मुंबई : वैद्यकीय उपकरणांच्या मूळ खरेदी किमती आणि त्यावर छापलेली कमाल विक्री किंमत (एमआरपी) यांमध्ये प्रचंड तफावत असल्याचे 'महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासना'च्या (एफडीए) बाजार पाहणीत उघडकीस आले आहे. एका प्रकरणात ही नफ्याची टक्केवारी तब्बल २,८४१.१७ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर, आवश्यक वैद्यकीय उपकरणांच्या किमती रास्त करण्यासाठी आणि दरांचे नियमन करण्यासाठी 'एफडीए' आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केंद्र सरकारच्या 'औषध निर्माण विभाग' आणि 'राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाला' (एनपीपीए) पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
'एफडीए' अंतर्गत काम करणाऱ्या 'महाराष्ट्र राज्य मूल्य देखरेख संसाधन युनिट' ने (एमएसपीएमआरयू) रुग्णालयांत दाखल रुग्णांसाठी उपचारादरम्यान लागणाऱ्या चार प्रमुख श्रेणींमधील उपकरणांचे सर्वेक्षण केले होते. यात आयव्ही संच, सिरिंज आणि सुया, नेब्युलायझर व ऑक्सिजन मास्क, तसेच इतर वैद्यकीय उपकरणांचा समावेश होता. या सर्वेक्षणात रुग्णालयीन उपकरणांच्या किमतींमध्ये मोठी तफावत असल्याचे दिसून आले.
द्रवपदार्थ व औषध देण्यासाठी वापरला जाणारा आयव्ही इन्फ्युजन संच अवघ्या ११.०५ रुपयांना खरेदी केला जातो; मात्र त्यावर ३२५ रुपये एमआरपी छापून २,८४१.१७ टक्के नफा कमावला जात असल्याचे उघड झाले. तसेच ११.५० रुपये आणि १०.५० रुपयांना खरेदी केलेल्या 'लिव्होफ्युजन' आणि 'पॉलीमेड' आयव्ही संचांची एमआरपी अनुक्रमे २५२ रुपये व १८७ रुपये असून त्यावर २,०९१ टक्के आणि १,६८०.९५ टक्के नफा जोडला गेला आहे.
एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी औषध विभाग, एनपीपीए आणि अन्य संबंधित प्राधिकरणांनी या प्रकरणाचा संयुक्तपणे आढावा घ्यावा, अशी मागणी केली आहे. आवश्यक वैद्यकीय उपकरणांच्या किमती तर्कसंगत करण्यासाठी व्यापारी मार्जिनचे तर्कसंगतीकरण किंवा त्यावर कमाल मर्यादा निश्चित करणे, खरेदी किंमत आणि छापील किंमतीमधील स्वीकारार्ह तफावतीबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणांच्या किमतींवर अधिक प्रभावी देखरेख ठेवणे, अशा उपाययोजना एफडीएने सुचविल्या आहेत.
एक हजार टक्के वाढीव दर
औषधे देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या १० मिलीच्या सिरिंजची खरेदी किंमत ६.७५ रुपये होती, तर तिच्यावर ५७.२० रुपये छापील किंमत होती. यामध्ये ७४७.४ टक्के मार्जिन असल्याचे आढळले. श्वसन उपचारांच्या उपकरणांमध्ये, ४० रुपयांना खरेदी केलेला 'नेबप्लस नेब्युलायझर' ७१५ रुपयांना (१,६८७.५ टक्के नफा) आणि ६२.५० रुपयांचे 'एरो कम्फर्ट किट' ६६२ रुपयांना (९५९.२ टक्के नफा) विकले जात आहे. इतर उपकरणांमध्ये २९.४१ रुपयांच्या कॅथेटरची एमआरपी ३१० रुपये (९५५ टक्के नफा) आणि १९७.५० रुपयांच्या डिस्पोजेबल मास्कची एमआरपी ५०० रुपये (१५३.१६ टक्के नफा) असल्याचे समोर आले आहे.
रुग्णांच्या खिशावर अतिरिक्त भार
व्यापाऱ्यांकडून करण्यात येणारी खरेदी किंमत आणि उत्पादनांवरील छापील किंमत यांच्यातील एवढी मोठी तफावत रुग्णांच्या खिशातून होणारा खर्च वाढवू शकते, असे एफडीएने म्हटले आहे. विशेषतः रुग्णालयात दाखल असताना नियमितपणे आवश्यक असलेल्या वैद्यकीय उपभोग्य वस्तूंसाठी रुग्णांची सौदेबाजीची क्षमता मर्यादित असल्याने त्यांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागू शकतो.