महाराष्ट्रातील EV विक्रीत १९ टक्के वाढ; तेल अनिश्चिततेमुळे EV गरज अधिक स्पष्ट 
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील EV विक्रीत १९ टक्के वाढ; तेल अनिश्चिततेमुळे EV गरज अधिक स्पष्ट

महाराष्ट्रात जानेवारी-फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ४५,१६८ इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली आहे, असे ‘क्लीन मोबिलिटी शिफ्ट’च्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ३७,८४८ वाहने विकली गेली होती, त्या तुलनेत यंदा १९ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्रात जानेवारी-फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ४५,१६८ इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली आहे, असे ‘क्लीन मोबिलिटी शिफ्ट’च्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ३७,८४८ वाहने विकली गेली होती, त्या तुलनेत यंदा १९ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

सध्या सुरू असलेल्या पश्चिम आशियातील संघर्षाने इंधन पुरवठा साखळी किती असुरक्षित असू शकते आणि पेट्रोल-डिझेलपासून दूर जाणे का गरजेचे आहे, याची नव्याने जाणीव करून दिली आहे. ही वाढ प्रामुख्याने वैयक्तिक वाहनांच्या बाबतीत दिसून येत आहे. जानेवारी-फेब्रुवारी २०२६ मध्ये इलेक्ट्रिक दुचाकी आणि चारचाकी वाहनांची विक्री ३४,५७० युनिट्सवर पोहोचली, तर एकट्या फेब्रुवारी महिन्यात राज्यभरात २०,१३५ ईव्हीची विक्री झाली (फेब्रुवारी २०२५ मध्ये ही संख्या १५,६४८ होती).

तीन चाकीमध्ये कमी वाढ

व्यावसायिक विभागातील मालवाहतूक आणि सामायिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक तीन-चाकी वाहनांच्या विक्रीत फारशी वाढ झालेली नाही. या कालावधीत त्यांची विक्री ३,२७८ वरून केवळ ३,३६८ युनिट्सपर्यंत पोहोचली आहे. सध्या ईव्ही स्थित्यंतर हे घरगुती पातळीवर होत आहे; मालवाहतूक किंवा सामायिक वाहतूक क्षेत्रात अद्याप अपेक्षित बदल दिसत नाही, जिथे इंधन आयातीचा भार तुलनेने अधिक आहे. राज्य सरकारने ‘विद्युत वाहन धोरण २०२५’ अंतर्गत २०२६-२७ या वर्षासाठी खासगी व सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहतुकीला चालना देण्यासाठी २४६ कोटींची तरतूद केली आहे. उद्योगांनी या निर्णयाचे स्वागत केले असले तरी अनुदानाचे प्रमाण अपुरे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

राज्यातील ईव्ही विक्री

एकूण ईव्ही विक्री

(जानेवारी-फेब्रुवारी):

२०२५ → ३७,८४८

२०२६ → ४५,१६८ (+१९%)

व्यावसायिक/सामायिक (३-चाकी):

२०२५ → ३,२७८

२०२६ → ३,३६८ (+२.७%)

प. आशियातील संकटाचा पुरवठा साखळीवर होणारा परिणाम केवळ ईव्हीपुरता मर्यादित नसून संपूर्ण वाहन क्षेत्रावर होण्याची शक्यता आहे. मध्यम ते दीर्घ कालावधीत, तेलाचे संकट हे अंतर्गत ज्वलन इंजिन वाहनांकडून विद्युत वाहनांकडे जाण्याच्या गरजेला अधिक बळ देत आहे.
सिद्धार्थ श्रीनिवास, समन्वयक, क्लीन मोबिलिटी कलेक्टिव्ह, इंडिया
जागतिक अनिश्चितता आणि इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे ईव्हीचा अवलंब करणे ही काळाची गरज ठरेल. सरकारने अनुदान वाढवायला हवे आणि ईव्हीच्या वापराला अधिक आक्रमकपणे प्रोत्साहन दिले पाहिजे.
नितीन दोसा, अध्यक्ष, वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशन

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग