मराठवाड्यातील पुरामुळे शेतकरी आणि दुग्धव्यवसायिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील तेलगाव पिंपळगाव येथील दुग्ध उत्पादक श्रीराम दातखिळे (वय ५५) यांचे सर्वस्व एका रात्रीत उद्ध्वस्त झाले. २३ सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे बाणगंगा नदीला पूर आला आणि त्यांच्या ३७ गायी व २० शेळ्या मृत्युमुखी पडल्या.
दातखिळे कुटुंबीय ८ सदस्यांसह दुग्धशाळा चालवत होते. महिन्याला साधारण ३.५ लाख रुपये उत्पन्न मिळून त्यातून ४० टक्के नफा होत होता. मात्र, पुरामुळे कुटुंबाला तब्बल ६० लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. "त्या रात्री आम्हाला स्वतःला वाचवण्यासाठी केवळ ७ ते ८ मिनिटे मिळाली. दोन प्राणी वाचवले, पण उरलेले सर्व प्राणी वाहून गेले. काही मिनिटांतच आमचं सर्वस्व गमावलं," असे प्रवीण दातखिळे यांनी सांगितले.
सध्या हे कुटुंब ओळखीच्या व्यक्तीच्या कांदा शेडमध्ये आसरा घेत आहेत. फक्त प्राण्यांचेच नाही तर कुटुंबाच्या पेरू बागेचेही मोठे नुकसान झाले आहे. शासनाच्या नियमांनुसार केवळ ३ जनावरांसाठी प्रति ३७,५०० इतकीच भरपाई मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या मनात आत्महत्येचा विचार
दरम्यान, शेतकऱ्यांसाठी कार्यरत असलेल्या ‘शिवार’ या हेल्पलाइनवर पुरग्रस्त शेतकऱ्यांचे संकटमय फोन सतत येत असल्याचे संस्थापक विनायक हेगाना यांनी सांगितले. “हेल्पलाइन सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी २७४ कॉल आले, त्यापैकी ८३ शेतकऱ्यांनी आत्महत्येचे विचार मनात असल्याचे स्पष्ट केले,” असे त्यांनी सांगितले.
लातूरमधील एका शेतकऱ्याची ५.५ एकर जमीन पुरात बुडाली, तर खताच्या पिशव्या सुद्धा खराब झाल्या. त्याच्याकडे खासगी सावकाराचे ४० लाखांचे कर्ज असून परतफेड न झाल्यास तो आत्महत्येचा विचार करीत आहे. नांदेडमध्येही एका शेतकऱ्याने पुरामुळे ४० म्हशी व १५ गायी गमावल्या. अपुऱ्या भरपाईमुळे त्यानेही आत्महत्येचा इशारा दिला आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, लम्पी स्किन रोगामुळे विमा कंपन्या गुरांचा विमा काढत नाहीत. त्यामुळे नुकसानीची भरपाई शून्यच राहते. शासनाने तातडीने पीककर्ज माफी जाहीर करून मोठा मदतीचा पॅकेज जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे.