मुंबई : महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि महत्त्वपूर्ण कामगिरीची नोंद झाली आहे. राज्यातील गुहागर, लाडघर आणि श्रीवर्धन या तीन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा ‘ब्ल्यू फ्लॅग’ (ब्ल्यू फ्लॅग) अंतिम पुरस्कार जाहीर झाला आहे. या तिन्ही समुद्रकिनाऱ्यांना अंतिम मान्यता मिळाल्याची माहिती नॅशनल ब्ल्यू फ्लॅग ऑपरेटर डॉ. श्रीजी कुरूप यांनी दिली. डेन्मार्क येथील फाउंडेशन फॉर एन्व्हायर्नमेंटल एज्युकेशन (एफईई) या आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत लवकरच या समुद्रकिनाऱ्यांना अधिकृत ‘ब्ल्यू फ्लॅग’ प्रदान करण्यात येणार आहेत.
पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासन राज्यातील पर्यटनस्थळांचा जागतिक दर्जानुसार विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहे. पर्यावरणपूरक पर्यटन, समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता, पर्यटकांची सुरक्षितता, पायाभूत सुविधांचा विकास आणि शाश्वत पर्यटन व्यवस्थापन या बाबींना प्राधान्य देण्यात येत आहे. या प्रयत्नांना मिळालेली ही आंतरराष्ट्रीय मान्यता महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.
कोकणच्या पर्यटन पूरक उद्योगांना मिळेल चालना
गुहागर, लाडघर आणि श्रीवर्धन या तीन समुद्रकिनाऱ्यांना मिळालेला अंतिम पुरस्कार हा कोकणाच्या पर्यटन क्षमतेला जागतिक स्तरावर अधोरेखित करणारा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील समुद्रकिनाऱ्यांकडे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे लक्ष वेधले जाण्यास मदत होणार असून कोकणातील पर्यटन व्यवसाय, स्थानिक रोजगार आणि पर्यटनाशी संबंधित पूरक उद्योगांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
निसर्गसौंदर्य, स्वच्छता, खाद्यसंस्कृतीमुळे महत्त्व
महाराष्ट्राला सुमारे ८७८ किलोमीटर लांबीची विस्तीर्ण किनारपट्टी लाभली आहे. निसर्गसौंदर्य, स्वच्छ समुद्रकिनारे, समृद्ध सागरी जैवविविधता, ऐतिहासिक वारसा, स्थानिक संस्कृती आणि कोकणी खाद्यसंस्कृती यामुळे कोकणच्या पर्यटनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर तीन समुद्रकिनाऱ्यांना मिळालेला ब्लू फ्लॅगचा अंतिम पुरस्कार महाराष्ट्राच्या किनारपट्टी पर्यटनाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देणारा ठरणार आहे.
पर्यटनस्थळांचा आंतरराष्ट्रीय दर्जानुसार विकास
‘महाराष्ट्रातील तीन समुद्रकिनाऱ्यांना ‘ब्लू फ्लॅग’चा अंतिम पुरस्कार मिळणे ही राज्याच्या पर्यटन क्षेत्रासाठी उल्लेखनीय कामगिरी आहे. या मानांकनामुळे कोकणातील समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख अधिक दृढ होईल. राज्याला लाभलेल्या विस्तीर्ण आणि निसर्गसमृद्ध किनारपट्टीचा विकास करताना पर्यावरणाचे संरक्षण, स्वच्छता, पर्यटकांची सुरक्षितता आणि जागतिक दर्जाच्या सुविधा यांचा समतोल राखणे हे शासनाचे प्राधान्य आहे. महाराष्ट्राला जागतिक पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याच्या आमच्या प्रयत्नांना या पुरस्कारामुळे निश्चितच बळ मिळणार आहे. भविष्यात राज्यातील अधिकाधिक पर्यटनस्थळांचा आंतरराष्ट्रीय दर्जानुसार विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.’ असे पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे यांनी सांगितले.
‘ब्लू फ्लॅग’ हा समुद्रकिनाऱ्यांसाठीचा प्रतिष्ठेचा दर्जा
‘ब्लू फ्लॅग’ हा जगभरात मान्यता प्राप्त असलेला पर्यावरणपूरक समुद्रकिनाऱ्यांसाठीचा प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय दर्जा आहे. समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता, समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता, पर्यावरण संवर्धन, पर्यटकांची सुरक्षितता, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, आपत्कालीन व्यवस्थापन, पर्यावरणविषयक जनजागृती आणि शाश्वत व्यवस्थापन अशा विविध निकषांच्या आधारे हा पुरस्कार प्रदान केला जातो.