(संग्रहित छायाचित्र) 
महाराष्ट्र

बारावीचा निकाल आज; 'डिजीलॉकर'मध्ये गुणपत्रिका संग्रहित देखील करता येणार

राज्य मंडळाचा निकाल वाढणार की कमी होणार, याबाबत उत्सुकता आहे. गेल्यावर्षी राज्याचा बारावीचा निकाल ९१.२५ टक्के लागला होता.

Swapnil S

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवार, दिनांक २१ मे रोजी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत यंदा २१ फेब्रुवारी ते २३ मार्चदरम्यान इयत्ता १२ वीची परीक्षा घेण्यात आली. यंदा राज्यातील १५.१३ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यात विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक सात लाख ६० हजार ४६ विद्यार्थी, कला शाखेसाठी तीन लाख ८१ हजार ९८२, वाणिज्य शाखेसाठी तीन लाख २९ हजार ९०५, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ३७ हजार २२६, आयटीआयसाठी चार हजार ७५० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सीबीएसई आणि आयसीएसईच्या बारावीचा निकाल यंदा वाढला आहे. त्यामुळे राज्य मंडळाचा निकाल वाढणार की कमी होणार, याबाबत उत्सुकता आहे. गेल्यावर्षी राज्याचा बारावीचा निकाल ९१.२५ टक्के लागला होता.

ऑनलाईन निकाल बघण्यासाठी अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.

१. mahresult.nic.in २. http://hscresult.mkcl.org

३. www.mahahsscboard.in

४. https://results.digilocker.gov.in

५. http://results.targetpublications.org

ऑनलाईन निकालानंतर बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने मिळवलेल्या गुणांची गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (http://verification.mh-hsc.ac.in) स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करता येणार आहे. गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी २२ मे ते ५ जून या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येईल.

उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

डिजीलॉकरमध्ये गुणपत्रिका संग्रहित करता येणार

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आऊट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker app मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले