पुस्तक फाडणे अमान्य; आशिष शेलार यांचा शिंदेसेनेला अप्रत्यक्ष टोला X|@ShelarAshish
महाराष्ट्र

पुस्तक फाडणे अमान्य; आशिष शेलार यांचा शिंदेसेनेला अप्रत्यक्ष टोला

‘एखाद्या पुस्तकातील विचार हे एखाद्याला प्रेरक आणि एखाद्याला पीडा देणारे असू शकतील. एखाद्या पुस्तकातील मांडणीला एखाद्याचा आक्षेप असू शकतो. त्यावर हरकती देखील असू शकतात. मात्र, मी हे मानणाऱ्यांपैकी आहे की पुस्तक आणि साहित्य निर्मिती हे समाजाला प्रगल्भ करत असते.

Swapnil S

पुणे : ‘एखाद्या पुस्तकातील विचार हे एखाद्याला प्रेरक आणि एखाद्याला पीडा देणारे असू शकतील. एखाद्या पुस्तकातील मांडणीला एखाद्याचा आक्षेप असू शकतो. त्यावर हरकती देखील असू शकतात. मात्र, मी हे मानणाऱ्यांपैकी आहे की पुस्तक आणि साहित्य निर्मिती हे समाजाला प्रगल्भ करत असते. त्यामुळे पुस्तक फाडणे हे मला मान्य नाही. मी कधी पुस्तक फाडले नाही किंवा कधी पंतप्रधानांचा निर्णय फाडलेला नाही’, असे सडेतोड वक्तव्य करत मंत्री आशिष शेलार यांनी शिंदेसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

पुण्यातील पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात रविवारी त्यांनी हे वक्तव्य केले आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी अलीकडेच पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा तथा ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या पुस्तकाची पाने फाडली होती. सोनिया गांधी यांच्या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप करत शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी या पुस्तकाची पाने फाडली होती. त्यामुळे शेलार यांच्या या वक्तव्यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया दिली जाते? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान झाल्याचा दावा

या पुस्तकातून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान झाल्याचा तसेच मराठी साहित्य व अस्मितेचा अवमान झाल्याचा दावा करत शिंदेंच्या शिवसेनेच्या सहा प्रवक्त्यांनी जाहीरपणे पुस्तकाची प्रत फाडली होती, तसेच सावरकरांचा अपमान करणाऱ्या पुस्तकाची प्रत कुणी हसतमुखाने कशी स्वीकारू शकते, असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला होता. या संपूर्ण घटनेवर भाष्य करताना रविवारी पुण्यात पत्रकारांशी बोलतानाबोलताना आशिष शेलार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि पुस्तक फाडणे आपल्याला मुळीच मान्य नसून आपण कधीही पुस्तक फाडलेले नाही असे स्पष्ट केले.

पुस्तक निर्मिती हे सुसंस्कृतपणाचे लक्षण...

एखाद्या पुस्तकातील मूळ गाभ्याशी किंवा विचारांशी आपण सहमत असो वा नसो, पण पुस्तक निर्मिती हे सुसंस्कृतपणाचे लक्षण असून समाजाने पुस्तकांवर प्रेम करणारा दृष्टिकोन ठेवला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले. पुस्तकात मांडलेल्या विषयांवर किंवा भूमिकेवर आंदोलन करण्याचा लोकशाही अधिकार असला तरी साहित्यनिर्मितीच्या संदर्भात सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे, असे सांगत त्यांनी पुस्तकातील विचार कोणासाठी प्रेरक तर कोणासाठी पीडादायक ठरू शकतात आणि त्यावर आक्षेप किंवा हरकतीही घेतल्या जाऊ शकतात, हे अधोरेखित केले. मात्र, पुस्तक आणि साहित्यनिर्मिती समाजाला प्रगल्भ बनवण्याचे आणि माणसाची जडणघडण करण्याचे महत्त्वाचे काम करत असल्याचे स्पष्ट करत पुस्तक फाडणे ही आपली संस्कृती नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कोयनेचे पाणी आता मुंबईकडे वळवणार

Mumbai : 'हरितवारी जलतिरी' प्रकल्प अंधारात; सायकल ट्रॅक, पदपथांवरील बत्तीगुल

Mumbai : हिरा मंजिलला भीषण आग; जीवितहानी नाही

एकाच कुटुंबातील ९ ठार, धुळ्यातील भाविकांवर काळाचा घाला; राजस्थानात भीषण अपघात, मृतांमध्ये २ लहान मुलांचा समावेश; ८ जखमी

सावकारी फायनान्स कंपन्यांचा धुडगूस..!