मुंबई : आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यात गोमातेची अवैध वाहतूक, बेकायदेशीर कत्तलखाने आणि जनावरांवर होणाऱ्या अमानुष अत्याचारांविरोधात राज्य सरकारने आता कठोर भूमिका घेतली आहे. गोमातेची तस्करी आणि कत्तल कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार परिवहन विभागाने संपूर्ण राज्यात विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक अधिकारी, सीमा तपासणी नाके, तसेच वाहतूक यंत्रणेला २५ ते २८ मे या कालावधीत युद्धपातळीवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून राज्याने देशी गाईला ‘राज्यमाता’चा सन्मान दिला आहे. हिंदू समाजासाठी गोमाता ही श्रद्धेचा आणि संस्कृतीचा विषय आहे. अशा पवित्र गोमातेची कत्तल करून तिची अवैध वाहतूक करणाऱ्यांना आता कायद्याचा कठोर धडा शिकवला जाईल.”
ते पुढे म्हणाले, “विशिष्ट सणांच्या काळात गोमातेची तस्करी वाढते, गोवंशाला कोंबून, उपाशी ठेवून, अमानुष पद्धतीने वाहनांमध्ये भरले जाते. हा केवळ कायद्याचा भंग नसून हिंदू समाजाच्या श्रद्धांवर घाला आहे. अशा गोतस्करांविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल. परिवहन आयुक्त कार्यालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, राज्यातील सीमावर्ती भाग, मुंबईसह प्रमुख शहरे आणि संवेदनशील मार्गांवर विशेष नाकाबंदी व वाहन तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. जनावरांची वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जाणार असून, आवश्यक परवानग्या, प्रमाणपत्रे आणि प्राणी कल्याण नियमांचे पालन झाले आहे का, याची पाहणी केली जाईल.