटी ५० लाख ७९ हजार ८५२

  • निदान - २८ लाख ५५ हजार ७०९

  • उपचारासाठी पाठपुरावा - ४ लाख १२ हजार ७६६ - १४.५ टक्के

  • मधुमेह नियंत्रणात - ३ लाख २४ हजार १८ - ११.३ टक्के

  • उपचार - ४७ टक्के रुग्ण

एकत्रित प्रतिबंध करणे काळाची गरज

जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्ताने राज्यभर आरोग्य शिबिरे, जनजागृती मोहिमा, व्याख्याने आणि आरोग्य परिषदा आयोजित करण्यात येणार असून, नागरिकांना मधुमेहाविषयी जागरूक करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मधुमेह ही आयुष्यभराची जबाबदारी असून एकत्रितपणे त्याला प्रतिबंध करणे आवश्यक आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाने नागरिकांना आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहन केले आहे.

NEET UG 2026 Re-Exam : नागपूरच्या विद्यार्थ्याचे परीक्षा केंद्र थेट अबूधाबीत; पुनर्परीक्षेच्या आदल्या दिवशी NTA चा भोंगळ कारभार उघड

Mumbai : म्हाडा ॲक्शन मोडवर; ८६ अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्याचे निर्देश

राज्यात उष्माघाताचे १० बळी, १९ संशयित मृत्यू; आरोग्य विभागाच्या अहवालातील माहिती

सरकारी जमिनीवर मालकी नोंदवणाऱ्यांना दणका; भाडेपट्टा नोंदीवर आता ‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार

रिलायन्समधील सत्तांतराची प्रक्रिया अंतिम टप्प्यात; मुकेश अंबानी यांच्याकडून नव्या पिढीकडे सूत्रे सुपूर्द