विप निवडणुकीत बंडोबांचे आव्हान; नागपूरच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये दुफळी, शिवसेना शिंदे गटाच्या मंगेश चिवटेंची माघार 
महाराष्ट्र

विप निवडणुकीत बंडोबांचे आव्हान; नागपूरच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये दुफळी, शिवसेना शिंदे गटाच्या मंगेश चिवटेंची माघार

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पुणे वगळता इतरत्र बंडखोरांनी माघार घेण्यास नकार दिल्याने महायुती तसेच महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान उभे राहिले आहे.

Swapnil S

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पुणे वगळता इतरत्र बंडखोरांनी माघार घेण्यास नकार दिल्याने महायुती तसेच महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान उभे राहिले आहे. युती आणि आघाडीच्या अधिकृत उमेदवारांना बंडखोरांशी सामना करावा लागणार असल्याने विधान परिषदेच्या तीन मतदारसंघांतील लढती रंगतदार होण्याचा अंदाज आहे.

विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी येत्या २३ ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शुक्रवारी शेवटची मुदत होती. या मुदतीत पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघातील युती तसेच आघाडीच्या बंडखोरांनी माघार घेतली.

पुणे पदवीधरमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रताप उर्फ भैया माने, तर शिक्षक मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाच्या मंगेश चिवटे यांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे भाजपच्या अधिकृत उमेदवार अनुक्रमे डॉ. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांना दिलासा मिळाला आहे. पुणे शिक्षकमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अश्विनी निकम यांनी अर्ज मागे घेतला आहे. मात्र, पुणे शिक्षकमधून उद्योग मंत्री उदय सामंत यांचे विशेष कार्य अधिकारी राहिलेले सचिन सानप यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे.

औरंगाबाद पदवीधरमध्ये आघाडीत फूट

विधान परिषदेच्या औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीत फाटाफूट झाली आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सतीश चव्हाण यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रतापसिंह पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाचे दिलीप घुगे रिंगणात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर भाजपच्या एम. के. देशमुख यांनी बंडाची तलवार आज म्यान केली .

अमरावती शिक्षकमध्ये बंडखोरीचे ग्रहण

अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किरण सरनाईक यांना शिंदे गटाच्याच श्रीकांत देशपांडे यांनी बंडखोरी करत आव्हान दिले आहे. काँग्रेसने येथील अदिती पोहरे यांना उमेदवारी दिली असून शिवसेना ठाकरे गटाचे दत्तात्रय लहाने हेसुद्धा रिंगणात आहेत.

नागपूरमध्ये अनिल सोलेंची बंडखोरी

नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपच्या सुधाकर कोहळे यांच्याविरोधात माजी आमदार अनिल सोले यांनी दंड थोपटले आहेत. सोले यांना उमेदवारी नाकारल्याने भाजपमध्ये अंतर्गत दुफळी माजली असून माजी आमदार गिरीश व्यास यांनी भाजपच्या सर्व पदांचे राजीनामे देत सोले यांच्या उमेदवारीचे समर्थन केले आहे. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अभिजित वंजारी यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या निलेश कराळे यांनी अपक्ष म्हणून आव्हान दिले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दिल्लीची नाकेबंदी, झुरळे आक्रमक; रेल्वे रद्द, मेट्रो, इंटरनेट सेवा बंद, ड्राय-डे जाहीर; परवानगी नाकारली तरी CJP आंदोलनावर ठाम

माशी मारण्यासाठी हातोड्याचा वापर नको; सर्व काही ठप्प करता येणार नाही, सुप्रीम कोर्टाचे केंद्राला निर्देश

Mumbai : रस्ते धुलाईला ब्रेक! पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आठ कोटींचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला

'एसटी'च्या भूखंडांवर व्यावसायिक इमले; प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र निविदा बंधनकारक

इंडिया आघाडीचे नेते भेटले राष्ट्रपतींना, मतचोरीचा मुर्मू यांनी इन्कार केला नाही - राहुल गांधी