मुंबई : महायुती आणि महविकास आघाडीतील बंडखोरीमुळे चर्चेत राहिलेल्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या पाच जागांसाठी शुक्रवारी शांततेत मतदान पार पडले. मात्र, मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पाच जागांसाठी नेमके किती टक्के मतदान झाले, याची माहिती उशिरापर्यंत उपलब्ध होऊ शकली नाही. आजच्या मतदानाने १८२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून सुशिक्षित मतदारांनी नेमका कुणाला कौल दिला, हे मतमोजणीच्या दिवशी म्हणजे मंगळवारी २७ ऑक्टोबरला स्पष्ट होईल.
मतदारांना पैशांचे वाटप केल्याच्या आरोप
विधान परिषदेच्या पुणे, नागपूर आणि औरंगाबाद पदवीधर तसेच पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. दुपारी दोन वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार औरंगाबाद पदवीधरमध्ये ३६.०२, पुण्यात ४०.६०,नागपूर पदवीधरमध्ये ३८.८८, अमरावती शिक्षक मतदारसंघात ६२.५४ तर पुणे शिक्षक मतदारसंघात ५७.८९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. दरम्यान, या निवडणुकीत मतदारांना पैशांचे वाटप करण्यात आल्याच्या आरोप विरोधी पक्षाने केला आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘एक्स’ या समाज माध्यमात एक पोस्ट केली आहे. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी पैसे वाटप होतानाचा व्हिडीओच शेअर केला आहे.
भाजपकडून स्पायकॅम पेनचा वापर
पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपकडून पैसेवाटपासाठी स्पायकॅम असलेल्या पेनचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. मतदारांच्या खिशाला असे पेन लावून, भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आणि मतदानानंतर तो दाखविल्यावर ठरलेले पैसे द्यायचे, असा प्रकार झाल्याचे सुप्रिया सुळे यांनी मतदारांचा हवाला देत म्हटले आहे.
‘स्पाय पेन’, माहिती नाही - मुख्यमंत्री
विरोधकांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी नागपूरमध्ये पत्रकारांना सांगितले की, ‘मला हे स्पाय कॅमेरा पेन म्हणजे काय हेसुद्धा माहीत नाही, मला ते पेन प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय यावर कोणतीही प्रतिक्रिया देता येणार नाही.