जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया आता ऑनलाइन; समितीला ६० दिवसांत निर्णय द्यावा लागणार, अर्जापासून प्रमाणपत्र वितरणापर्यंत सर्व प्रक्रिया डिजिटल 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया आता ऑनलाइन; समितीला ६० दिवसांत निर्णय द्यावा लागणार, अर्जापासून प्रमाणपत्र वितरणापर्यंत सर्व प्रक्रिया डिजिटल

जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थी आणि नागरिकांना आता सरकारी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही. कारण राज्य सरकारने आता जात प्रमाणपत्र पडताळणीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जात प्रमाणपत्रासाठी आता केवळ ऑनलाइन अर्जच स्वीकारले जाणार आहेत.

Swapnil S

मुंबई : जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थी आणि नागरिकांना आता सरकारी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही. कारण राज्य सरकारने आता जात प्रमाणपत्र पडताळणीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जात प्रमाणपत्रासाठी आता केवळ ऑनलाइन अर्जच स्वीकारले जाणार आहेत. या ऑनलाईन अर्जावर जात पडताळणी समितीला ६० दिवसांत निर्णय घ्यावा लागणार आहे.

सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने बुधवारी यासंदर्भातील शासन परिपत्रक जारी केले. विभागाने पुण्यातील बार्टी संस्था आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या सहकार्याने 'कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी इन्फॉर्मेशन सिस्टीम' (सीसीव्हीआयएस) ही प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीद्वारे अर्ज, कागदपत्रे सादर करणे, अर्जाची स्थिती तपासणे आणि प्रमाणपत्र मिळवणे या सुविधा ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत.

डिजिटल स्वाक्षरीने वैधता प्रमाणपत्र जारी

याशिवाय व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅटबॉटद्वारे मार्गदर्शन आणि प्रमाणपत्र ई-मेल आणि व्हॉट्स ऍपवर मिळण्याची सुविधाही असेल. अर्ज प्राप्त झाल्यानंतर लिपिकाकडून कागदपत्रांची तांत्रिक तपासणी होईल. त्रुटी असल्यास अर्जदाराला त्या दुरुस्त करण्यासाठी अर्ज परत पाठवला जाईल. त्यानंतर सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी आणि समितीचे अध्यक्ष तसेच सदस्य पुराव्यांची गुणात्मक पडताळणी करून निर्णय घेतील. दावा सिद्ध झाल्यास डिजिटल स्वाक्षरीने वैधता प्रमाणपत्र जारी केले जाईल.

आधारशी जोडलेला एकच अर्ज करता येणार

नव्या प्रणालीत अर्जदाराला आधार क्रमांकाशी जोडलेला एकच अर्ज करता येणार आहे. अर्जासोबत मूळ किंवा प्रमाणित कागदपत्रे आणि शपथपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील. नियम १६ नुसार जातीच्या नोंदीचा आणि मानीव दिनांकापूर्वीच्या रहिवासाचा प्रत्येकी किमान एक पुरावा आवश्यक असेल. पुरावा उपलब्ध नसल्यास स्वयंघोषणापत्र सादर करता येईल. गरजेनुसार समिती अतिरिक्त पुरावे मागवू शकेल.

जात वैधता प्रमाणपत्रासाठी सुधारित शुल्क

शैक्षणिक प्रयोजनासाठी : १०० रुपये

ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी : ५०० रुपये

शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी : १००० रुपये

नोकरी आणि सेवाविषयक प्रयोजनासाठी : १००० रुपये

शासकीय योजनांचा लाभ आणि सवलतींसाठी : १००० रुपये

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : पश्चिम उपनगरातील प्रवास सुसाट; पश्चिम उपनगरातील प्रवास सुसाट

४२ लाख शेतकऱ्यांना मोफत धान्य; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

जळगावच्या एकाच कुटुंबातील सहा जणांना कालव्यात फेकले; तिघांचा मृत्यू, दोघे बेपत्ता

राहुल गांधींविरोधातील चौकशीचे आदेश रद्द

युवा आशिया चषक क्रिकेट स्पर्धा : वैभव पुन्हा केंद्रस्थानी; आज श्रीलंकेविरुद्ध उपांत्य सामना